0
ज्येष्ठ अभिनेते नसरुद्दिन शहा यांनी व्यक्त केलेली मुलांची चिंता ही केवळ त्यांच्यापुरती मर्यादित नाही, तर त्यांच्याप्रमाणे असंख्य निर्दोष मुस्लीम तरुणांना पकडले जात आहे, त्यांना मारले जात आहे, हे वेदनादायी आहे.

ठळक मुद्दे
ज्येष्ठ साहित्यिका नयनतारा सहगल यांच्या प्रमुख उपस्थितीत दादर येथील शिवाजी मंदिर येथे ‘चला, एकत्र येऊ या!’ हा मेळावा पार पडला.
आपण सगळे हिंदुस्थानी आहोत, त्यामुळे हिंदुस्थानीयत सोडणार नाही.
मुंबई : आपण सध्या ज्या काळात राहतोय तो अत्यंत भयावह आहे आणि अशा वेळेस आपण गप्प राहणे, काहीही न बोलणे हेसुद्धा घातक आहे. काही महिन्यांवर निवडणुका येऊन ठेपल्या आहेत, आपला देश हिंदू राष्ट्र होण्याच्या मार्गावर आहे, असे परखड मत ज्येष्ठ साहित्यिका नयनतारा सहगल यांनी मांडले.

आमंत्रण मागे घेतल्यामुळे यवतमाळच्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला येऊ न शकलेल्या ज्येष्ठ साहित्यिका नयनतारा सहगल यांच्या प्रमुख उपस्थितीत दादर येथील शिवाजी मंदिर येथे ‘चला, एकत्र येऊ या!’ हा मेळावा पार पडला. कोणत्याही आयोजक आणि उद्घाटक यांच्याशिवाय हा मेळावा पार पाडला. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुनरुच्चार, व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचा हक्क अबाधित राखणे हा या मेळाव्याचा हेतू होता.

या मेळाव्यात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलताना सहगल म्हणाल्या, आपल्याकडे वैविध्यपूर्ण संस्कृतीचे वैभव आहे. आपण गेली अनेक वर्षे या सर्व संस्कृतींना घेऊन जगतोय. त्यामुळे ही वैविध्यतेची श्रीमंती हीच आपली ओळख आहे. ती आपल्याला हरवून बसायची नाही. आपल्याकडे इस्लाम, शीख, ख्रिश्चन अशा बहुभाषिक संस्कृतीचे वैविध्य आहे ते टिकविले पाहिजे; असे असले तरी अखेर आपण सगळे हिंदुस्थानी आहोत, त्यामुळे हिंदुस्थानीयत सोडणार नाही.

बालपणीच्या स्मृतींना उजाळा देताना सहगल यांनी अभिनेते अशोक कुमार यांचा ‘नया संसार’ चित्रपट पाहिल्याचे सांगितले. त्या काळात चित्रपटात ‘आझाद’ या शब्दाचा संवादात समावेश करणेदेखील कठीण होते, त्यावर सेन्सॉरची करडी नजर असायची. मात्र तरीही त्यातून वाट काढून चित्रपटातील गीतांमध्ये स्वातंत्र्याविषयीचा उल्लेख असायचा. त्या माध्यमातून या चित्रपटातील एका गाण्याने माझ्या मनात कायमचे घर केले. त्यात ‘एक नया संसार बनाये, जिसमे भारत हो आझाद’ या गाण्याने माझ्या मनात वेगळीच भावना निर्माण केली. मात्र सध्याच्या काळातील चित्रपटसृष्टी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीविषयी बोलत नाही ही खेदजनक बाब आहे. चित्रपटसृष्टी याबद्दल गप्प आहे याचे आश्चर्य वाटते. याला काही अपवाद आहेत. त्यात आनंद पटवर्धन यांचा समावेश आहे. त्यांनी पुरस्कार वापसी केली होती. त्याचप्रमाणे याच सृष्टीचा भाग असलेल्या ज्येष्ठ अभिनेते नसरुद्दिन शहा यांनीही याविषयी आवाज उठविला होता. मात्र चित्रपटसृष्टीतील कोणीच त्यांना साथ दिली नाही ही दुर्दैवाची बाब आहे. त्यांनी व्यक्त केलेली मुलांची चिंता ही केवळ त्यांच्यापुरती मर्यादित नाही, तर त्यांच्याप्रमाणे असंख्य निर्दोष मुस्लीम तरुणांना पकडले जात आहे, त्यांना मारले जात आहे, हे वेदनादायी आहे.

मंगळवारी सायंकाळी पार पडलेल्या या मेळाव्याला साहित्य, कला आणि सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी आवर्जून उपस्थिती दर्शविली होती. त्यात भाषातज्ज्ञ गणेश देवी, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, डॉ. अच्युत गोडबोले, नाट्य दिग्दर्शक विजय केंकरे, लेखिका प्रज्ञा पवार, सुबोध मोरे, प्रकाश रेड्डी, अनंत भावे, ज्येष्ठ प्रकाशक रामदास भटकळ, भालचंद्र नेमाडे, विजय केंकरे, गणेश विसपुते, प्रकाश रेड्डी, सुबोध मोरे, येशू पाटील, अमोल पालेकर, कवी सौमित्र,
अतुल पेठे असे अनेक मान्यवर उपस्थित होते.

> महाराष्ट्रातल्या रसिकांना ‘जय महाराष्ट्र’

साहित्य संमेलनाला उपस्थित न राहता माझे भाषण खूप लोकांपर्यंत पोहोचले. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विविध संस्थांनी कार्यक्र म आयोजित करून भाषणाचे अभिवाचन केले. त्या माध्यमातून आणखी तळागाळात भाषण पोहोचले, असे म्हणत सहगल यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला ‘जय महाराष्ट्र’ म्हणत त्यांचे आभार मानले.

> संमेलनाध्यक्षांची पाठ
मंगळवारी पार पडलेल्या या मेळाव्याचे ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा अरुणा ढेरे यांना आमंत्रण देण्यात आले होते. मात्र नियोजित कार्यक्र मामुळे या मेळाव्याला उपस्थित राहता येणार नाही, असे त्यांनी कळविले. ढेरे यांचा हा अनुपस्थितीचा संदेश अमोल पालेकर यांनी उपस्थितांना देताना याविषयी खंत व्यक्त केली. संमेलनाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या वादावर पडदा टाकण्यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध झाले होते. मात्र, या संधीचाही विनियोग न केल्याने पालेकर यांनी खेद व्यक्त केला.

Post a comment

 
Top