0
मुंबई :

कोल्हापूरहून मुंबईला विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. येत्या पंधरा दिवसात ही सेवा सुरू करण्यासाठी सरकारकडून पावले टाकण्यात येत  आहेत. त्याचबरोबर कोल्हापूर- अहमदाबाद सेवाही लवकरात लवकर सुरू करण्यात येणार आहे. पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गच्या चिपी विमानतळावरून येत्या मार्च पासून विमानसेवा सुरू केली जाणार आहे.
उडाण योजनेअंतर्गत ज्या ज्या ठिकाणी विमानसेवा सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे अशा राज्यातील सर्व ठिकाणांचा गुरुवारी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला.

उद्योगाबरोबरच कोल्हापूर शैक्षणिक व मेडिकल हब

कोल्हापूर ते मुंबई या विमानसेवेसाठी स्थानिक उद्योजकांची मोठी मागणी आहे.साखर कारखानदारी व सहकारी बँकांबरोबरच कोल्हापूर हे पूर्वीपासूनच राज्याच्या औद्योगिक नकाशावर मानाचे स्थान मिळवून आहे. तर अलीकडच्या काळात कोल्हापूरची शैक्षणिक व मेडिकल हब अशी नव्याने ओळख तयार झाली आहे. त्यादृष्टीने पाहता कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरू करण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. उडाण योजनेत कोल्हापूरचा समावेश करण्यात आला. मात्र विमान वाहतूक कंपनीच्या अडचणीमुळे ही लांबलेली सेवा आता मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अहमदाबादशी व्यापारी संबंध

मुंबईबरोबरच कोल्हापूरचे अहमदाबादशी औद्योगिक व व्यापारी संबंध आहेत. कोल्हापुरी गुळासह अन्य शेतमाल व औद्योगिक मालाला गुजरातची बाजारपेठ आहे. तर गुजराती बांधव मोठ्या संख्येने कोल्हापुरात राहात असून त्यांच्याकडूनही अहमदाबादला विमानसेवा सुरू करण्याची मागणी होत होती. त्याची दखल घेऊन विमानतळ विकास कंपनीने अहमदाबाद सेवेलाही प्राधान्य देण्याचे ठरविले आहे.

विस्तारीकरणाचा प्रस्ताव मागविला

याच बैठकीत कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणावरही चर्चा करण्यात आली. विस्तारीकरणासाठी नेमकी किती जमीन लागणार आहे याचा प्रस्ताव मागविण्यात आला आहे. हा प्रस्ताव आल्यानंतर त्याची छाननी करून भूसंपादनासाठी कोल्हापूर जिल्हाधिकार्‍यांकडे तो दिला जाणार आहे.जिल्हाधिकार्‍यांनी  भूसंपादन करून दिल्यानंतर भारतीय विमानतळ प्राधिकरण या विमानतळाचे विस्तारीकरण करणार आहे.

सिंधुदुर्गला मार्चपासून सेवा

सिंधुदुर्ग मधील चिपी विमानतळ तयार झाला असून तेथून विमानसेवा सुरू करण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर येत्या मार्चपासून सिंधुदुर्ग विमानतळावरूनही विमानसेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. जळगाव विमानतळावरूनही विमानसेवा सुरू करण्यासाठी चर्चा करण्यात आली.

Post a Comment

 
Top