0
कोल्हापुरात शेंडापार्क येथील तीन एकर जागेत 30 कोटी रुपये खर्च करून महाराष्ट्रातील पहिले अद्ययावत कृषी भवन उभारणार असल्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज (दि.२६) येथे बोलताना केली.
प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. छत्रपती शाहू स्टेडियम येथे झालेल्या या ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक,  उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे आदी मान्यवर आणि ज्येष्ठ स्वातंत्र सैनिक उपस्थित होते.

शेतकऱ्यांना लवकरच ऑनलाईन 7/12 देणार- पालकमंत्री
शेतकरी खातेदारांना ऑनलाईन 7/12 देण्याच्या कामास राज्य शासनाने प्राधान्य दिले असून येत्या एक दोन महिन्यात डिजिटल स्वाक्षरीसह ऑनलाईन 7/12 देण्याचे काम मार्गी लागेल, असा विश्वास व्यक्त करुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, यंदा कोल्हापूर जिल्ह्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत 477 कोटी 56 लाखाचा आराखडा तयार केला आहे. त्यात नाविन्यपूर्ण योजनांसाठी 7 कोटीची तरतुद केली आहे. यामध्ये अनेकविध नाविन्यपूर्ण योजनांसाठी तरतुद केली असून मृत्यूंजयकार शिवाजी सावंत स्मृती दालनासाठी 50 लाखाच्या तरतुदीचा समावेश आहे. जिल्ह्यात राबविलेल्या शौचालय अभियानातून शिल्लक राहिलेल्या 28 कोटी रुपयांच्या निधीतून पंचगंगा काठावरील गावांना शुध्द पाणी देण्यासाठी आरओ प्लँट देण्याबरोबरच 4-5 गावांचे क्लस्टर तयार करुन सांडपाणी शुध्दीकरणाचा प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

जिल्ह्यात हागणदारीमुक्तीचा महत्वकांक्षी प्रकल्प यशस्वी झाला असून जिल्ह्यातील 1029 ग्रामपंचायती हगणदारीमुक्त झाल्या आहेत. कोल्हापूर जिल्हा हागणदारीमुक्तीत देशात पाचवा तर स्वच्छता दर्पण देशात पाचवा असल्याचेही ते म्हणाले.

जिल्ह्यात रस्त्याचं जाळं निर्माण करण्यास प्रधान्य- पालकमंत्री
जिल्ह्यात गेल्या चार वर्षात रस्त्याचं जाळं निर्माण करण्यास शासनाने प्राधान्य दिले असून रस्ते आणि पुलांचा मोठा कार्यक्रम हाती घेतला आहे. गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील मोठ्या चार पुलांचा शुभारंभ केला असून ग्रामीण जनतेची या पुलामुळे मोठी सोय झाली आहे. गुणवत्तापूर्ण व राष्ट्रीय दर्जाचे रस्ते उभारण्यासाठी हायब्रीड ॲन्युईटी मॉडेल तयार करण्यात आले आहे. याद्वारे कोल्हापूर जिल्ह्यास 4 पॅकेज मंजुर करण्यात आली असून येत्या दोन वर्षात 232 किलो मीटर लांबीचे रस्ते पूर्ण केले जातील. यामध्ये कुठलाही रस्ता यापुढे 10 वर्षे खराब होणार नाही याची दक्षता घेतली जात असून त्याच्या दुरुस्तीचे काम निघाल्यास ते पूर्ण करणे संबंधितांना बंधनकारक केले असल्याचेही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. रस्ते विकासाचा मोठा कार्यक्रम हाती घेतल्याने येत्या मार्चनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचा एकही रस्ता निट नाही असे होणार नाही, असा निर्वाळाही त्यांनी दिला.

मराठा समाजाला घटनेच्या चौकटीत टिकणारे आरक्षण- पालकमंत्री

मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये घटनेच्या चौकटीत टिकणारे 16 टक्के आरक्षण देण्यात आले असून या निर्णयामुळे मराठा समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी मोठी मदत होणार असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, की 1902 मध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी मराठा समाजाला आरक्षण दिले होते. राजर्षी शाहूंच्या विचार आणि धोरणानुसार राज्य शासनाची वाटचाल सुरु असून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासनाने मागासवर्गीय आयोग नेमूण आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण केली आहे. केंद्र शासनाने नुकतेच आर्थिक मागास घटकांसाठी 10 टक्के आरक्षण घोषित केले आहे. त्यामुळे 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या घटकाला मोठा लाभ होणार आहे.

आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून जिल्ह्यातील 153 जणांना 15 कोटीचे अर्थसहाय्य करण्यात आले आहे. या महामंडळामार्फत तरुणांना उद्योग व्यवसायासाठी 10 लाखापर्यंतच्या कर्जाची हमी सरकारने घेतली असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, की महाराष्ट्रातील पहिले डॉ. पंजाबराव देशमुख विद्यार्थी वसतीगृह कोल्हापूरात सुरु झाले आहे. 72 विद्यार्थी क्षमतेच्या या वसतिगृहामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांची सोय झाली आहे. ईबीसी सवलतीची उत्पन्न मर्यादा 1 लाखावरुन 8 लाख करुन विद्यार्थ्यांची निम्मी फी शासनामार्फत भरण्याच्या निणर्यामुळे जिल्ह्यातील 15 हजार 870 विद्यार्थ्यांची अडीच कोटीची फी माफ झाली आहे.

जोतिबा परिसर विकासाच्या कामांना लवकरच सुरुवात- पालकमंत्री

जिल्ह्यात पर्यटन विकासाला चालना दिली असून जोतिबा विकास आराखडा मंजुर झाला आहे. येत्या 3 फेब्रुवारीला जोतिबा परिसर विकासाच्या कामांना सुरुवात केली जाणार आहे. तसेच करवीर निवासिनी अंबाबाई (महालक्ष्मी), तिर्थक्षेत्र विकास आरखड्याचे तात्काळ आदेश निघतील. त्यानंतर ही कामे मार्गी लागतील असा विश्वास व्यक्त करुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, की जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. विमान सेवा, खंडपीठ, शिवाजी पुल अशा अनेकविध प्रश्नांच्या सोडवणुकीस सरकारने गती दिली आहे.

जिल्ह्यातील 7 शहीद वीरपत्नींना प्रत्येकी 2 हेक्टर जमीन मंजूर- पालकमंत्री

देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी राज्य सरकारने दिली असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, की या कर्जमाफी अंतर्गत कर्जमाफी व नियमित कर्जफेड केलेल्या जिल्ह्यातील 2 लाख 6 हजार शेतकऱ्यांना 435 कोटी 70 लाखाच्या कर्जमाफी आणि कर्ज सवलतीचा लाभ दिला आहे. मुद्रा योजनेद्वारे जिल्ह्यातील दीड लाख लाभार्थ्यांना 786 कोटीचे अर्थसहाय्य केले आहे. जिल्ह्यात प्रधानमंत्री जीवन सुरक्षा, प्रधानमंत्री जीवन ज्योती अशा सर्व योजनांचा लाभ नागरीकांना देण्यात आला आहे. जिल्ह्यातील 7 शहीद वीरपत्नींना प्रत्येकी 2 हेक्टरप्रमाणे जमीन मंजूर केल्याचेही ते म्हणाले. 

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दिव्यांग सर्वेक्षणाच्या कामाला गती मिळाली असून आतापर्यंत 43 हजार 927 दिव्यागांची नोंदणी झाली आहे. या दिव्यागांना वैस्वीक ओळखपत्र देण्याबरोबरच दिव्यांग प्रेरणा पुरस्कार देण्याच्या कामाला गती देण्यात आल्याचेही ते म्हणाले. देशाच्या स्वातंत्र्याला 2022 साली 75 वर्ष पूर्ण होत असून त्यानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जवळपास 75 टक्के कामे यावर्षापर्यंत पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे. सर्वांनी त्यांच्या या प्रयत्नाला साथ द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

लोकशाही सदृढ करण्याचा संकल्प करुया-पालकमंत्री

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारतीय राज्य घटनेने देशातील प्रत्येकाला समान अधिकार दिला आहे. भारतीय राज्य घटना ही जगात आदर्श ठरली आहे. भारतीय राज्य घटनेमुळे देशात लोकशाही अधिक भक्कम असून ती अधिकाधिक वृंध्दीगत होत आहे. देशाच्या लोकशाहीचे जगभरातून कौतुक होत असून भारतीय लोकशाही यापुढील काळातही अधिक सक्षम आणि सदृढ करण्याचा आजच्या प्रजासत्ताक दिनी संकल्प करुया, असे आवाहनही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. लोकशाही, निवडणूक आणि सुशासन असा लोकशाही पंधरवडा निवडणूक आयोगाने आजपासून सुरु केला आहे. आगामी निवडणुकात लोकांनी विशेषत: मतदारांनी मुक्त आणि निर्भयपणे मतदान करावे. लोकशाही सदृढ करण्यासाठी जनतेचे मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण संपन्न

