0
काही दिवसांपासून थंडीचा अनुभव घेणाऱ्या मुंबईकरांना आता नेहमीचा उकाडा सहन करावा लागणार आहे. शहराच्या कमाल आणि किमान तापमानात मंगळवारी वाढ झाल्याचे नोंदवण्यात आले. शहराच्या किमान तापमानात सुमारे चार अंशांची वाढ झाली आहे. 15.1 वरून पारा 19.6 वर गेला आहे.

महिन्याच्या सुरुवातीला मुंबईकर सुखद गारवा अनुभवत होते. त्यावेळी पारा 14 अंशांपर्यंत खाली आला होता. मात्र, मंगळवारी वातावरणात अचानक बदल झाला आणि दुपारनंतर तापमानात वाढ झाली. सांताक्रुझ वेधशाळेत 19.6 किमान तापमानाची नोंद करण्यात आली. तर कुलाबा वेधशाळेत 21 अंशांची नोंद करण्यात आली. शहरातील कमाल तापमानही वाढ नोंदवण्यात आली आहे. कुलाबा वेधशाळेत 33.2 तर सांताक्रूझला 33.7 अंश तापमानाची नोंद करण्यात आली. मुंबईकरांनाही वातावरणातला हा बदल जाणवला. दुपारनंतर वातावरणात उष्णता जाणवत असल्याचे अनेक नागरिकांनी सांगितले.

शहराकडे येणाऱ्या वाऱ्यांची दिशा बदलल्याने तापमानात बदल झाल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे शहरात गारवा जाणावत होता. मात्र, आता थंडीचा जोर ओसरल्याने शहरात तापमानवाढ झाल्याचे सांगण्यात आले. आता शहरातून थंडीचा जोर ओसरणार असून उष्णता वाढण्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे.

Post a Comment

 
Top