0
डॉ. रोहन जहागीरदार, मानसोपचारतज्ज्ञ

मोबाईल दिला नाही म्हणून नुकतंच मिसरूड फुटलेल्या आणि उद्याचं भविष्य घडवण्याची उमेद असणार्‍या मुलांनी आत्महत्येचं पाऊल उचलल्याच्या घटना महाराष्ट्रात गेल्या महिन्याभरात घडल्या आहेत. मने सुन्‍न करणार्‍या या घटनांमुळे पालकांमध्ये प्रचंड चिंतेचे वातावरण असणे स्वाभाविक आहे. या प्रश्‍नाचा आणि त्यावरील उत्तराचा ऊहापोह करताना काही मुद्दे विचारात घ्यावे लागतील.

माहिती-तंत्रज्ञानाचा झपाट्याने विस्तार होत चाललेल्या युगामध्ये आणि या तंत्रज्ञानानं अवघं मानवी विश्‍व व्यापून टाकलेल्या काळामध्ये एका बाजूला जीवनातील अनेक गोष्टी सुकर होत चाललेल्या असतानाच, त्यातून काही नवे प्रश्‍नही जन्माला येत आहेत. हे प्रश्‍न अनेकांगी आहेत. गुंतागुंतीचे आहेत. त्यांना वेगवेगळे आयाम आहेत. ते वैयक्‍तिक, कौटुंबिक, सामूहिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय अशा व्यापक स्वरूपाचे आहेत. विशेषतः, बदलत्या काळात संगोपनाबाबतचे प्रश्‍न सातत्यानं पुढं येत आहेत. मुलांना मोबाईल द्यायचा की नाही, तो कोणत्या वयात द्यायचा, किती काळ वापरायला द्यायचा, मुलांकडून त्याच्या होणार्‍या अतिवापरावर नियंत्रण कसं ठेवायचं, मुलांचा हिंसकपणा का वाढत चालला आहे, मोबाईल वापरास मनाई केल्यामुळं मुलं टोकाचं पाऊल का उचलत आहेत आदी अनेक प्रश्‍न पालकांना संभ्रमात टाकत आहेत. यासंदर्भात विविध स्तरांवरून प्रबोधन होत असलं, तरी ते पुरेसं नसल्याचं दिसून येत आहे. अलीकडेच पुण्यासह महाराष्ट्रामध्ये घडलेल्या विविध घटनांनी हे सर्व प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत.

घटना क्रमांक 1 :

यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर गावात मोबाईल विकत घेऊन दिला नाही, या क्षुल्लक कारणावरून 14 वर्षांच्या मुलाने गळफास लावून आत्महत्या केली आहे. हा मुलगा नववीमध्ये शिकत होता आणि आई-वडिलांकडे गेल्या अनेक दिवसांपासून मोबाईल विकत घ्या, असा हट्ट करत होता. आत्महत्या करणार्‍या मुलाचे वडील हे शतकरी असून त्यांची झुंझारपूर इथे शेती आहे. त्यांचा मुलगा अँड्रॉईड मोबाईल पाहिजे म्हणून गेले काही दिवस हट्ट करीत होता.

घटना क्रमांक 2 :

पुण्यातील धनकवडी येथे आईने मोबाईलवर गेम खेळू दिला नाही म्हणून 13 वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याची धक्‍कादायक घटना घडली. या मुलाला मोबाईलवर गेम खेळण्याचे व्यसन जडले होते, अशी माहिती माध्यमांतून पुढे आली आहे. अभ्यास कर, मोबाईलवर खेळू नको, अशा शब्दांत आईने या मुलाला खडसावले; पण ते सहन न झाल्याने या मुलाने गळफास लावून घेत आपले जीवन संपवले.

घटना क्रमांक 3 :

नागपूरमधील इयत्ता नववीत शिकणार्‍या एका विद्यार्थ्याने आई-वडिलांनी मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून आत्महत्या केली. या मुलाची कौटुंबिक स्थिती हालाखीची आहे. आई-वडील दोघेही मोलमजुरी करतात. मुलाला स्वत:च्या पायावर उभे करायचे हे स्वप्न दोघांनीही उराशी बाळगले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या मुलाने मोबाईलसाठी हट्ट धरला होता; पण इच्छा असूनही परिस्थिती नसल्याने ते मोबाईल घेऊन देऊ शकत नव्हते. त्यामुळे ते मुलाच्या मागणीकडे कानाडोळा करत असत. या प्रकारामुळे चिडून जाऊन मुलाने आत्महत्या केली.

