0
कोल्हापूर :

विद्यापीठाची सतत  बदनामी करत असलेल्या शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाच्या (सुटा) निषेधाचा ठराव मंगळवारी विद्या परिषद सदस्यांच्या बैठकीत बहुमताने मंजूर केला. पुराव्याशिवाय आरोप करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.


‘सुटा’च्या रस्त्यावरच्या लढाईला विद्या परिषदसुद्धा रस्त्यावर उतरून प्रत्युत्तर देणार असल्याचा इशाराही देण्यात आला. अभ्यासपूर्ण चर्चेचे व्यासपीठ असणार्‍या विद्या परिषदेच्या बैठकीत ‘विद्यापीठाची बदनामी’ या विषयावर अनेक सदस्यांनी मंगळवारी आक्रमक मते मांडली.

प्रताप माने यांनी सुरुवातीलाच संबंधित ठराव मांडला. कुलगुरूंवर केलेल्या 108 आरोपांचे पुरावे ‘सुटा’ने सादर न केल्यास त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी, अशी  मागणी करत माने म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून ‘सुटा’तर्फे विद्यापीठाची बदनामी सुरू आहे. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप केले जात आहेत. व्यवस्थापन परिषद, अधिसभेदिवशी ‘सुटा’च्या वतीने विद्यापीठाच्या निषेधार्थ घोषणा दिल्या जात आहेत.  प्रशासनाशी संवाद करून प्रश्‍नांची सोडवणूक करणे श्रेयस्कर आहे. कारण आरोपांमुळे कुलगुरू नव्हे तर विद्यापीठ बदनाम होत आहे. दबावतंत्राचा वापर करून मनासारखी कामे करण्यासाठी ‘सुटा’कडून हे प्रयत्न सुरु आहेत. या आरोपांच्या फैरीत विद्यापीठाच्या प्रगतीकडे दुर्लक्ष होत आहे. तसेच जागतिक दर्जाच्या प्राध्यापकांवरही ‘सुटा’ने आरोप केल्याने त्यांचे नीतिधैर्य खच्ची होऊ शकते.  यावेळी सदस्य भारती पाटील यांनीही विद्यापीठाच्या लौकिकास बाधा आणण्याचा हा प्रकार बंद व्हावा, असे सांगितले. दरम्यान, ‘सुटा’च्या निषेधाचा ठराव विद्या परिषदेच्या बैठकीत मंजूर झाल्यानंतर  ‘सुटा’च्या काही सदस्यांनी सभात्याग करत ठरावाला निषेध नोंदवला.

Post a Comment

 
Top