0
ठाणे : 

येत्या सोमवारी दि. २१ जानेवारी रोजी खग्रास चंद्रग्रहण होणार आहे, तसेच त्यावेळी ब्लडमून, सुपरमून व वुल्फमून दर्शन असाही योग आला आहे. परंतु खग्रास चंद्रग्रहण आणि ब्लडमूनचे दर्शन भारतातून होणार नाही. मात्र त्या रात्री सुपरमूनचे दर्शन भारतातून होणार असल्याचे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी पुढारीशी बोलताना सांगितले.


या विषयी अधिक माहिती देताना सोमण म्हणाले की, पौष पौर्णिमेच्या दिवशी सोमवार दि. २१ जानेवारी रोजी भारतीय प्रमाण वेळेप्रमाणे सकाळी ९ वाजून ४ मिनिटांपासून दुपारी १२ वाजून २१ मिनिटांपर्यंत हे खग्रास चंद्रग्रहण होणार आहे. परंतु यावेळी चंद्रबिंब आपल्या दृश्य आकाशात नसल्याने हे चंद्रग्रहण भारतातून दिसणार नाही. हे खग्रास चंद्रग्रहण मिडल ईस्ट, आफ्रिका, यूरोप, अमेरिका, ओसेनिआ आणि रशियाचा पूर्वभाग येथून दिसणार आहे. या देशातील खगोलप्रेमी मोठ्या उत्साहाने या घटनेची वाट पहात आहेत. या ठिकाणाहून ब्लडमून, सुपरमून आणि वुल्फमून यांचे दर्शन होणार आहे. पौर्णिमेच्या दिवशी जर चंद्र पृथ्वीच्याजवळ आला तर चंद्रबिंब आकाराने १४ टक्के मोठे व ३० टक्के जास्त प्रकाशित दिसते. या चंद्राला  'सुपरमून' म्हणतात. यावेळी चंद्र पृथ्वीपासून ३ लक्ष, ५७ हजार, ३४२ किमी. अंतरावर येणार आहे. नूतन वर्षातील पहिल्या पौर्णिमेच्या चंद्राला  'वुल्फमून' असे म्हणतात.

भारतातून खग्रास चंद्रग्रहण दिसणार नसले तरी ‘सुपरमून’ दर्शन आपणास होणार आहे. सोमवार दि २१ जानेवारी रोजी पौष पौर्णिमेला चंद्र सायंकाळी ६ वाजून ३९ मिनिटांनी पूर्वेला उगवेल आणि रात्रभर आकाशात दर्शन देऊन दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजून १२ मिनिटांनी मावळेल. त्यारात्री आपणास ‘ सुपरमून ‘ म्हणजे मोठे व जास्त तेजस्वी चंद्रबिंब साध्या डोळ्यांनी पाहता येईल. भारतातून दिसणारे खंडग्रास चंद्रग्रहण १६ जुलै रोजी होणार आहे. तसेच सुपरमून दिसण्याचा योग पुन्हा याचवर्षी माघ पौर्णिमेच्या रात्री १९ फेब्रुवारी रोजी येणार असल्याचेही दा. कृ. सोमण यांनी सांगितले.


Post a Comment

 
Top