0
नवी दिल्ली ः

आगामी लोकसभा निवडणूक म्हणजे एकप्रकारे वैचारिक युद्ध आहे, ही दोन विचारधारांची लढाई आहे. 2019 ची लोकसभा निवडणूक देशाच्या विकास यात्रेसाठी अतिशय महत्त्वाची आहे. 2014 साली मिळालेल्या विजयापेक्षाही प्रचंड मोठा विजय 2019 मध्ये मिळेल आणि नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान होतील, असा विश्‍वास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी दिल्लीतील रामलीला मैदानात व्यक्‍त केला. यावेळी शहा यांनी ‘अब की बार, फिर मोदी सरकार’ अशी घोषणा देत लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले.भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनास शुक्रवारी दिल्लीतील ऐतिहासिक रामलीला मैदानात प्रारंभ झाला. देशभरातील भाजपचे सुमारे बारा हजार पदाधिकारी-कार्यकर्ते अधिवेशनास उपस्थित आहेत. शुक्रवारी दुपारी चार वाजता अधिवेशनाची सुरुवात झाली, पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी उद्घाटनाचे भाषण केले. यावेळी व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, अर्थमंत्री अरुण जेटली, दळणवळण मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय  मंत्री जेपी नड्डा, राष्ट्रीय संघटनमंत्री रामलाल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसुंधराराजे, शिवराजसिंह चौहान आणि रमण सिंह,  यांच्यासह सर्व भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री उपस्थित होते. ‘वंदे मातरम्’ने अधिवेशनास प्रारंभ झाला. पंतप्रधान मोदी शनिवारी अधिवेशनात समारोपाचे भाषण करणार आहेत.
विकास आणि प्रगतीचा संकल्प
शहा म्हणाले की, देशातील सामान्य जनता, तरुण वर्ग, गरीब वर्ग या सर्व घटकांसाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. विकासाचा आणि प्रगतीचा संकल्प घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) निवडणुकीस सामोरे जाणार आहे. याउलट विरोधकांकडे नेता आणि नीती या दोहोंचाही अभाव आहे. त्यामुळे 2014 पेक्षाही प्रचंड मोठा विजय 2019 मध्ये मिळेल, यात मला कोणतीही शंका वाटत नाही.
देशात परिवर्तनास सुरुवात
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली पाच वर्षांच्या कार्यकाळात देशात परिवर्तनास सुरुवात झाल्याचे शहा यांनी सांगितले. ते म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर 1947 ते 2014 या काळात अपवाद वगळता पंचायत ते संसदेत एकाच कुटुंबाची सत्ता होती. मात्र, तरीदेखील देशातील नागरिकांच्या जीवनात अपेक्षित बदल घडले नाहीत. मोदी सरकारने पाच वर्षांत सहा कोटींहून अधिक कुटुंबांना एलपीजी जोडणी दिली, नऊ कोटींहून अधिक शौचालयांची निर्मिती झाली. अडीच कोटी कुटुंबापर्यंत वीज पोहोचली नव्हती, पाच वर्षांत त्यातील 95 टक्के कुटुंबांना वीजजोडणी दिली आहे. आयुष्यमान भारत योजनेमार्फत 50 कोटी लोकांना आरोग्य विमा देण्यात आला आहे. पाच वर्षांत सीमापार घुसखोरी कमी झाली, नक्षलवादाची अखेर होत आहे. केवळ सत्ता चालविणे हे भाजपचे ध्येय नाही, देशास पुढे नेण्यासाठी आणि जागतिक व्यासपीठावर देशाचा गौरव वाढविण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे.
आठवड्यात दोन महत्त्वपूर्ण निर्णय
मोदी सरकार अतिशय कार्यक्षम असल्याचे सांगत शहा पुढे म्हणाले की, मोदी सरकारने एका आठवड्यात दोन महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. पहिला निर्णय म्हणजे 124 वी घटनादुरुस्ती करून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आरक्षण देणे. देशाच्या इतिहासातील ही अतिशय ऐतिहासिक अशी घटना आहे. देशातील लाखो तरुणांना यामुळे दिलासा मिळणार आहे. दुसरा महत्त्वाचा निर्णय म्हणजे गुरुवारी 40 लाखांपर्यंत उलाढाल असलेल्यांना जीएसटी नोंदणीतून देण्यात आलेली सूट, यामुळे छोट्या व्यापार्‍यांना दिलासा मिळाला आहे.
विरोधी पक्ष, विशेषतः महाआघाडीच्या प्रयत्नांवर टीका करताना शहा म्हणाले की, एकमेकांचे तोंडही न पाहणारे पक्ष आज भाजपविरोधात एकत्र येण्याची भाषा बोलत आहेत. याचा अर्थ म्हणजे त्यांनी भाजपची क्षमता आणि शक्‍ती याबद्दल धसका घेतला असून, येथेच भाजपचा विजय झाला आहे, हे स्पष्ट होते.
लोकसभेच्या सर्वाधिक जागा असलेल्या उत्तर प्रदेशचा संदर्भ देत शहा म्हणाले की, उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 80 पैकी 73 जागा गेल्यावेळी जिंकल्या होत्या. 2019मध्ये भाजप 74 जागांवर विजय मिळवेल, असा आत्मविश्‍वासही शहा यांनी व्यक्‍त केला.