ध्वजवंदनाच्या मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण, ध्वजवंदन संपन्न झाले.  त्यानंतर पालकमंत्री महोदयांनी संचलनाची पाहणी करुन मानवंदना स्वीकारली. या संचलनामध्ये पोलिस दल, गृहरक्षक दल, वनरक्षक दल, राज्य उत्पादन शुल्क दल, अग्निशमन दल, एनसीसी, आरएसपी, नेव्ही एनसीसी, एमसीसी, तारा कमांडो फोर्स, स्काऊट गाईड पथक, व्हाईट आर्मी, फायर इंजिनिअरिंग पथक, भारतीय वायुसेनेचे कॅडेट, पोलिस बँड, श्वान पथक, सह्याद्री कॅडेट फोर्स, दंगल नियंत्रण, वज्र वाहन पथक, सीसीटीव्ही सर्व्हेन्स व्हॅन आदी जवानांच्या शानदार संचलनाद्वारे पाहुण्यांना मानवंदना देण्यात आली. तसेच शहर व जिल्ह्यातील विविध शालेय विद्यार्थी-विद्यार्थींनीच्या विविध पथकांकडूनही पाहुण्यांनी मानवंदना स्वीकारली.

यावेळी विविध‍ विभागांनी आकर्षक व लक्षवेधी चित्ररथ सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. यमाध्ये निर्भया पथक, तंटामुक्त अभियान, वन व वनीकरण, शिक्षण, आरोग्य, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, सर्व शिक्षा अभियान, आपत्ती व धोके व्यवस्थापन, बेटी बचाओ बेटी पढाओ, 108 रुग्णवाहिका, व्हाईट आर्मी, डाक जीवन विमा, व्हीव्ही पॅट अशा विविध विभागांच्या व शाळांच्या लक्षवेधी चित्ररथांचा समावेश होता.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विविध गुणवंतांचा गुणगौरव करण्यात आला. यामध्ये पोलिस महासंचालकांचे सन्मान चिन्ह प्रधान (गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पोलिस पथक) पोलिस उप अधिक्षक सतीश माने, सहायक फौजदार मनोहर खानगावकर, गोवर रुबेला लसीकरण मोहिमेच्या यशस्वीतेबद्दल जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.सी. केम्पी पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील यांचा सन्मान करण्यात आला.

जिल्हा क्रिडा कार्यालयमार्फत गुणवंत खेळाडू कुमारी अभिज्ञा पाटील, अनुष्का पाटील, शाहू माने यांचा सन्मान करण्यात आला. दिव्यांग खेळाडू उज्वला चव्हाण, अजय वावरे, महसूल विभागामार्फत  गुणवंत खेळाडू गगन देशमुख, पंडित पांडे यांच्यासह कुमार रुत्वीक चौगले, यांच्या सत्काराबरोबरच जिल्हा स्मार्ट ग्राम योजनेंतर्गत उत्तुर आणि हात्तीवडे गावांचा सत्कार करण्यात आला.  जिल्हा लघु उद्योग पुरस्कार विजेते मंगेश पाटील आणि राजन निकम यांनाही अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी 1975-77 मधील आणीबाणी कालावधीत कारावास भोगलेल्या प्रमोद जोशी आणि प्रभाकर गणपुले यांना मानधन आदेश देण्यात आले. नृत्यंगना व अभिनेत्री जोया खान यांच्या सांस्कृतिक आणि सामाजिक कार्याबद्दल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमात कुमार विद्या मंदिर निगवे दुमालाच्या बालचमुने सैनिकी जीवनावर सादरीकरण केले, कणेरीमठ इव्हेंट योगा, तसेच महापालिकेच्या 40 विद्यार्थ्यांचे समुह नृत्य, उषाराजे हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य, शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी बेटी बचाओ- बेटी पढाओ पथनाट्य सादर केले. शेवटी उठा राष्ट्रवीर हो, सारे जहाँसे अच्छा ही समुह गीते असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करुन उपस्थितांची वाहवा मिळविली.

यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित स्वातंत्र सैनिकांची भेट घेवून त्यांना गुलाब पुष्प देवून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच मान्यवर आणि विद्यार्थी, विद्यार्थींनीचीही भेट घेवून त्यांनाही प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.  Post a comment

 
Top