0
औरंगाबाद - आगामी काळात लोकसभा, विधानसभा व त्यानंतर महापालिका निवडणुकांसाठी प्रचाराचा धुरळा उडणार आहे. त्यासाठी मतदारांना प्रलोभने दाखविण्याची जणू स्पर्धाच लागेल. कधीकाळी या प्रलोभनांना मतदार बळीही पडत. नवमतदारांच्या मात्र राजकारणाविषयीच्या संकल्पना ठरलेल्या असून, "माझे मत परिवर्तन घडविणार, स्वच्छ प्रतिमेलाच प्राधान्य देणार,' असे मत अनेकांनी व्यक्त केले.निवडणूक आयोगातर्फे वारंवार मतदार नोंदणी अभियान राबविण्यात येते. त्याला प्रतिसाद देत वयाची 18 वर्षे पूर्ण केलेले तरुण-तरुणी मोठ्या संख्येने नोंदणी करून मतदानाचा हक्क बजावतात. मतदानाचा हक्क बजावता आला म्हणजे देशाचे सुजाण नागरिक असल्याची भावना तरुणांमध्ये निर्माण होते. अनेक वेळा नवमतदारांचे मतसुद्धा एखाद्या निवडणुकीचे चित्र पालटून टाकते. ता. 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो.

यानिमित्ताने तरुणांशी संवाद साधला. राजकारणाविषयीच्या त्यांच्या संकल्पना जाणून घेतल्या. "स्वच्छ राजकारण, स्वच्छ उमेदवार' याला प्राधान्य देणार असल्याचा सूर या नवमतदार तरुण-तरुणींच्या प्रतिक्रियांमधून उमटला.


यावर्षी होऊ घातलेल्या निवडणुकीत पहिल्यांदा मतदान करणार आहे. यावेळी उमेदवाराची प्रतिमा आणि कार्याचा विचार मी निश्‍चित करेल. उमेदवाराने संविधानानुसार प्रत्येक नागरिकाला हक्क मिळवून देऊन सर्वसमावेशक विकास साधला पाहिजे. तरुणांसाठीच्या योजना राबवून शिक्षण, रोजगाराकडे विशेष लक्ष द्यायला पाहिजे.
-  स्वप्नील जाधव


पहिल्यांदा मतदान करणार असल्याने मनामध्ये अनेक प्रश्न आहेत. माझे एक मत मोलाचे असल्याने हुशार, सुशिक्षित, कार्यक्षम, कौशल्यवान, जनसंपर्क असणाऱ्या उमेदवाराचाच विचार करणार आहे.
- सिद्धेश्‍वर जाधव


मतदानाचा हक्क मिळालाय आणि तो मी चांगल्या प्रकारे बजावेल. चांगल्या गोष्टींची साथ द्यायला मन खूप उत्सुक आहे. माझी उमेद नवीन परिवर्तन मागतेय. एक विद्यार्थी, नवयुवक म्हणून खूप अपेक्षा आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी माझी साथ विद्यार्थ्यांच्या प्रत्येक हाकेला जो धाव घेऊन शेवटपर्यंत सोबत राहील त्यालाच असेल.
- श्रीनाथ राठोड


येणाऱ्या 2019 च्या निवडणुकीसाठी उत्साह आहे. मी पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावणार आहे, त्यामुळे मला आनंद होत आहे. मतदारांनी आमिषाला बळी न पडता मतदान करून योग्य, स्वच्छ प्रतिमा असलेला उमेदवार निवडून द्यावा.
- सत्यम लाटे


चार-साडेचार वर्षे जनतेकडे सोयीने पाठ फिरविणाऱ्या लोकप्रतिनिधींना धडा शिकविण्याचा संकल्प करूनच या निवडणुकीत मतदान करणार. त्यासाठी जनजागृतीही करणार, जेणेकरून योग्य नेतृत्वाला संधी उपलब्ध होईल, देश प्रगतीकडे वाटचाल करेल.
- वैष्णवी घुगे


योग्य प्रतिनिधित्व जनतेला मिळावे हाच मुख्य हेतू ध्यानी धरून जनतेने निःस्वार्थीपणे निवडणुकीला सामोरे जावे. नवमतदार म्हणून असे वाटते, की 70 वर्षांपासून देशाला भेडसावणाऱ्या समस्या आजही जशाच्या तशाच आहेत. आजही जातिधर्माच्या नावावर दंगली घडवून राज्यकर्ते निवडून येतात आणि विकास दुर्लक्षित होतो. याचा विचार करून मतदान व्हावे.
- मनीषा सोरमारे


शिक्षणाचे बाजारीकरण थांबले पाहिजे. बेरोजगारीचा प्रश्न सुटला पाहिजे. एमआयटी कॉलेजमध्ये सचिनचा चुकीच्या शिक्षण व्यवस्थेमुळे बळी गेला. एक विद्यार्थी म्हणून माझे मतदान शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी असेल.
- मयूर म्हस्के

भारतीय संविधानामुळे प्रत्येक नागरिकाला समान अधिकार मिळाला आहे. देशातील अब्जाधीश आणि सामान्य नागरिक, दोघांच्या मताला एकच किंमत आहे. त्यामुळे मी मतदानासाठी उत्सुक आहे. येणारी निवडणूक सत्याच्या बाजूने व्हावी.
- आनंद जाधव

Post a Comment

 
Top