0
मुंबईतील 20 वर्षीय तरुणी प्राची कसबने निवडला रिक्षा चालवण्याचा व्यवसाय, प्रवाशांकडूनही कौतुक

मुंबई - मुंबईत गेल्या काही वर्षांपासून महिला रिक्षा चालवू लागल्या आहेत, त्यातही तरुण मुलींचं प्रमाण अधिक आहे. दोनेक वर्षांपर्यंत परिस्थिती अशी होती की, रिक्षाचं परमिट बाईच्या नावावर असायचं, पण प्रत्यक्ष रिक्षाला तिचा हातही लागत नसायचा. नवरा किंवा मुलगाच ती रिक्षा चालवत. आता यात थोडा बदल होतोय. अनेक मुली भाड्याने रिक्षा चालवत आहेत. काहींनी स्वत:ची रिक्षा घेतली असून ती त्या चालवतही आहेत. मुलुंड पूर्वेला रिक्षा चालवणारी प्राची कसबे ही नुकतीच वयाची विशी ओलांडलेली मुलगी त्यातलीच एक.

प्राचीची अंगकाठी बारीक, पण उंच. ती रिक्षा चालवते तेव्हा विश्वास बसत नाही इतक्या सराईतपणे ती गर्दीतनंही मार्ग काढते. वर्ष झालं ती रिक्षा चालवते आहे. प्राचीचं लवकर लग्न झालं, मुलगीही झाली. नवरा केटरिंगच्या कामात आहे. सध्या ती काही घरगुती समस्यांमुळे माहेरी राहते आहे. 'मुलगी पोटात होती तेव्हाच पप्पांनी विचारलं, रिक्षा चालवशील का? मी पटकन हो म्हणाले. पप्पा आणि दोघे भाऊ रिक्षाच चालवतात. मग मीही शिकले चालवायला. परमिट काढायचं कसं ते विचारून घेतलं आणि तीन महिन्यांपूर्वी माझी स्वत:ची रिक्षा हातात आली. कर्ज काढलंय रिक्षासाठी जवळजवळ दोन लाख रुपयांचं....' ती सांगते.
मुलगी लहान असल्याने प्राचीला दिवसातले सहा- सात तासच रिक्षा चालवणं शक्य होतं याचं तिला फार वाईट वाटतं. कर्जाचा हप्ता, सीएनजी व बाकीचे खर्च वगळता हातात दिवसाला जास्तीत जास्त शंभर किंवा दोनशे रुपये येतात. जास्त वेळ चालवली रिक्षा तर ही रक्कम वाढेल, पण सध्या ते शक्य नाही. मुलगी मोठी झाली की, शाळेत तिचा वेळ जाईल आणि रिक्षा जास्त वेळ काढता येईल, अशी आशा तिला वाटते.

प्राचीच्या रिक्षात बसणाऱ्या महिलांना तिचं फार कौतुक वाटतं. तिला प्रत्येकीने सांगितलंय की, त्यांना तिच्या रिक्षात बसायला छान वाटतंय. 'एकीने तर माझ्याबद्दल फेसबुकवरही लिहिलं होतं, पण त्याची शेवटची ओळ अशी होती की, रिक्षावालीचं नाव विचारायला विसरले,' प्राची हसत सांगते.

इतरांनाही आधार मिळेल प्राचीला रिक्षा चालवताना पाहून अनेक मुली विचारतात, 'कसं जमतं तुला, काय करावं लागतं, मलाही जमेल का...' ती सगळ्यांना नीट समजावून सांगते, परमिट कसं काढायचं, कर्ज कुठे मिळेल, वगैरे. रिक्षाचा जसा तिला आधार वाटतो, तसाच इतरांनाही तो होऊ शकतो, हे तिला चांगलेच माहीत आहे.

त्रास देणाऱ्यांची पर्वा नाही
प्रवाशांना कौतुक असलं तरी बरोबरीचे रिक्षावाले अनेकदा तिला त्रास देतात. रस्ता मोकळा असला तरी मुद्दाम गाडीला धक्का दिल्यासारखं करतात, जोरजोरात हाॅर्न वाजवत पुढे जातात. 'हिला खरंच येते तरी का रिक्षा चालवायला, कशी चालवते कोणास ठाऊक,' असे टोमणे मारतात. तिचे भाऊ रिक्षावाले असल्याने तिला या चर्चा सुरू असल्याचं कळतंच. पण ती त्यांच्याकडे लक्ष देत नाही. 'मी बिनधास्त चालवते रिक्षा, मला माहीत आहे मी नीट चालवतेय. त्यांना बोलू दे काहीही,' ती म्हणते.
Mumbai auto rickshaw Driver Prachi kasbe Positive story

Post a Comment

 
Top