0
 बेंगळूरू : 

कर्नाटकमध्ये एकीकडे काँग्रेसकडून सरकार स्थिर ठेवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असतानाच स्वपक्षीय दोन आमदरांनी मध्यरात्री तुफानी राडा करत नवीन वादाला जन्म दिला. कमपलीचे आमदार जे. एन. गणेश यांच्यावर खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. होसपेतचे आमदार आनंद सिंह यांना आमदार गणेश यांनी रिसॉर्टवर बेदम मारहाण केली होती. बिदाडी पोलिसांनी गणेश यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. 

दोन आमदारांच्या तुफानी राड्याची काँग्रेसच्या उच्चस्तरीय नेतृत्वाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे.  राड्याची चौकशी करण्यासाठी कर्नाटकचे उप मुख्यमंत्री जी. परमेश्वरा यांच्या नेतृत्वाखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीमध्ये मंत्री कृष्णा बायरे गौडा आणि के. जे. जॉर्ज यांचाही समावेश आहे. आमदार गणेश यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष  दिनेश गुंडू राव यांनी आदेश दिल्यानंतर प्रदेश काँग्रेस महासचिव व्ही वाय. घोरपडे यांनी निलंबनाची कारवाई केली.

जखमी आमदार आनंद सिंह यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यांच्यावर अपोलो रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री मध्यरात्री दोघांमध्ये वाद झाला. आनंद त्यांच्या रुमकडे जात असताना गणेश यांनी वाद घालण्यास सुरुवात केली. गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत आर्थिक मदत केली नसल्याचा आरोप करत गणेश यांनी वाद घातला. गणेश यांनी झाडाच्या कुंडीने मारण्यास सुरूवात केली. आनंद यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये गणेश यांनी डोळ्यावर आणि डोक्यावर पंच मारला. 

Post a Comment

 
Top