घटना क्रमांक 4 :

जळगावमधील एका घटनेत आईने नवीन मोबाईल विकत घेऊन दिला नाही म्हणून भांडण करीत रागाच्या भरात एका 23 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या मुलाकडे आधीपासून दोन मोबाईल होते; पण आणखी एक मोबाईल घेऊन देण्याचा त्याने आईकडे हट्ट केला. यावरून झालेल्या भांडणातून चिडून जाऊन त्याने आपले जीवन संपवले
सर्वांचीच मने सुन्‍न करणार्‍या या घटना केवळ गेल्या महिन्याभरात घडलेल्या आहेत. त्यामुळे पालकांमध्ये प्रचंड चिंतेचे वातावरण असणे स्वाभाविक आहे. या प्रश्‍नाचा आणि त्यावरील उत्तराचा ऊहापोह करताना काही मुद्दे विचारात घ्यावे लागतील.

सर्वप्रथम या घटनांमधील मुले-तरुण हे सामान्य मन:स्थितीतील होते आणि केवळ रागाच्या भरात जाऊन त्यांनी हे पाऊल उचलले की, त्यांना एखादा मानसिक आजार होता, ते तणावात होते, हे पाहणे आवश्यक आहे. म्हणजेच मोबाईल घेण्यास अथवा वापरास नकार ही केवळ एकमेव घटना त्यांना आत्महत्येच्या फासापर्यंत जाण्यास प्रवृत्त करून गेली की, आधीपासूनच असलेल्या तणावाच्या, रागाच्या पार्श्‍वभूमीवर ती उंटाच्या पाठीवरची शेवटची काडी ठरली, हे पाहावे लागेल.

एक गोष्ट स्पष्ट आहे की, आजकालच्या जगामध्ये मोबाईल हे उपकरण अन्‍न, वस्त्र, निवारा यांच्याबरोबरीने; किंबहुना त्याहून अधिक महत्त्वाचे बनले आहे. सांप्रतकालीन मानवी आयुष्याचा मोबाईल हा अविभाज्य घटक बनला आहे. संपर्कापासून आर्थिक व्यवहारापर्यंत सर्वच गोष्टी या मोबाईलवर विसंबून आहेत. तरुण मुलांचा विचार करता मोबाईल, स्मार्टफोन आणि त्यावरील इंटरनेटच्या सहाय्याने सोशल मीडियाच्या विश्‍वात आजची समस्त तरुण पिढी रममाण होत आहे. हे जग आभासी असलं, तरी या व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये प्रत्येकाचं एक स्वतंत्र अस्तित्व बनलेलं आहे. फेसबुक, व्हॉटस् अ‍ॅप, इन्स्टाग्राम आदींवरील स्टेटस, मेसेजेस, फॉलोअर्स यांची मोहिनी इतकी मोठी बनत गेली आहे की, त्यामुळे ही तरुण मुले एकाच वेळी रिअल वर्ल्ड आणि व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये जगत आहेत. बर्‍याच घटनांमध्ये हे आभासी वास्तव मुलांसाठी खर्‍या आयुष्यापेक्षाही महत्त्वाचे वाटत असल्याचे दिसून आले आहे.

उदाहरणार्थ, एखाद्या पालकाला आपल्या मुलाला शाळेतून आणण्यासाठी 5 वाजता जायचे असेल आणि काही कारणास्तव त्याला उशीर होत असेल तर त्यावेळी त्याची जशी तडफड होते, घालमेल होते तशीच घालमेल सोशल मीडियाशी जोडलेल्या या तरुणांची होते. तेथे स्टेटस अपडेट केले नाही, फोटो शेअर केले नाहीत, सेल्फी काढून पोस्ट केले नाहीत तर त्यांना अस्वस्थता वाटते. यालाच वैद्यकीय परिभाषेत व्यसन किंवा अ‍ॅडिक्शन म्हटलं जातं. आज इंटरनेट अ‍ॅडिक्शन डिसऑर्डरने ग्रासलेल्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. मुलांमध्ये इंटरनेटचे व्यसन जडण्यास एक प्रमुख कारण म्हणजे वेगवेगळ्या ऑनलाईन गेम्स. काही महिन्यांपूर्वीच व्हिडिओ गेमिंगचा अतिवापर (व्हिडिओ गेम अ‍ॅडिक्शन) याला जागतिक आरोग्य संघटनेने मानसिक आजार म्हणून मान्यता दिली आहे. अमेरिकन असोसिएशननेदेखील यावर बरेच संशोधन केले होते; पण त्याला आजार म्हटले नव्हते; पण आता जागतिक आरोग्य संघटनेने त्याचा समावेश मानसिक आजारांच्या गटात केला आहे.

