0
मुंबईः अजय देवगण आणि विकी कौशल यांच्यामध्ये एक साम्य आहे, असे म्हटल्यावर अनेकांना ते लक्षात येणार नाही. हे दोघेही अ‍ॅक्शन दिग्दर्शकांचे चिरंजीव आहेत. वीरू देवगण यांचा मुलगा असलेल्या अजयने अभिनेता म्हणून मोठेच यश मिळवले. आता अ‍ॅक्शन दिग्दर्शक श्याम कौशल यांचा मुलगा विकी कौशल तसेच यश मिळवत आहे. इंजिनिअरची पदवी मिळवलेल्या विकीने अनुराग कश्यप याला दिग्दर्शनात सहाय्य करीत चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ साठी तो अनुरागचा सहायक दिग्दर्शक होता. 2015 मध्ये ‘मसान’मधून त्याने पदार्पण केले आणि पदार्पणातच ‘उत्कृष्ट नवोदित अभिनेत्या’चे अनेक पुरस्कार पटकावले. आता ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’मुळे तो स्टार बनला असून हा चित्रपट नव्या वर्षातील पहिला सुपरडुपर हिट चित्रपट बनला आहे. अर्थातच या चित्रपटाच्या यशाने हा गुणी अभिनेता सुखावून गेला आहे.

गेल्या वर्षी ‘संजू’ आणि ‘राझी’ या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे मोठेच कौतुक झाले होते. मात्र, तो या चित्रपटांचा ‘लीड’ कलाकार नव्हता. ‘उरी’ने त्याला एक प्रमुख कलाकार म्हणून पहिलेच मोठे यश मिळवून दिले आहे. अवघ्या दहा दिवसांच्या काळात या चित्रपटाने 100 कोटी रुपयांपेक्षाही अधिक गल्ला जमवला आहे. ‘ये हिंदुस्तान चूप नही बैठेगा, ये नया हिंदुस्तान है. ये घर में घुसेगा और मारेगा भी’ असे संवाद असणार्‍या या चित्रपटात पाकव्याप्त काश्मीरमधील सर्जिकल स्ट्राईकचे धाडस आणि थरार दर्शवण्यात आला आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 8.20 कोटी रुपयांची कमाई केली होती. विशेष म्हणजे या चित्रपटाचे बजेट अवघे 25 कोटी रुपयांचे होते. अवघ्या तीन ते चार दिवसांमध्येच चित्रपटाने ही रक्कम वसूल केली! चित्रपटातील विकीच्या अभिनयाची सर्वत्र प्रशंसा होत आहे. हा चित्रपट त्याच्या कारकिर्दीसाठी एक महत्त्वाचा चित्रपट ठरला आहे.

Post a Comment

 
Top