0
शिवसेना-भाजप युतीबाबत आपण कायम सकारात्मकच आहोत. युती होणार की नाही याबाबत अंतिम घोषणा ही कोणत्याही क्षणी होऊ शकेल हे सांगतानाच एकत्र निवडणुकांची शक्यता महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी फेटाळून लावली. लोकसभा, विधानसभा निवडणुका या वेगवेगळयाच होतील याबाबत कुणाच्याही मनात शंका नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

चंद्रकांत पाटील यांनी आज मंत्रालयात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. भाजपचे मंत्री शिवसेनेसोबत युतीसाठी आग्रही असल्याचे आज पुन्हा स्पष्ट झाले. चंद्रकांत पाटील यांनी आपण युतीबाबत सकारात्मक आहोत. त्यामुळे युती होईल हेच मी सांगेन. मात्र होणार की नाही हे अंतिम घोषणा होईल तेव्हाच ठरेल. युती इतकी भक्कम आहे की सौम्य काय किंवा तीव्र धक्के बसले तरी काहीही फरक पडणार नाही. काही तडे गेले असले तरी ते भरून निघतील, असा आशावादही व्यक्त केला.

महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या मनात काँग्रेस-राष्ट्रवादीविषयी तिटकारा आहे. पाच वर्षे विरोधी पक्षात बसावे लागल्याने आज हे दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसविरोधी मतांचे विभाजन होऊ नये म्हणून शिवसेनेसोबत युती व्हावी, अशी आमची इच्छा आहे. लोकसभेला युती झाली नाही तरी केंद्रात भाजपचीच सत्ता येईल. मात्र विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप एकत्र आले नाहीत तर काँग्रेस आघाडीला सत्तेत येण्याची संधी मिळेल. विधानसभेला आमची सत्ता गेली तरी आम्हाला फरक पडणार नाही; परंतु सामान्य जनतेला मात्र दुःख होईल, असे पाटील म्हणाले. युतीबाबत अद्याप चर्चा नसली तरी निवडणुकीत आमची युती होणारच, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Post a Comment

 
Top