0
गेल्या दोन दिवसापासून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत आहे, सरकारचे धोरणे नडली असली तरी त्यांच्याशी आम्ही भांडतच आहोत, मात्र कर्जमाफीच्या नावावर बँकेकडून होणारी अडवणूक तसेच त्यांच्याकडून शेतकऱ्यांना मिळणारी अपमानास्पद वागणूक याबद्दल सुरुवातीला यादी घेवून बँकेच्या अधिकाऱ्यांना समजावून सांगू, ऐकले नाही तर मग मात्र शिवसेनेच्या स्टाईलने आंदोलन करु, असा खणखणीत इशारा शिवसेना नेते तथा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे दिला.

नांदेड जिल्ह्यातील मरळक, खडकी, निळा, वसमत तालुक्यातील आसेगाव याठिकाणी त्यांनी आज शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासमवेत सचिव वरुण सरनाईक, सिध्देश कदम, पूर्वेस सरनाईक, कोअर कमिटीचे सदस्य विपूल पिंगळे, डॉ. गणेश राजे भोसले, नांदेडचे विस्तारक अमीत गिते आदी उपस्थित होते.

प्रत्येक गावात निर्माण झालेली परिस्थिती वेगवेगळी असली तरी शेतकऱ्यांची व्यथा मात्र कायमच आहे. असे असताना हे प्रश्न का सुटले नाहीत, याबाबत आमचे सरकारशी भांडण सुरुच आहे. मग तो कर्जमाफीचा प्रश्न असो, शेतकऱ्यांच्या पिकविम्याचा प्रश्न, बि-बियाणे, औजारांचा प्रश्न असो किंवा पाणीटंचाईचा प्रश्न असो, या सर्वाबाबत सरकारी यंत्रणेने दाखविलेली अनास्था ही चिंतेची बाब असली तरी यावर्षीचा भीषण दुष्काळ हा भयावक आहे, एरवी दुष्काळ मार्च,एप्रिलमध्ये पडतो, मात्र तो नोव्हेंबर, डिसेंबरपासूनच सुरु झाला आहे. अशा अवस्थेत वैफल्यग्रस्त होऊ नका, आणि आत्महत्येचा मार्ग पत्करु नका, तसा विचार देखील तुम्ही मनात आणू नका, शिवसेना तुमच्या सदैव पाठिशी राहिल, ज्या ज्या वेळी अडचण येईल, त्या त्या वेळी शिवसेनेची आठवण करा, दुष्काळाचा हा माझा पहिला दौरा आहे, पशूधन वाचवायचे आहे, त्यासाठी सुरुवातीला मी तुमच्या जनावरांसाठी चारा घेवून आलो आहे. यानंतरही मी परत येईन. मात्र चिंता करु नका, जात, पात, धर्म याचा विचार न करता जो कोणी गरजू असेल, जो कोणी हतबल असेल त्याच्या पाठिशी शिवसेना खंबीरपणे उभी राहिल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कर्जमाफीची सगळीच गुंतागुंत आहे. सरकार म्हणते कर्जमाफी झाली, कर्जमाफीची प्रमाणपत्रही काही जणांना मिळाली, मात्र प्रत्यक्षात कर्जमाफी झाली नाही. बँकेच्या अधिकाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक मिळते, अशाही तक्रारी आल्या असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. बुधवारच्या या दौऱ्यात मरळक, निळा, आसेगाव, खडकी येथील सर्वच शेतकऱ्यांशी संवाद साधला. सर्वांनी हताशपणे या दुष्काळाबाबत चिंता व्यक्त केली. त्यावेळी शिवसेनेला हाक मारा, आम्ही मदतीसाठी तयार आहोत, मात्र घाबरुन जावू नका व हताश होऊ नका, असे आवाहनही त्यांनी केले.

या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, शेतीचा प्रश्न, पिकविम्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे हे सर्व प्रश्न कशा पध्दतीने मार्गी लागतील, यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत, असा विश्वासही त्यांनी दिला. मरळक येथे तालुकाप्रमुख जयवंतराव कदम यांनी आयोजित केलेल्या शेतकऱ्यांशी संवाद व दुष्काळी दौऱ्यात शेतकऱ्यांशी हितगूज साधले. त्यानंतर मरळकच्या सुप्रसिध्द इमलेश्वर मंदिरात जावून महादेवाचे दर्शन घेतले. खडकी ता.नांदेड येथे राष्ट्रीय पेयजल योजनेतंर्गत नळयोजनेचे भूमिपूजन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. खडकी येथे शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधून त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. खडकी येथील कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन युवासेनेचे जिल्हा युवाधिकारी माधव पावडे यांनी केले.

यावेळी आमदार जयप्रकाश मुंदडा, आ. हेमंत पाटील, शिवसेनेचे संपर्कप्रमुख आनंदराव जाधव, जिल्हाप्रमुख दत्ता कोकाटे, आनंदराव बोंढारकर, उमेश मुंडे, हिंगोलीचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर, जिल्हा समन्वयक धोंडू पाटील, बाबूराव कदम, सहसंपर्कप्रमुख प्रकाश मारावार, भुजंग पाटील, जिल्हा युवाधिकारी महेश खेडकर, माधव पावडे आदी उपस्थित होते.

Post a Comment

 
Top