सध्या मुलांमध्ये ‘पब्जी’ हा ऑनलाईन गेम लोकप्रिय होत आहे. हा खेळ अनेक जणांनी मिळून एकाच वेळी खेळायचा असतो. यामध्ये वेगवेगळ्या स्तरातील, वेगवेगळ्या व्यक्‍ती सहभागी असतात. समोरची व्यक्‍ती कोण आहे, कोणत्या भाषेचा आहे, हे समजत नाही. या गेममध्ये ठराविक पॉईंटस् मिळाल्यानंतर पुढचे शस्त्र मिळते अशी रचना आहे. त्यामुळे गेम खेळणार्‍या व्यक्‍ती सतत ऑनलाईन राहण्यासाठी आतुर असतात. कारण, ती गोष्टही त्यांच्यासाठी ‘स्टेटस’शी निगडित बनलेली असते. सोशल मीडियावरील स्टेटसचेही असेच असते. एखादा फोटो अपलोड केल्यानंतर तो किती जणांनी पाहिला, लाईक केला, शेअर केला, फॉरवर्ड केला यासाठीची प्रचंड आतुरता निर्माण होते. अशावेळी एकाएकी मोबाईल फोनच काढून घेतल्यास किंवा त्याला तो वापरण्यास मनाई केल्यास मुलांना ते सहन होत नाही. काहींना तो अपमान वाटतो, तर काहींना स्वातंत्र्यावर आणलेली गदा वाटते. मुळातच हे व्यसन असल्यामुळे त्यापासून परावृत्त केल्यानंतर निर्माण होणारी भावना कमालीची तीव्र असते. त्यातून टोकाचे पाऊल उचलले जाते.

माझ्याकडे अनेक असे रुग्ण येतात ज्यांनी अशा प्रकारच्या कारणांमुळे हात कापून घेतलेला असतो, जेवण बंद केलेले असते. मोबाईल दिला नाही तर मी स्वतःला मारून घेईन, वरून उडी मारेन अशा धमक्या मुले सर्रास पालकांना देताना दिसतात; पण उपरोक्‍त घटनांमध्ये या धमक्या प्रत्यक्ष कृतीत उतरल्या आहेत. यावरून बदलत चाललेल्या परिस्थितीचे गांभीर्य आणि गहनता लक्षात घ्यायला हवी.

इथेच नेमका कळीचा मुद्दा आहे. परिस्थिती इतकी गंभीर होईपर्यंत शांत बसण्याऐवजी सुरुवातीपासूनच काही पथ्ये पाळली पाहिजेत. बदलत्या काळात मुलांना मोबाईलपासून कायमचे दूर ठेवणे हे शक्य नाही. कारण, हल्ली विविध शालेय उपक्रमांसाठी, अभ्यासासाठीही मोबाईलचा वापर केला जात आहे. त्यामुळे मुलांना मोबाईल देऊच नये, ही गोष्ट ऐकायला चांगली वाटत असली, तरी अंमलात आणणे कठीण आहे. त्यामुळे मुलांना मोबाईल वापरण्यास जरूर द्यावा; पण त्याच्या वापरावर सुरुवातीपासूनच नियंत्रण ठेवावे. मोबाईलचा काळ येण्यापूर्वी टी.व्ही.बाबत पालकांनी मुलांवर असे नियंत्रण ठेवले होते; किंबहुना आजही ते आहे. ठराविक काळच टी.व्ही. बघायचा याप्रमाणे दिवसातील ठराविक कालावधीतच मोबाईल वापरायचा, असा नियमच मुलांना आखून द्यावा. उदाहरणार्थ, रात्री 8 नंतर मोबाईल वापरायचा नाही, असा नियम ठरवता येईल. या नियमाचे पालकांनीही पालन केले पाहिजे. तसेच ते एखाद्या दिवशी न करता तो दररोजचा नियम म्हणून पाळला गेला पाहिजे. याखेरीज पेरेंटेल लॉकच्या माध्यमातून मोबाईल, कॉम्प्युटरवर फेसबुक किंवा पोर्नोग्राफी साईटस् या लॉक करून ठेवाव्यात. यासाठी पालकांनी तंत्रज्ञानाबाबतचे प्रशिक्षण घेतले पाहिजे.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुले मोबाईलवर, संगणकावर काय पाहतात, कोणत्या साईटस्ना भेटी देतात, त्यांचे या आभासी जगातील मित्र-मैत्रिणी कोणकोणते आहेत, त्यांच्याशी त्यांचे काय चॅटिंग चालते या सर्वांवर पालकांचे लक्ष असले पाहिजे. यापलीकडे जाऊन मुले जर सातत्याने मोबाईलची मागणी करत असतील किंवा त्यापासून लांब राहण्यास नकार देत चिडचिड करत असतील, तर ते मानसिक आजाराचे लक्षण आहे. याबाबत समुपदेशनाचा पर्याय प्रभावी आहे. त्याबाबत कोणताही संकोच न बाळगता मुलांचे समुपदेशन केले पाहिजे. त्यातून अनर्थ टळण्यास निश्‍चित मदत होऊ शकते!



Post a Comment

 
Top