0
रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वेगाड्या आणि प्लॅटफार्मवरील अवैध व्हेंडरचा बंदोबस्त केला. परंतु सध्या रेल्वेस्थानकावरील स्टॉल्सवाल्यांकडूनच प्रवाशांची लूट होत आहे.

नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वेगाड्या आणि प्लॅटफार्मवरील अवैध व्हेंडरचा बंदोबस्त केला. परंतु सध्या रेल्वेस्थानकावरील स्टॉल्सवाल्यांकडूनच प्रवाशांची लूट होत आहे. त्यामुळे प्रवाशांकडून अधिक पैसे घेऊन त्यांना खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
नागपूर रेल्वेस्थानकावर पूर्वी अवैध व्हेंडरची संख्या फार मोठी होती. रेल्वे सुरक्षा दलाने सातत्याने कारवाई करून अवैध व्हेंडरचा बंदोबस्त केला. रेल्वेगाड्यातील व्हेंडरवरही अंकुश लावला. परंतु अलिकडील काळात रेल्वेस्थानकावर रेल्वे प्रशासनाने स्टॉल्स उपलब्ध करून दिलेल्या स्टॉल्सधारकांकडूनच प्रवाशांची लूट होत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. नागपूर रेल्वेस्थानकावर ८ प्लॅटफार्म आहेत. जवळपास सर्वच प्लॅटफार्मवर रेल्वेने दिलेल्या स्टॉल्सवर खाद्यपदार्थ, पाणी विकण्यात येते. परंतु स्टॉल्सवर काम करणारे कर्मचारी ७ रुपयांचा चहा १० रुपयाला, १५ रुपयांची पाण्याची बॉटल २० रुपयास विकत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. एवढेच नाही तर इंडियन रेल्वे कॅटरींग अँड टुरिझमने प्रवाशांना स्वस्त दरात पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी लावलेल्या वॉटर व्हेंडींग मशीनवरही प्रवाशांची लुट होत आहे. येथे नियमानुसार एक पाण्याची बॉटल ८ रुपयांना द्यावयास हवी. परंतु या स्टॉलवरही १० रुपये आकारून प्रवाशांची लूट करण्यात येत आहे.
याबाबत एका प्रवाशाने मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे ‘डीआरएम’ सोमेश कुमार यांना टिष्ट्वट करून हा गैरप्रकार त्यांच्या लक्षात आणून दिला. परंतु अद्यापपर्यंत त्यावर काहीच कारवाई झाली नाही. रेल्वेस्थानकावर दररोज ४० ते ४५ हजार प्रवासी ये-जा करतात. प्लॅटफार्मवरील स्टॉल्सधारक प्रवाशांच्या गरजेचा फायदा घेऊन त्यांना अधिक दराने पदार्थांची विक्री करतात. त्यामुळे प्रवाशांची होत असलेली लूट थांबविण्याची मागणी होत आहे.

प्रवाशांनी दरपत्रकानुसारच पैसे द्यावेत
‘रेल्वेस्थानकावर प्रत्येक प्लॅटफार्मवर खाद्यपदार्थांचे दर असलेले दरपत्रक रेल्वे प्रशासनाने लावले आहेत. त्यामुळे प्रवाशांनी या दरपत्रकानुसारच पैसे द्यावेत. एखाद्या स्टॉलवर अधिक पैसे घेण्यात येत असतील तर त्वरित त्याची तक्रार रेल्वे प्रशासनाकडे करावी. संबंधित व्यक्तीवर तातडीने कारवाई करण्यात येईल.’
Tea 10, and bottle of water for Rs 20; Plunder at the Nagpur railway station | चहा १०, तर पाण्याची बाटली २० रुपयाला; नागपूर रेल्वेस्थानकावर लूट

Post a Comment

 
Top