0
युती भक्कम असली तरी खासदार संजय राऊत यांनी मात्र युती आम्हाला नकोच आहे, असे वक्तव्य केले आहे.

मुंबई- येत्या विधानसभा निवडणुकीत भाजप- सेनेची यांची युती होणार की नाही याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे. मात्र, युतीची कोणत्याही दिवशी अचानक घोषणा होऊ शकते, असे सूतोवाच राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

मुंबईत आपत्ती व्यवस्थापन परिषदेच्या आयोजनसंदर्भातील पत्रकार परिषदेत पाटील म्हणाले, युती भक्कमच आहे. साैम्य काय तीव्र भूकंपाचे धक्के बसले तरीही गेल्या साडेचार वर्षात युती कोलमडून पडलेली नाही. त्यामुळे भूकंपाचे धक्के ठामपण सहन करीत युती टीकून असून एखाद्या घरासारखी ती कोलमडून पडणार नाही. युती भक्कम असली तरी खासदार संजय राऊत यांनी मात्र युती आम्हाला नकोच आहे, असे वक्तव्य केले आहे, या संदर्भात पाटील म्हणाले की, संजय राऊत यांचे म्हणणे चूक होते, हे तुम्हाला नंतर कळेल. कारण, कोणत्याही दिवशी अचानक युतीची घोषणा होईल. त्यामुळे मी झोपेतून उठलो तरी युती होणार असाच दावा करतो आणि मी म्हणतो ते साधारण खरे होते, असेही ते म्हणाले.


शिवसेनेच्या होकाराची वाट पाहतोय : मुनगंटीवार 
राज्यात लोकसभा व विधानसभेच्या युतीचा एकत्रित निर्णय होणार आहे. त्यासाठी शिवसेनेच्या होकाराची वाट पाहत असल्याचे भाजपचे नेते वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे. नाशिकमध्ये ते बोलत होते. या वेळी त्यांनी काँग्रेसवरही शरसंधान साधले. राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसला यश मिळणार नसल्याचे अोळखूनच दोनऐवजी तीन आकडी जागा मिळवण्यासाठीच काँग्रेसने प्रियंका गांधींना राजकारणात सक्रिय करण्याचा अयशस्वी प्रयत्न सुरू केल्याची टीकाही त्यांनी केली.

प्रियंकास्त्राचा राज्यात काँग्रेसला फायदा होणार नाही: भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांचा ठाम विश्वास 
आगामी लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने राष्ट्रीय स्तरावर मोठी खेळी खेळली आहे. राहुल गांधींच्या मदतीला आता प्रियंका गांधी-वढेरा यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी निवड करण्यात आली असून त्यांच्यावर उत्तर प्रदेशची जबाबदारी दिली आहे. यामुळे काँग्रेसमध्ये उत्साह पसरला असला तरी राज्यात काँग्रेसला याचा फायदा होणार नसल्याचे मत शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी व्यक्त केले आहे. तर, केवळ राज्यातच नाही तर देशातही याचा फायदा होईल, असा काँग्रेसचा दावा आहे. भाजपच्या एका वरिष्ठ मंत्र्याने प्रियंकाच्या प्रवेशाबाबत दिव्य मराठी'शी बोलताना सांगितले,

मायलेकाचा पक्ष आता बहीण-भावाचा झाला : भाजप 
राहुल गांधींवर काँग्रेसचाच विश्वास नाही. त्यामुळे त्यांना प्रियंका गांधी यांना मैदानात पुन्हा उतरवावे लागले. प्रियंका आधीही निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या पण काँग्रेसला काहीही उपयोग झाला नव्हता. काँग्रेस पूर्वी मायलेकाचा पक्ष होता. तो आता बहीण-भावाचा झाला आहे, अशी टीका भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केली आहे.

राज्यात काही फायदा नाही 
काँग्रेसने कुणाला पुढे करावे, हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र, काँग्रेसला प्रियंका गांधींचा म्हणावा तसा फायदा होणार नाही. उत्तर प्रदेशमध्ये थोडासा फरक पडेल, परंतु महाराष्ट्रात काही होणार नाही, असे मत शिवसेनेच्या हर्षल प्रधान यांनी व्यक्त केले.


३० जानेवारीपर्यंत निर्णय घ्या : अॅड. प्रकाश आंबेडकर 
काँग्रेसने ३० जानेवारीपर्यंत महाआघाडीबाबतचा प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीला सादर करावा, अन्यथा काँग्रेसला आमच्यासोबत येण्यात रस नसल्याचे समजून आम्ही स्वतंत्र जागा लढवू, असा इशारा भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला.

कार्यकर्त्यांना बळ मिळेल 
प्रियंका गांधींच्या सक्रियतेने काँग्रेस कार्यकर्त्यांना बळ मिळाले आहे. त्यांच्यामुळे उत्तर प्रदेशासह संपूर्ण देशात प्रियंका गांधीची लाट येईल व काँग्रेस जास्तीत जास्त जागा जिंकेल, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.
Alliance announcement at any moment: says Chandrakant patil

Post a Comment

 
Top