0
युती झाली नाही तर गतवेळेपेक्षा एक जागा अधिकची मिळेल: खासदार दानवे 
दानवे म्हणाले की, आपण राज्यातील ४८ पैकी ४६ लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला आहे.
जालना- राज्यात समविचारी पक्षांनी एकत्र येऊन मतविभाजन टाळावे म्हणजे त्याचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीला होणार नाही, अशी भाजपची भूमिका आहे. मात्र, युती झाली नाही तरी गतवेळी लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला जितक्या जागा होत्या त्यापेक्षा भाजपला एक जागा अधिकची मिळेल, असा आत्मविश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला. ते जालना येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
भाजपच्या प्रदेश कार्यसमितीची बैठक २८ जानेवारी रोजी जालना येथे होत आहे. प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी शुक्रवारी त्याच्या तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी पालकमंत्री बबनराव लोणीकर, आमदार अतुल सावे, नारायण कुचे, संघटनमंत्री भाऊराव देशमुख आदींची उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना दानवे म्हणाले की, आपण राज्यातील ४८ पैकी ४६ लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला आहे. त्यानुसार भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सर्व तयारी केली असून वातावरण भाजपच्या बाजूने असल्याचे खासदार दानवे म्हणाले. राहुल गांधींना यश मिळू शकले नाही त्यामुळे त्यांनी प्रियंका गांधी यांना पुढे आणले आहे, मात्र त्याचा भाजपवर काहीच परिणाम होणार नाही. उत्तर प्रदेशात यापूर्वीही सपा आणि बसपा यांची युती झाली होती. तेव्हाही भाजपला त्यांच्यापेक्षा एक जागा आणि चार टक्के अधिकची मते मिळाली होती. त्यामुळे आताही त्याचा भाजपवर परिणाम होणार नाही, असा विश्वास दानवे यांनी व्यक्त केला.
जालना भाजपचाच
जागावाटपाबाबत अद्याप सेनेकडून कोणताच प्रस्ताव आलेला नाही, शिवाय जालना लोकसभा मतदारसंघ आठ वेळा भाजपने जिंकला आहे. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपकडेच राहील, असे खासदार दानवे यांनी सांगितले. आपण बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील चित्रपट पाहणार का, या प्रश्नावर दानवे यांनी होकारार्थी उत्तर दिले.

  • If there is no alliance, then we get one more seat says Danve

Post a Comment

 
Top