0
हेतू अस्पष्ट : साध्या वेशातील रेल्वे पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू

मुंबई : भूज एक्स्प्रेसमध्ये सुरतच्या दरियाबाई चौधरी यांच्या हत्याकांडाची घटना ताजी असतानाच, रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांवर केमिकल अटॅक होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी लागोपाठ दोन गुन्हे अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. अशा प्रकारे मुंबईतील अन्य रेल्वे स्थानकांवरही असा प्रकार घडल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यानुसार, साध्या गणवेशातील पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.


अंधेरी मेट्रो स्थानकातून अंधेरी स्थानकाकडे येणाºया प्रवाशांच्या गर्दीत हा प्रकार घडला. दोन्हीही घटना सकाळी साडेनऊ ते साडेदहाच्या सुमारास घडल्या आहेत. या दरम्यान महाविद्यालय, कामावर जाणाºया नोकरदार तरुणी, महिलांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. दोन दिवसांपूर्वी अंधेरी मेट्रो स्थानकातून तक्रारदार तरुणीने नोकरीला जाण्यासाठी अंधेरी रेल्वे स्थानकाचा पूल गाठला. तेथून जात असताना, अचानक तिच्या पायाकडे जळजळ झाली. तिने पाहिले तेव्हा, कसले तरी केमिकल अंगावर फेकल्याचे तिच्या लक्षात आले. या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने घर गाठले. घडलेला प्रकार कुटुंबईयांना सांगताच, त्यांना धक्का बसला. त्यांनी घरी जाऊन पाहिले तेव्हा पाय लाल झाला होता.


कुटुंबीयांनी मुलीला धीर देत, तिच्यासह अंधेरी रेल्वे पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तेव्हा चौकशीत यापूर्वीही अशा स्वरूपाची तक्रार आल्याची माहिती कुटुंबीयांना मिळाली. या प्रकरणी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार तरुणीवर सध्या उपचार सुरू आहेत. यामागचा हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही. कारण, या दोन्ही प्रकरणांत चोरी झालेली नाही. मात्र हे विकृतीतून होत असल्याचा संशय पोलिसांना आहे.


तंग कपडे पाहून, आरोपी त्यांच्या पायावर आणि कंबरेकडील भागावर केमिकल टाकतात. हा प्रकार काही अंतरावर गेल्यानंतर जळजळ झाल्यावर तरुणींच्या निदर्शनास येतो, असाही अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.
गर्दीची रेल्वे स्थानके तसेच घाटकोपर मेट्रो स्थानकातही अशा काही घटना घडल्या आहेत का, या दिशेनेही पोलीस तपास घेत आहेत. शिवाय, काही तरुणी भीतीने पुढे येत नसल्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.

विकृतीतून प्रकार घडत असल्याचा संशय
आतापर्यंत या प्रकरणी दोन गुन्हे दाखल झाले असून सीसीटीव्हींच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. तसेच साध्या गणवेशातील पोलीसही तेथे सापळा रचून असल्याचे अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांनी सांगितले. विकृत भावनेतून हा प्रकार केला जात असल्याचा अंदाजही बाबर यांनी वर्तविला आहे.
The women on the train are on the chemical attack | रेल्वेच्या महिला प्रवाशांवर होताहेत केमिकल अटॅक

Post a Comment

 
Top