0
गोव्यातील भाजप सरकारने परप्रांतीयांच्या यादीत महाराष्ट्रातील लोकांनाच अग्रस्थानी ठेवले आहे. गोवा राज्यातील नोकऱयांमध्ये परप्रांतीयांना विशेषतः महाराष्ट्रातील माणसांना स्थान दिले जाणार नाही, असे पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांनी जाहीर करून टाकले आहे.

गोव्यात स्थलांतरित कामगारांना विशेषतः महाराष्ट्रातून येणाऱया लोकांना नोकऱया दिल्या जाणार नाहीत, असे पत्रकार परिषद घेऊन पर्यटन मंत्र्यांनी स्पष्ट केले.

‘भूमिपुत्रां’नाच नोकऱया अशी भूमिका मांडताना आजगावकर यांनी महाराष्ट्रातील लोकांसाठी ‘घाटी’ हा शब्दप्रयोगही केला. या शब्दाचा वापर बदनामीकारक आहे, असे त्यांच्या निदर्शनास आणून दिले असता ते म्हणाले की, घाटी शब्दात वाईट असे काही नाही. घाटावर जे लोक राहतात, ते घाटी असाच त्याचा अर्थ आहे.

आजगावकर यांनी यापूर्वी कर्नाटकातील लमाणी लोकांबद्दल असेच वादग्रस्त वक्तव्य करून वाद पेटवला होता. लमाणी लोक गोव्याच्या किनाऱयावर उपद्रव देतात, असा आरोप त्यांनी 2017 सालात केला होता.


गोव्यात बंदरे स्वच्छ करण्याच्या कंत्राटाची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. ज्यांना त्यात यश मिळेल, त्या कंत्राटदारांनी नोकऱयांमध्ये गोव्यातल्याच लोकांना प्राधान्य द्यावे. महाराष्ट्रातील लोक इथे येता कामा नयेत. – मनोहर आजगावर, पर्यटनमंत्री, गोवा

Post a Comment

 
Top