0
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बुलडाणा जिल्ह्यात आंदोलन

चिखली- मागील वर्षी विकलेल्या उडीद, मूग, हरभरा व तुरीचे पैसे अद्यापही शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. यासंदर्भात वेळोवेळी निवेदन देऊन तसेच आंदोलन करूनही पैसे मिळत नसल्याने संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथे जिनिंग प्रेसिंगचे कार्यालयच पेटवून दिले.

स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, नाफेडची सब एजन्सी म्हणून चिखली जिनिंग प्रेसिंगची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशन व विदर्भ मार्केटिंग फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चिखली येथे शेतकऱ्यांचे उडीद, मूग, तूर, हरभरा खरेदी करण्यात आले होते. मागील वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात खरेदी करण्यात आलेल्या उडीदाचे पैसे अजूनही शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. तसेच मागील मार्च महिन्यातील खरेदी केलेल्या तुरीचे व हरभऱ्याचे पैसे सुद्धा अद्याप शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. त्यामुळे या भागातील शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. वारंवार विनंती करुनही, निवेदनही देऊनही चिखली जिनिंग प्रेसिंगचे अधिकारी पैसे देण्यास टाळाटाळ करत आहेत. याबाबतची तक्रार काही शेतकऱ्यांनी संघटनेकडे केली हाेती. त्यानंतर संघटनेने वेळोवेळी प्रशासनाला निवेदने देवून तसेच आंदोलने करून सुद्धा प्रशासनाने कोणतीच कारवाई केली नाही. याउलट पैसे न देता 'तुमचा माल घेवून जा', अशा शेतकऱ्यांना धमक्या देत होते.

दरम्यान, काही शेतकऱ्यांनी येथून माल नेण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी दिलेल्या चांगल्या मालाच्या बदल्यात त्यांना निकृष्ट दर्जाचा माल देण्यात आला. त्यामुळे शेतकरी प्रचंड संतापले होते. याशिवाय तुरीची नोंदणी करूनसुद्धा ऑनलाइन ऑफलाइनच्या घोळामध्ये माल घेतला नाही. शिवाय, अनुदानाची रक्कमही मिळाली नाही. या संपूर्ण पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी आंदोलनाचे आयोजन केले होते. आमच्या काही कार्यकर्त्यांनी मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास चिखली येथील जिनिंग प्रेसिंगच्या कार्यालयाच्या दारावर रॉकेल टाकून पेटवल्याचा त्यांनी दावा केला आहे.

बुलडाणा जिल्ह्यात तीन एसटी बसेसची तोडफोड
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून बुलडाणा, भेंडवळ फाटा, चांगेफळ फाटा येथे एसटी बसेसची तोडफोड करण्यात आली तसेच ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलनही केले. या वेळी शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी स्थानबद्ध करून नंतर त्यांची सुटका केली. आंदोलनामुळे अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची व आंदोलनाची तत्काळ दखल न घेतल्यास हे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा स्वाभिमानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिला.
Swabhibani Shetkari Workers Fire Office and 3 ST Bus Broken in Chikhali Buldana

Post a Comment

 
Top