0
मुंबई : 

'मीटू' या मोहिमेचे वादळ अद्‍याप शांत झालेले नाही. '#MeToo' मोहिमेंतर्गत अनेक लोकांचे नावे समोर आली आहेत. आता त्‍यामध्‍ये एका बड्‍या व्‍यक्‍तीचे नाव समाविष्‍ट झाले आहे. टी-सीरिज कंपनीचे मालक भूषण कुमार यांच्‍याविरोधात एका महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. पीडित महिलेने भूषण कुमार यांच्‍याविरोधात ओशिवरा पोलिस स्‍टेशनमध्‍ये तक्रार दाखल केली आहे. परंतु, भूषण कुमार यांनी आपल्‍यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत.

मुंबईतील ओशिवरा पोलिस स्टेशनमध्‍ये भूषण कुमार यांच्‍याविरोधात लैंगिक शोषणाचा आरोप करत तक्रार दाखल करण्‍यात आली आहे. ही तक्रार भूषण यांच्‍याच कंपनीत काम करणार्‍या एका महिलेने दाखल केली आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. अद्‍याप भूषण कुमार यांच्‍यावर कुठलीही कारवाई करण्‍यात आली नसल्‍याचे समजते.

‘टी-सीरिज’चे प्रमुख भूषण कुमार यांच्‍यावर गेल्‍यावर्षी ऑक्टोबर महिन्‍यात ट्विटरवर एका अज्ञात महिले आरोप केला होता.  कुमार यांनी त्‍यांच्‍या ‘प्रोडक्शन हाउस’च्‍या तीन चित्रपटांची गाणी गाण्‍याच्‍या बदल्‍यात शारिरीक संबंध ठेवण्‍यास सांगितले होते, असा आरोप त्‍या महिलेने केला होता. ज्‍यावेळी महिलेने भूषण कुमार यांचा प्रस्ताव नाकारला, त्‍यावेळी भूषण यांनी त्‍या महिलेला तिचे करिअर उद्‍ध्‍वस्‍त करण्‍याची धमकी दिली होती.

या प्रकरणावर भूषण कुमार माध्‍यमांशी बोलताना म्‍हणाले होते, ‘मी या वृत्तामुळे चिंतेत आणि दु:खी आहे. एका अज्ञात व्‍यक्‍तीने माझे नाव #MeToo मोहिमेत अडकवले आहे. माझ्‍याविरोधातील सर्व आरोप खोटे आहेत. माझी प्रतिमा नेहमीच स्‍वच्‍छ राहिली आहे. मी नेहमी प्रोफेशनल राहिलो आहे. ट्‍विटचा उपयोग माझा अपमान करण्‍यासाठी आणि माझी प्रतिमा खराब करण्‍यासाठी केला जात आहे.’
सूत्रांच्‍या माहितीनुसार, या सर्व प्रकारामुळे तक्रार दाखल करणारी महिला आणि सोशल मीडियावर आरोप करणारी महिला एकच असेल, असे नाही. ती अन्‍य महिला असू शकते. 

Post a Comment

 
Top