0
सोलापूर - "बोला बोला एकदा भक्तलिंग हर्रऽऽ बोला हर्रऽऽऽ'चा जयघोष आणि हलगीच्या निनादात रविवारी (ता. 13) श्री सिद्धरामेश्‍वरांनी स्थापन केलेल्या 68 लिंगांना तैलाभिषेक (यण्णीमज्जन) झाला. तैलाभिषेकाने यात्रेला सुरवात झाली.
बाराबंदी घातलेल्या भक्तांच्या उत्साहाला या वेळी उधाण आले होते. नंदीध्वज पकडणाऱ्यांसोबतच इतरही भाविकांनी बाराबंदी परिधान केल्याने 68 लिंगांचा प्रदक्षिणा मार्ग फुलून गेला होता. यंदा मिरवणूक लवकर संपल्याने भाविकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

सकाळी आठच्या सुमारास तेलाच्या घागरींचे विधिवत पूजन झाले. मानकऱ्यांकडे 68 लिंगांना तैलाभिषेक करण्यासाठी या घागरी सुपूर्द करण्यात आल्या. शिवानंद हिरेहब्बू यांच्या वाड्यात पहिल्या व दुसऱ्या नंदीध्वजाची राजशेखर हिरेहब्बू व देशमुख यांच्या हस्ते पूजा झाली. त्यानंतर सिद्धेश्‍वर महाराजांचा जयघोष करीत मिरवणुकीस प्रारंभ झाला.

सिद्धेश्‍वर महाराजांच्या जयघोषासोबतच हलगीच्या निनादाने मिरवणूक मार्गावर उत्साही वातावरण होते. बॅंजोही लावण्यात आला होता. सिद्धेश्‍वर प्रशालेसमोर सातही काठ्या आल्यानंतर मानकऱ्यांना सरकारी आहेर करण्यात आला. तेथून हे नंदीध्वज 68 लिंगांपैकी पहिले लिंग असलेल्या अमृत लिंगाजवळ येऊन थांबले. सातही नंदीध्वज आल्यानंतर हिरेहब्बू व शेटे यांनी तैलाभिषेक घालून विधिवत पूजा केली. त्यानंतर मिरवणूक मार्गस्थ होऊन रात्री 10च्या सुमारास पुन्हा हिरेहब्बू वाड्यात सर्व नंदीध्वज दाखल झाले. विविध मंडळांतर्फे भाविकांना चहा, पाणी, दूध वाटप प्रदक्षिणा मार्गावर करण्यात येत होते. सकाळी 10 पासूनच सर्व मंडळे सज्ज झाली. सायंकाळी सहापर्यंत दूध वाटप कार्यक्रम करण्यात आला. विजापूर वेस परिसरात छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडने मिरवणुकीचे स्वागत केले. सोमवारी दुपारी १ वाजता संमती कट्टा परिसरात अक्षता सोहळा होणार आहे.

विडा देण्याचा कार्यक्रम
अमृत लिंगाची पूजा झाल्यानंतर हिरेहब्बू यांनी शेटे यांना विडा दिला. त्यानंतर देशमुख, मसरे, कळके, बहिरो पाटील, भोगडे, थोबडे, सिद्धय्या स्वामी, मल्लिनाथ जोडभावी, दर्गोपाटील, शिवशेट्टी, गवसणे, इटाणे (पूजेचे मानकरी व झोळीवाले मानकरी) यांना विडा देण्यात आला.

सात नंदीध्वजांचे मानकरी
पहिल्या नंदीध्वजासह राजू बहिरो पाटील, दुसरा नंदीध्वज बाळासाहेब दर्गोपाटील, तिसरा नंदीध्वज रेवणसिद्ध मायनाळे, चौथा आणि पाचवा नंदीध्वज श्री विश्‍व ब्राह्मण समाज कालिका मंदिर सेवा ट्रस्ट मंडळ सोनार समाज, सहावा नंदीध्वज प्रकाश बनसोडे, सातवा नंदीध्वज मारुती बनसोडे आणि मच्छिंद्र बनसोडे यांच्यासह समाजबांधव तैलाभिषेकाच्या मिरवणुकीत उत्साहाने सहभागी झाले होते.

रविवार असल्याने आबालवृद्धांची गर्दी
नंदीध्वजांच्या मिरवणुकीला आबालवृद्धांची गर्दी उसळली होती. मानाच्या सात नंदीध्वजांच्या मागोमाग शहरातील विविध भागांतील लहान मुले हे नंदीध्वजांच्या प्रतिकृती घेऊन निघाले होते. मिरवणुकीदरम्यान सिद्धेश्‍वर महाराजांचा जयघोष करत अतिशय उत्साहाने सर्वांनी सहभाग घेतला होता. रविवार सुटीचा दिवस असल्याने अनेकजण कुटुंबासह या मिरवणुकीत सहभागी झाले होते. पहिल्यांदाच मिरवणुकीत बाराबंदी घालून आलेल्या भाविकांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसून येत होता.

सोशल मीडियावर अपडेट
मिरवणुकीत सहभागी झालेल्या, बाराबंदी परिधान केलेल्या भाविकांनी सेल्फी आणि फोटो काढून आपला आनंद व्यक्त केला. ते फोटो सोशल मीडियावर शेअर केले. सोशल मीडियावर रविवारी दिवसभर तैलाभिषेक आणि मिरवणुकीची छायाचित्रे शेअर करण्यात आली. हर्र बोला, सिद्धेश्‍वर महाराज की जय आदी कमेंट भाविक करताना दिसून आले. आपल्या लहान मुलांचे बाराबंदीतील फोटो विशेष करून शेअर करण्यात येत होते. त्याचसोबत नवविवाहित तरुणांनी आपल्या पत्नीसमवेत बाराबंदीतील फोटो काढून त्याचे डीपी ठेवल्याचेही दिसून आले.

हौशी छायाचित्रकारांचा उत्साह
सिद्धेश्‍वर यात्रेच्या निमित्ताने हौशी छायाचित्रकार रणजित शेळके, विनय गोटे, आनंद चव्हाण, शिवाई शेळके यांच्यासह अनेक तरुण-तरुणींकडून फोटोग्राफी करण्यात येत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सिद्धेश्‍वर यात्रा अधिकाधिक लोकांपर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्न असल्याचे रणजित शेळके यांनी सांगितले.

परगावच्या भाविकांचा सहभाग
सिद्धेश्‍वर यात्रेत आंध्र प्रदेश, कर्नाटक येथील भाविक सोलापुरात दाखल झाले आहेत. सोबतच मुंबई, पुणे येथील अनेक भाविक रविवारच्या मिरवणुकीत उत्साहाने सहभागी झाल्याचे दिसून आले. अशी यात्रा आम्ही पहिल्यांदाच अनुभवत असल्याचे त्यांनी सांगितले

Post a Comment

 
Top