0
मुंबई :

सांगली लोकसभा मतदारसंघात आमदार डॉ. विश्‍वजित कदम यांनीच लढत द्यावी, असा आग्रह  मंगळवारी मुंबईत काँग्रेस संसदीय समितीच्या बैठकीत अनेक सदस्यांनी धरला, असे विश्‍वसनीय सूत्रांकडून समजते. दरम्यान, सांगलीत काँग्रेसचाच खासदार निवडून यावा, यासाठी प्रदेश समितीसह मित्र पक्षांमधूनही विश्‍वजित कदम यांच्याच नावाला पसंती दिली जात आहे, असे समजते. त्यामुळे  डॉ. कदम यांच्याच नावाची दिल्लीत शिफारस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.


संसदीय समितीच्या बैठकीपूर्वी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांना मुंबईत बोलावून घेतले होते. त्यावेळी त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत त्यांची मते जाणून घेतली होती. या बैठकीस  माजी मंत्री प्रतीक पाटील, आमदार विश्‍वजित कदम, आमदार मोहनराव कदम, शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, युवा नेते विशाल पाटील, जयश्री पाटील, माजी आमदार सदाशिवराव पाटील, नामदेवराव मोहिते उपस्थित होते.

जिल्ह्यातील नेत्यांसोबत बैठक झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी या सर्वांची वैयक्तिक मतेही जाणून घेतली होती. त्यावेळी विश्‍वजित कदम, मोहनराव कदम, जयश्री पाटील आणि विशाल पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला होता. त्यामुळे प्रदेश काँग्रेससमोर प्रतीक पाटील, पृथ्वीराज पाटील आणि नामदेवराव मोहिते अशी तीन इच्छुकांची नावे होती.

राष्ट्रवादीकडूनही कदम यांनाच हिरवा कंदील?

दरम्यान काँग्रेसचा मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने विश्‍वजित कदम यांच्याच नावाला पसंती  असल्याचे स्पष्ट केले आहे. याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली असून कदम यांनाच उमेदवारी दिल्यासच सांगलीची जागा आघाडीकडे येऊ शकते असेही सांगितले आहे. त्यामुळेच मंगळवारी झालेल्या बैठकीत जयंत पाटील यांच्या मताची दखल घेत विश्‍वजित कदम यांचेच नाव सांगलीच्या जागेसाठी निश्‍चीत करण्यासाठी समितीतील सदस्यांनी आग्रह धरल्याचे समजते.

चार नावांची चर्चा; मात्र कदम यांच्यासाठी आग्रह

मुंबईत मंगळवारी झालेल्या संसदीय समितीच्या बैठकीत विश्‍वजित कदम, प्रतीक पाटील, विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील या नावांबाबत चर्चा झाल्याचे समजते. मात्र, संसदीय समितीच्या बहुसंख्य सदस्यांनी सांगली लोकसभेची जागा जिंकायची असेल तर विश्‍वजित कदम यांनाच उमेदवारी द्यावी, असा आग्रह धरल्याचे समजते.

Post a comment

 
Top