0
मुंबई :

बेस्ट बेमुदत संप दुसर्‍याच दिवसापासून चिघळण्यास सुरुवात झाली असून, या संपाचा झटका मुंबईकरांप्रमाणेच शिवसेनेलाही बसला. शिवसेनेच्या बेस्ट कामगार सेनेने संपातून माघार घेतल्यानंतर मुंबईत किमान 30 ते 40 टक्के बस धावू लागतील, हा अंदाज चुकीचा ठरला. शिवसेनेचे कट्टर समर्थक असलेल्या चालक व वाहकांनीच सेनेला साथ न दिल्यामुळे दिवसभरात जेमतेम 12 ते 13 बस आगाराबाहेर पडल्या. परिणामी, बुधवारीही बसवर अवलंबून असलेल्या सामान्य मुंबईकरांना त्रास सहन करावा लागला. सुमारे 11 हजार सदस्य असलेल्या शिवसेनेच्या बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी संपातून बाहेर पडण्याची घोषणा केली होती. बुधवारी 500 हून जास्त बस रस्त्यावर धावतील, असा दावाही त्यांनी केला होता. पण शिवसेनेच्या या निर्णयाला कट्टर शिवसैनिक असलेल्या त्यांच्या सदस्यांनीच विरोध करीत संपाला पाठिंबा कायम ठेवला.

परिणामी, प्रत्यक्षात तीन बसदेखील रस्त्यावर आल्या नाहीत.  त्यामुळे आमच्यामुळे संप यशस्वी होतो, असे छातीठोकपणे सांगणार्‍या शिवसेनेची नाचक्की झाली. एवढेच नाही तर या संपामुळे बेस्टमध्ये गेल्या 40 वषार्ंपासून असलेल्या शिवसेनेच्या वर्चस्वाला मोठा धक्का बसला आहे.  बेस्टचा हा संप शिवसेनेच्या हातातून निसटला असून, एवढेच नाही तर, बेस्टमधील अस्तित्वही धोक्यात आले. सकाळी एसटी व खाजगी बस उपनगरांतील काही भागात सुरू होत्या. पण त्याचा फारसा फायदा झाला नाही. शेअर रिक्षा व टॅक्सी चालकांची लुटमारी बुधवारीही सुरूच होती. ओला व उबर टॅक्सीही वेळेत उपलब्ध होत नव्हत्या. पश्‍चिम व मध्य रेल्वेने बुधवारीही विशेष लोकल चालवल्यामुळे प्रवाशांना काहीअंशी दिलासा मिळाला.

निवासस्थाने खाली करा : बेस्टची नोटीस

संपामुळे बेस्टचे होणारे आर्थिक नुकसान तर दुसरीकडे मुंबईकरांना होणारा त्रास लक्षात घेऊन, बेस्ट प्रशासनाने दबावतंत्राचा वापर करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे बुधवारी कर्मचार्‍यांना बेस्टचे निवासस्थान खाली करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीसीमुळे कर्मचार्‍यांचे कुटुंब रस्त्यावर आल्यामुळे भोईवाडा व परळ येथे काहीकाळ नोटीस बजावण्यात आलेल्या अधिकार्‍यांसमवेत कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांनी वाद घातला. त्यामुळे पोलीसांना पाचारण करण्यात आले.

बेस्टचा संप कोर्टाने बेकायदेशिर ठरवला आहे. त्यामुले संपावर जाणार्‍या कर्मचार्‍यांवर मेस्मा कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. यात कर्मचार्‍यांना निलंबित करण्यासह बडतर्फ करण्याचा विचारही प्रशासनाने केला आहे. तशसा नोटीसाही देण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. त्याअगोदर जे कर्मचारी बेस्ट वसाहतीत राहत आहेत. अशा कर्मचार्‍यांना कामावर हजर राहण्याचे आदेश दिले आहे. अन्यथा आपले निवासस्थान खाली करा, अशी नोटीसच बजावली आहे. या नोटीसा सुमारे 2 हजाराहून जास्त कामगारांचया हाती पडल्याचे बोलले जात आहे. भोईवाडा व परळ येथील बेस्ट वसाहतीमधील कर्मचार्‍यांना बजवण्यात आलेल्या नोटीसनंतर येथील वातावरण चांगलेच तापले. कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांनी वसाहतीखाली उतरून प्रशासनाच्या या कृतीचा निषेध केला.

आमच्या प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारणे हा आमचा अधिकार आहे. त्यामुळे आम्हाला बेघर करण्याची धमकी देऊन, संप हाणून पाडण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा यावेळी कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांनी दिला. नागरिकांच्या विशेषत: महिलांच्या आक्रमक पावित्र्यामुळे अखेर पोलीसांना पाचारण करण्यात आले. त्यामुळे या वादावर पडला पडला असला तरी, नोटीस बजावण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या एका अधिकार्‍याने सांगितले. संप बेकायदेशिर असल्यामुळे ही कारवाई करण्यात येत असून लवकर कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई केली जाणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.

संपाच्या काळात विद्यापीठाचा दिलासा

बेस्ट कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संपाचा फटका सलग दुसर्‍या दिवशीही जाणवला असल्याने मुंबई विद्यापीठाने त्यासंदर्भात आवश्यक त्या सूचना केंद्रप्रमुख आणि प्राचार्यांना बुधवारी ही जारी केल्या. परीक्षा सुरु असल्याने संपाच्या काळात विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यास उशीर झाल्यास अशा वेळी परीक्षा केंद्रप्रमुख आणि प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेस बसू द्यावे, अशी सूचना विद्यापीठाकडून जारी करण्यात आली होती. सोबतच एखादा विद्यार्थी आपल्या मूळ परीक्षा केंद्रावर पोहचू शकला नाही तर त्याला जवळच्या केंद्रावर परीक्षा देण्याची मुभा द्यावी अशा सूचना ही विद्यापीठाने दिल्या होत्या.

परीक्षा विभागाचे कामकाज बंद राहणार

मुंबई विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ 11 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता कावसजी जहांगीर सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे. यामुळे 11 जानेवारी रोजी परीक्षा विभागाचे कामकाज बंद राहणार असल्याचे पत्रक विद्यापीठाकडून जारी करण्यात आले आहे. या दिवशी या विभागाकडून कोणतेही गुणपत्रक, प्रमाणपत्रे आणि उत्तीर्ण  झाल्याचे दाखले इत्यादी देण्याचे कामकाज बंद राहील असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक अर्जुन घाटुळे यांनी परिपत्रकातून माहिती दिली.

Post a comment

 
Top