चौकीदार पकडणार
सर्व चोर...
काँग्रेसच्या ‘चौकीदार चोर है’ या घोषणेस शहा यांनी यावेळी जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, राफेलप्रकरणी राहुल गांधी यांनी बेछूट आरोप केले, पंतप्रधान मोदींवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले, तेथे सर्वोच्च न्यायालयाने राफेलमध्ये काहीही काळेबेरे नसल्याचे स्पष्ट केले. आरोप करणार्‍यांनी न्यायालयात पुरावे मात्र दिले नाहीत, त्यांना केवळ आरोप करणेच जमते. ऑगस्टा घोटाळ्यातील दलाल ‘मिशेलमामा’ पकडला गेल्यावर त्याने अनेक खुलासे केले आहेत. राहुल गांधी यांनी स्वतःच्या चार पिढ्यांच्या भ्रष्टाचाराकडे आणि यूपीएच्या कार्यकाळातील 12 लाख कोटींच्या भ्रष्टाचाराविषयी उत्तर द्यावे. नीरव मोदी, विजय मल्ल्या, मेहूल चोक्सी यांना काँग्रेसच्या कार्यकाळात बेसुमार कर्जे देण्यात आली आणि मोदी सरकारने कठोर कायदे केल्यामुळे त्यांनी पलायन केले. देशाचा चौकीदार सर्व चोरांना पकडून आणेल, हे राहुल गांधी यांनी ध्यानात घ्यावे.
अटल-अडवाणी यांचे योगदान अनन्यसाधारण
माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीस शहा यांनी उजाळा दिला. अटलजी सोबत नसणारे हे भाजपचे पहिलेच अधिवेशन आहे, अटलजींनी जनसंघापासून नेतृत्व केले आहे. त्यांच्या विचारांवर आपली वाटचाल सुरू आहे. अटलजी आणि अडवाणीजी यांच्या जोडीने अपार कष्ट करीत भाजपला देशाच्या कानाकोपर्‍यात पोहोचविले, त्यांच्या कष्टाची तुलना होणे शक्य नाही.
निर्मला सीतारामन यांचे भाषण जरूर ऐका!
राफेलप्रकरणी संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संसदेत केलेल्या भाषणाचे शहा यांनी तोंडभरून कौतुक केले. त्यातही सीतारामन यांचे विशेष कौतुक करीत, सीतारामन यांचे भाषण कार्यकर्त्यांनी यूट्युबद्वारे आवर्जून ऐका, असे आवाहनही केले.
अयोध्येत भव्य राम मंदिर व्हावे, हीच भाजपची इच्छा!
राष्ट्रीय अधिवेशनात राम मंदिराविषयी शहा यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, अयोध्येत भव्य राम मंदिराची उभारणी व्हावी, यासाठी भाजप कटिबद्ध आहे. प्रकरण न्यायालयात आहे, न्यायालयात लवकरात लवकर निकाल लागावा, अशी आमची इच्छा आहे. मात्र, काँग्रेस पक्ष त्यात जाणीवपूर्वक अडथळे आणत आहे. संवैधानिक मार्गाने राम मंदिराची उभारणी करण्यासाठी भाजप कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार शहा यांनी केला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी रामनामाचा गजर करीत शहा यांना
प्रतिसाद दिला.
शेतकरी हितासाठी झटणारे मोदी सरकार ः फडणवीस
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोदी सरकारने कृषीक्षेत्रात केलेले बदल आणि राज्यास झालेला फायदा, याविषयी माहिती दिली. ते म्हणाले की, मोदी सरकारने शेती व शेतकरी यांच्यासाठी अतिशय चांगले धोरण अवलंबविले आहे. शेतीचे यांत्रिकीकरण केले, अडत्यांचा प्रश्‍न सोडविला, पीकविमा योजना आणली. गेल्या पाच वर्षांत सरकारने हे सर्व केले. 2022 पर्यंत शेतकरी उत्पन्‍न दुप्पट होणार, हे नक्‍की.
पंतप्रधान कृषी सिंचन योजना अतिशय यशस्वी ठरली आहे. महाराष्ट्रास याचा फायदा झाला आहे. राज्यातील 16 लाख एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे. राज्याच्या इतिहासात सर्वाधिक निधी मोदी सरकारने दिला आहे. राज्यात खतांसाठी व बियाण्यांसाठी चार वर्षांत कधीही रांगा लागल्या नाहीत. हमीभावाची मागणी मोदी सरकारने पूर्ण केली. ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्याही समस्या मोदी सरकारने सोडविल्या,  असे ते म्हणाले.
सर्वाधिक धान्यखरेदी आमच्या सरकारने केली, शेतकर्‍यांना त्रास होऊ नये, असे आदेश आम्हाला मोदी सरकारचे होते. अतिशय शेतकरीस्नेही धोरणे मोदी सरकारने राबविली आहेत. पीकविमा योजनेवर राहुल गांधी आणि त्यांचे सहकारी अज्ञान आणि राजकारण करण्यासाठी टीका करीत असल्याचेही फडणवीस म्हणाले.  


सर्वाधिक वाचलेले

बेस्टचा संप मोडीत काढणार, दोन हजार खासगी बस सेवेला

पुणे : चोरट्यांच्या हल्‍ल्यात एक ठार

भारतात गेल्‍या साडेचार वर्षात असहिष्णुतेचा कळस : राहुल गांधी

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात हिंदू महिलेने फुंकले रणशिंग!

ब्लॉकमुळे एक्स्प्रेस गाड्या रद्द, लोकल उशिरा धावणारPost a Comment

 
Top