0
ईव्हीएम’ हॅकिंगच्या वादानंतर यापुढे निवडणुका बॅलेटपेपरद्वारे (मतपत्रिका) घ्याव्यात, अशी मागणी होत असली तरी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी पुन्हा मतपत्रिका नाही, ‘ईव्हीएम’द्वारेच मतदान होणार, अशी भूमिका मांडली आहे. हॅकिंगच्या चर्चेला आयोग घाबरणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

2014च्या लोकसभा निवडणुकीत ‘ईव्हीएम’ हॅक झाले होते. ‘ईव्हीएम’मध्ये अफरातफर करून भाजपने निवडणुका जिंकल्या होत्या असा दावा कथित सायबरतज्ञ, हॅकर सय्यद सुजाने नुकताच केला आहे. त्यानंतर ‘ईव्हीएम’ हॅकिंगचा मुद्दा पुन्हा चर्चेला आला आहे. निवडणूक आयोगाने दिल्ली पोलिसांकडे सय्यद सुजाविरुद्ध ‘एफआयआर’ दाखल केला आहे, तर विरोधी पक्षांनी ‘ईव्हीएम’ मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची मागणी केली आहे. दिल्लीतील एका आंतरराष्ट्रीय परिषदेत ‘ईव्हीएम’ हॅक होऊ शकत नाही असा पुनरुच्चार आयुक्त सुनील अरोरा यांनी केला.

‘ईव्हीएम’ची निर्मिती सरकारी कंपन्यांमध्ये
‘ईव्हीएम’ आणि ‘व्हीव्हीपॅट’ मशीन्सची निर्मिती भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या केंद्र सरकारच्या अखत्यारीतील कंपन्यांमध्ये होते. अत्यंत सुरक्षित पद्धतीने या मशीन्स तयार केल्या जातात. या दोन कंपन्यांकडून संरक्षणसामग्रीचीही निर्मिती होते, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त अरोरा यांनी दिली.

– ‘ईव्हीएम’ आणि ‘व्हीव्हीपॅट’चा वापर यापुढेही सुरूच राहणार आहे. ‘ईव्हीएम’बाबत राजकीय पक्ष किंवा इतर कोणालाही काही शंका, तक्रारी, सूचना असतील तर त्याचे स्वागतच आहे. तक्रारींचे निवारण आयोगाकडून केले जाईल.

– मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याचा काळ पुन्हा देशात येणार नाही. बॅलेट पेपर पळविणे, मतदान केंद्र ताब्यात घेऊन मतपत्रिकांवर जबरदस्तीने शिक्के मारणे हा काळ आता जुना झाला आहे.

– ‘ईव्हीएम’मध्ये कोणीही अफरातफर करू शकणार नाही. ‘ईव्हीएम’ विश्वासार्ह आहे.

Post a comment

 
Top