0
पाटण :

कराड ˆ चिपळूण राज्यमार्गाचा राष्ट्रीय महामार्ग बनविण्यासाठी सध्या सुरू असलेल्या कामात प्रवाशी व वाहनधारकांच्या सुरक्षेचा अक्षरशः खेळखंडोबा चालविला आहे. रस्त्यात किंवा कडेला काढण्यात आलेल्या भल्यामोठ्या जीवघेण्या खड्यांच्या बाजूला लाकडी काटक्या लावून सध्या सगळ्यांच्याच जीवाशी येथे खेळ चालविला आहे.


राज्यकर्ते, शासन, प्रशासन यांचा राजाश्रय लाभल्याने येथे संबंधित कंपनीला कोणीच जाब विचारण्याचे धाडस दाखवीत नाही. आजवर अनेकांचे जीव गेले कित्येक कायमचे जायबंदी झाले यापुढेही ही मालिका अशीच कायम रहाण्याची दाट शक्यता असल्याने यात आता न्यायालयानेच हस्तक्षेप करावा अशी मागणी पुढे येत आहे.

पावसाळ्यात काही दिवस संथ गतीने चाललेल्या कराड ˆ चिपळूण राज्यमार्गाचा राष्ट्रीय महामार्ग बनविण्याच्या कामाला आता पुन्हा गती मिळत आहे. मात्र ही कामे सुरू असताना प्रवाशी व वहातुकदार यांच्या जीवासह वाहनांचीही खबरदारी घेण्याचे सर्व कायदेशीर नियम, निर्बंध संबधितांनी अक्षरशः बास्तानात गुंडाळून ठेवल्याचे भयावह चित्र पहायला मिळत आहे. याच रस्त्यावर सध्या रस्ता कमी आणि खड्डे जास्त अशी अवस्था आहे. त्याचवेळी रुंदीकरणासाठी बाजूला खोदण्यात आलेल्या महाकाय अगदी विहिरीच्या आकाराच्या खड्यांबाबतही संबंधितांकडून कोणत्याही सुरक्षा व्यवस्था करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे या  खड्यात रात्रीच्या अंधारात किंवा पावसाचे पाणी साचल्यास दुचाकीच काय पण चार चाकी वाहन आतील प्रवाश्यांसह गेले तरी त्याचा थांगपत्ता लागणार नाही.

वास्तविक सध्या या एकूण रस्त्यापैकी काम सुरू असलेल्या रस्त्याची व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे ये ˆजा करणार्‍या वाहनांसाठी मुळातच या अरूंद मार्गातून जीवघेणी कसरत करावी लागते. त्यातूनही घसरड्या व निसरड्या रस्त्यावरून वाहनधारकांचा तोल सुटला की थेट वाहनासह खड्यात. वास्तविक अशा ठिकाणी जाड स्टिल अथवा सिमेंटचे खांब त्याला जाड पत्र्याचे अच्छादन जेणेकरून येथे वाहन धडकले तरीही त्याचा मोठा अपघात होणार नाही याची दक्षता घेणे अगदी नियमानुसार बंधनकारक आहे. मात्र हे सर्व नियम गुंडाळून किरकोळ लाकडी काटक्या लावून येथे तकलादू उपाययोजना करण्यात आल्या आहेत. याच रस्त्यावरून दैनंदिन संबंधित बांधकाम, पोलीस, प्रादेशिक परिवहन विभागांचे अधिकारीच नव्हे तर लोकप्रतिनिधी व विरोधी पक्षांची नेतेमंडळी ही ये ˆ जा करत असतात. मात्र त्यांच्या डोळ्यांवर नक्की कोणी व कोणत्या पट्टया बांधल्या आहेत याचे कोडे उलगडत नाही.

Post a comment

 
Top