0
नवी दिल्ली :

आपल्या विविध मागण्यांसाठी बँकांसह विविध क्षेत्रातील कामगार कर्मचारी आजपासून दोन दिवसांच्या संपावर गेले आहेत. कामगार संघटना संयुक्त कृती समितीने पुकारलेल्या या संपात भारतीय कामगार सेना व भारतीय मजदूर संघ वगळता इतर बहुतेक कामगार संघटना सहभागी झाल्या आहेत. या संपामुळे देशभरात जनजीवन विस्कळीत झाले आहे.

कामगार संघटनांनी पुकारलेल्या संपाचे आज (मंगळवार) सकाळपासूनच देशातील विविध भागात पडसाद उमटत आहेत. आंदोलकांनी भुवनेश्वरमधील रेल्वे स्थानकावर टायर जाळून आंदोलन केले. तर कोलकातामध्ये पोलिसांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. आंगणवाडी कर्मचाऱ्यांनी कर्नाटकातील बदामी - बागलकोट रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन केले.

विविध कामगार संघटनांनी शेतमजुरांसह सर्व कामगारांना 18 हजार रूपये किमान वेतन मिळावे, वाढती महागाई रोखा व रेशन व्यवस्था बळकट करा, कंत्राटी पध्दती रद्द करा, बेरोजगारी रोखा, सर्व कामगार शेतकरी  जनतेला किमान 3 हजार रूपये पेन्शन मिळावी, सार्वजनिक उद्योगांचे खासगीकरण थांबवावे,  कामगारांचा हक्क अबाधित ठेवा, सर्व नागरिकांना सामाजिक सुरक्षा मिळावी, शिक्षण, आरोग्य, पेन्शन, रेशन यावर अर्थसंकल्पाच्या 12 टक्के तरतूद करा या मागण्या करण्यात आल्या आहेत.

Post a Comment

 
Top