0
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टाेक्ती; अहमदनगर मनपात आम्ही न मागताच राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला

मुंबई - नगरच्या महापौर निवडणुकीत आम्ही शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा देण्यास तयार होतो. शिवसेनेला पाठिंबा द्यावा का, अशी माझ्याकडे विचारणा झाली तेव्हा मी प्रस्ताव आल्यास बिनशर्त पाठिंबा द्या, असे सांगितले होते. मात्र, निवडणुकीच्या तीन दिवस आधीपर्यंत प्रस्ताव न आल्याने स्थानिकांना निर्णय घेण्यास सांगितल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.


नगरमध्ये राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने भाजपचा महापौर आणि उपमहापौर झाला. यावरून बरेच राजकीय वादळ उठले असून भाजप-राष्ट्रवादी युतीबाबत प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे. याबाबत मुख्यमंत्री म्हणाले, शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय आम्ही घेतला. मात्र, शिवसेनेकडून कोणताही प्रस्ताव आला नाही.

शिवसेनेच्या नेत्यांनी गिरीश महाजन यांना सांगितले, पाठिंब्याबाबत तुम्ही रामदास कदम यांच्याशी बोला आणि पाठिंबा द्या. मात्र, आम्ही पाठिंबा देण्याचा प्रस्ताव द्या, असे सांगितले. सेनेचे स्थानिक नेते आमच्याशी बोलायला तयार नव्हते. शिवसेनेकडून मागणी होत नसल्याने तुम्ही निर्णय घ्या, असे मी आमच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले होते. त्यानुसार आम्ही महापौर आणि उपमहापौरपदासाठी उमेदवार जाहीर केले आणि आम्हाला राष्ट्रवादीने पाठिंबा दिला. आम्ही त्यांना पाठिंबा मागितला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गडकरींच्या बदनामीचा प्रयत्न होतोय : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली, किशोर तिवारीही टीका करीत आहेत. पुढचे नेते गडकरी असतील का, असा प्रश्न केला असता मुख्यमंत्री म्हणाले, नितीन गडकरींचे वक्तव्य संस्थेच्या कामाबाबत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सगळ्यांचा विश्वास असून ते आमचे नेते आहेत. गडकरीही आमचे नेते आहेत. काही माध्यमे मुद्दाम गडकरी आणि नरेंद्र मोदी यांच्यात वितुष्ट आणू इच्छितात. मात्र, तसे काही होणार नाही. नितीन गडकरी यांची बदनामी करण्याचे थांबवावे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांचाच युतीसाठी मूड नव्हता
मला शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांचा फोन आला होता. त्यांनी युतीबाबत विचारणा केली, आम्हीती युती करण्यास तयार होतोच. तसे मी त्यांना सांगितलेही. पण वाटाघाटी करण्यापूर्वी मी त्यांना विचारले की, तुम्हाला युती करण्याबाबत पूर्ण अधिकार आहेत का? नाहीतर आपण येथे युतीबाबत चर्चा करायचो. निर्णय पूर्ण व्हायचे आणि नंतर पुन्हा सारं फिस्कटायचे. त्यामुळे प्रथम तुम्ही तुमच्या वरिष्ठांशी बोलून घ्या. त्यांचे काय मत आहे ते कळवा, त्यानंतर आपल्याला पुढे जाता येईल. हे बोलणे झाल्यानंत मी सुजित राठोडांना त्यांच्याशी बोलायलाही सांगितले. त्यांचेही बोलणे झाले. माझेही त्यांनी बोलणे करुन दिले. त्यावेळी रामदास कदमांकडून निर्णय येणे बाकी असल्याचे सांगण्यात आले. वारंवार अनिल राठोडांशी बोलणे करुनही रामदास भाईंचा मूडच दिसत नव्हता, असे मला समजले. पण शिवसेनेकडूनच प्रतिसाद मिळत नव्हता, त्यामुळे बोलणी पुढे झालीच नाहीत. आमच्या पक्षांच्या जागा कमी होत्या. तेथे शिवसेना आमच्यापेक्षा मोठा पक्ष असल्याने युती करण्याबाबत आम्हाला कुठलीही अडचण नव्हती. - गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री

राधाकृष्ण विखेंना पाठवली नोटीस
मुंबई विकास अाराखड्यात १ लाख कोटी रुपयांच्या घाेटाळ्याचा आरोप करणारे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी माफी मागावी, अन्यथा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करू, अशी नोटीस सोमवारी पाठवल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्री म्हणाले, डीपी मनपा तयार करते. हरकती-सूचना मागवते. त्यानंतर समिती त्यावर निर्णय घेते. सरकारने २५००० नव्हे, तर फक्त १४ सूचना केल्या होत्या.

भाजपची भूमिका अगोदरच ठरली होती
महापौर निवडीच्या वेळी जलसंपदा मंत्री नगरमध्ये सकाळीच आल्यानंतर ते राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दादा कळमकर यांच्याकडे चहा-पाणी घेण्यासाठी गेले. त्यांना त्या वेळी शिवसेनेकडे येता आले असते. परंतु, भाजपने अगोदरच भूमिका ठरवलेली होती. पण केवळ आता हे लपवण्यासाठी काही तरी बोलत आहेत. ज्यांच्या कमी जागा, त्यांनी पुढे यायला हवे होते. - अनिल राठोड, माजी आमदार, शिवसेना तथा उपनेते.
Devendra Fadnvis comment about Ahmednagar mayor Election

Post a Comment

 
Top