महाराष्ट्रासह परराज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या पुसेगाव येथील श्री सेवागिरी महाराजांच्या रथावर एकाच दिवसात ५६ लाख १३ हजार ६४ रुपये मोठ्या भक्तीभावाने अर्पण करण्यात आले. भाविकांनी अर्पण केलेल्या देणगीत परदेशी चलनाचा ही मोठ्या प्रमाणात समावेश असल्याचे देवस्थान ट्रस्टकडून सांगण्यात आले.
शुक्रवारी सेवागिरी महाराजांचा रथोत्सव लाखो भाविकांच्या उपस्थितीत अभूतपूर्व उत्साहात पार पडला. पुसेगाव नगरीला प्रदक्षिणा घालून रात्री उशीरा रथ मंदिरात आणण्यात आला. दिवसभर भाविकांनी मोठ्या श्रद्धेने रथावर अर्पण केलेल्या नोटांच्या माळा पोलिस बंदोबस्तात नारायणगिरी भक्तनिवासात नेण्यात आल्या. मठाधिपती सुंदरगिरी महाराज, देवस्थान ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश जाधव सर्व विश्वस्तांच्या उपस्थितीत विविध बॅंका, पतसंस्था कर्मचाऱ्यांनी देणगी रक्कम मोजली. रक्कम मोजण्याचे काम पहाटेपर्यंत सुरु होते.
या रथावर एकाच दिवसात भाविकांनी ५६ लाख १३ हजार ६४ रुपये अर्पण केले. जमलेल्या देणगीत डॉलर, दिनार, पौंड आणि इतर परदेशी चलनाचा समावेश आहे. यात्रा कालावधीत पुढील पाच दिवसात येणाऱ्या भाविकांकडूनही रथावर देणगी अर्पण केली जाणार आहे.

Post a Comment