0
चार विधिसंघर्षीत बालकांनी चाकू, कोयता आणि चॉपरने वार करून पाप्याच्या खून प्रकरणातील संशयित चेतन पवारचा खून केला होता.

नाशिक- सराईत गुन्हेगार पाप्या शेरगिलच्या खुनाचा बदला घेणाऱ्या हरीष शेरगिल, ललित राऊत या दोन सराईतांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. गुरुवारी (दि. १७) अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. जी. गीमेकर यांनी ही शिक्षा सुनावली. १९ ऑगस्ट २०१७ मध्ये सायंकाळी चार वाजता तिबेटीन मार्केटमध्ये दोन आरोपींसह चार विधिसंघर्षीत बालकांनी चाकू, कोयता आणि चॉपरने वार करून पाप्याच्या खून प्रकरणातील संशयित चेतन पवारचा खून केला होता.

अभियोग कक्ष विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पंचवटीतील सराईत गुन्हेगार पाप्या शेरगिल याच्या खून प्रकरणात मयत चेतन पवार (विधीसंघर्षित) हा आई-वडील आणि भावासह खटल्याच्या सुनावणीकरीता बाल न्यायालयात आला होता. खटल्याचे कामकाज झाल्यानंतर कपडे खरेदीसाठी ताे तिबेटीयन मार्केट, शरणपूररोड येथे गेला असता आरोपी हरीष राजू शेरगिल उर्फ हऱ्या, ललीत सुरेश राऊत उर्फ लाल्या (दोघे रा. फुलेनगर) आणि चार विधिसंघर्षित बालकांनी संगनमत करत पाप्याच्या खुनाचा बदला घेण्याच्या उद्देशाने चाकू, चॉपर, कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. यात चेतन गंभीर जखमी झाला. आई-वडिलांनाही मारहाण करण्यात आली. उपचारादरम्यान चेतनचा मृत्यू झाला. सरकारवाडा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला. सहायक निरीक्षक विलास शेळके यांनी आरोपींविरोधात सबळ पुरावे गोळा केले, न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायाधीश गिमेकर यांनी फिर्यादी, साक्षीदार, पंच आणि तपासी अधिकारी यांनी सादर केलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरून जन्मठेप सुनावली. सरकार पक्षातर्फे अॅड. रवींद्र निकम यांनी कामकाज पाहिले. पैरवी अधिकारी सहायक निरीक्षक समाधान वाघ, रवींद्र पानसरे, व्ही. एन. लांडे, आर. आर. जाधव यांनी पाठपुरावा केला.

Life imprisonment for two accused who took revenge

Post a Comment

 
Top