0
मुंबई :

संजय जाधव दिग्दर्शित लकी सिनेमाचे ‘माझ्या दिलाचो’ हे कोंकणी गाणे रिलीज झाले आहे. ‘दूनियादारी’ सिनेमातून ‘लिटील चॅम्प’ रोहित राऊतला सिनेसृष्टीत लॉन्‍च करण्‍यात आले होते. आता ‘रायझिंग स्टार’ चैतन्य देवढेलाही संजय जाधव यांनी लकी सिनेमातून चित्रपटसृष्टीत लॉन्‍च केले आहे.  'सूर नवा ध्यास नवा' रिॲलिटी शोम चैतन्य दिसला होता. त्‍याचे हे पहिले मराठी गाणे आहे.
गीतकार ‘यो’ (सचिन पाठक)च्या शब्दांना संगीतकार पंकज पडघन यांनी संगीत दिले आहे. आळंदीच्या चैतन्य देवढेने याला स्वरसाज चढवला आहे. लकी चित्रपटात हे गाणे अभय महाजनवर चित्रीत झाले आहे.   


चैतन्यच्या निवडीविषयी लकी सिनेमाचे निर्माते सूरज सिंग म्‍हणाले, “या गाण्याच्या सिच्युएशनसाठी आम्हाला एका लहान मुलाचा आवाज हवा होता. आणि दिग्दर्शक संजय जाधव यांना चैतन्यचा आवाज खूप आवडला. आळंदीच्या चैतन्यला आवाजाचे दैवी देणगीच मिळालीय. त्याच्या आवाजातली निरागसता ह्या गाण्याला अगदी साजेशी आहे आणि अभयने ही हे गाणे रूपेरी पडद्यावर उत्तम साकारलंय.”

संगीतकार पंकज पडघन म्हणाले, “नव्या प्रतिभेसोबत काम करायला मला आणि संजयदादांना नेहमीच आवडते. चैतन्यची आकलन क्षमता खूप चांगली आहे. त्याने एकाच दिवसात या गाण्याचा रियाज करून गाण्याचे रेकॉर्डिंग केले. आणि हे कोंकणी गाणे ऐकताना तो कोंकणी पहिल्यांदाच बोलतोय, असं तुम्हांला अजिबात वाटणार नाही, ही यातली जमेची बाजू म्हणायला हवी.”

चैतन्य देवढे म्हणतो, “मी स्वत:ला खूप लकी समजतो, की सिनेसृष्टीतल्या अशा दिग्गजांसोबत मला काम करण्याची संधी मिळाली. आजपर्यंत पंकज पडघन यांनी संगीतबध्द केलेली गाणी ऐकली होती. आणि संजयदादांचे सिनेमे पाहिले होते. पण, या दोन दिग्गजांना प्रत्यक्ष भेटायची आणि त्यांच्या सिनेमातून चित्रपटसृष्टीत लॉन्‍च होण्याची संधी मला मिळाली, ही माझ्यावर माऊलींचीच कृपा आहे, असे मी मानतो.”

अभय महाजन म्हणाला, “या गाण्यातून चैतन्य देवढेला जसं संजयदादांनी लॉन्‍च केले. तसेच गोव्यातल्या प्रतिभेलाही या गाण्यातून रूपेरी पडद्यावर आणलंय. माझ्यासोबत गाण्यात नाचणारे सगळे डान्सर्स गोव्यातले आहेत. आणि त्यांची ही पहिली फिल्म आहे. ऑक्टोबरच्या ४०-४५ डिग्रीच्या तळपत्या उन्हांत हे गाणे चित्रीत झालंय. पण चैतन्यच्या आवाजातल्या गोडव्यामुळे आणि तिथल्या डान्सर्सच्या चैतन्यामूळे असावं कदाचित डान्स करताना हुरूप येत होता.”

संजय कुकरेजा, सुरज सिंग आणि दीपक पांडुरंग राणे यांची निर्मिती असलेला, संजय जाधव दिग्दर्शित 'लकी' चित्रपटात दिप्ती सती आणि अभय महाजन मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट ७ फेब्रुवारी, २०१९ रोजी रिलीज होणार आहे. 

Post a comment

 
Top