0
जळगाव- गोवर-रुबेला लसीकरणाचे प्रमाण वाढावे यासाठी महापालिकेकडून शहरात सर्वेक्षण सुरू आहे. मात्र, शिवाजीनगरात घरोघरी बालकांना लसीकरणाची माहिती घेण्यासाठी गेलेल्या महिला मदतनीसवर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर प्रकार घडल्याची तक्रार आयुक्तांकडे करण्यात आली आहे. भेदरलेल्या महिला कर्मचाऱ्यांनी या कामातून सुटका करण्याची मागणी केली आहे. तर संबंधितांविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्याच्या सूचना मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

शहरातील सर्व माध्यमांच्या शाळा तसेच शाळाबाह्य बालकांना रुबेला लस देण्याची मोहीम सुरू आहे. या मोहिमेला बळकटी मिळावी म्हणून पालिकेच्यावतीने शहरातील सर्वत्र सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणाची जबाबदारी मदतनिसांवर सोपवण्यात आली आहे. मुस्लिम बहुल भागात लसीकरणासंदर्भात असलेल्या अफवा व चुकीच्या माहितीमुळे विरोध केला जात आहे. शिवाजीनगरात सर्वेक्षण करण्यासाठी गेलेल्या शाळा क्रमांक ५ मधील मदतनीस रेखा सुभाष निकुंभ यांच्यावर एका व्यक्तीने चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या घटनेसंदर्भात महिला कर्मचाऱ्यांनी आयुक्त चंद्रकांत डांगे यांना याबाबत माहिती दिली. त्यांनी याबाबत तक्रार देण्याचे संबंधितांना सांगितले आहे.


Attempting to knife attack on a woman in Jalgoan

Post a Comment

 
Top