0
प्रत्येक सणाला वेगळं महत्त्व आहे. आपले सण हे आपली जीवनशैलीच आहे. सण म्हणजे केवळ रुढी, परंपरा नाही तर ज्ञान, विज्ञान, निसर्ग, आरोग्य  यांचा एक अपूर्व मेळ असतो. सण साजरा करण्यामागे एकमेकांचा स्नेह, प्रेम जिव्हाळा आणि एकोपा वाढावा असा संदेश दिला जातो.  मकर संक्रांतीचादेखील हाच संदेश आहे.  म्हणूनच या दिवशी तिळगूळ घ्या, गोड बोला असे म्हटले जाते.  तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले आहे. प्रत्येक गोष्ट आता काही सेकंदातच एका क्लिकवर व्हायरल होते व पाहता येते. याचा फायदा खरं तर सण साजरे करताना होतो.  सोशल मीडियामुळेच सर्व सणांची सर्व धर्मीयांना माहिती होत असते. तसेच बाजाराचा (मार्केट)  याचादेखील परिणाम सणांच्यावर होतो. सण साजरे करण्याचा उद्देश तोच असतो मात्र काळानुसार त्याचा ट्रेंड बदला आहे. मकर संक्रात साजरा करण्याचा  ट्रेंडदेखील बदलत आहे.

प्रत्येक सण काहीसे एकसारखे साजरे केले जातात. पूर्वी सणानिमित्त घरात गोडाचा स्वयंपाक केला जात असे. विशेषकरुन पुरणपोळी केली जायची. आता त्याची जागा स्वीट्स म्हणजे गुलाबजामून, मिठाईच्या बॉक्स सारख्या तयार पदार्थांनी घेतली आहे. संक्रांतीचे देखील तसेच आहे. पूर्वी शेतात ज्या भाज्या या कालवधीत पिकायच्या त्यानुसार हा सण साजरा करत असत. आता मात्र बाजरीकरणामुळे मकर संक्रांती साजरा करण्याचा संपूर्ण ट्रेंडच बदलला आहे असेच म्हणावे लागेल. धावपळीचा जगात वेळेच्या आभावामुळे रेडीमेट पदार्थांना पसंती दिली जाते.

सर्व हिंदू सण तिथीनुसार साजरे केले जातात मात्र मकर संक्रातीचा सण हा तारखेनुसार साजरा केला जातो. मकर संक्रात सण दरवर्षी १४ जानेवारीला येतो. क्वचित हा सण १५ जानेवरीला येतो. २०१९ मध्ये संक्रात १५ जानेवारील आली आहे. संक्रांतीला सूर्य मकरराशीत प्रवेश करतो. वर्षात बारा संक्रांती येतात पण मकर संक्रांती त्यातली एक महत्त्वाची मानली जाते. गूळ आणि तिळाची  जागा आत साखरेच्या तिळगूळांनी घेतली आहे. हा बाजाराचा परिणाम आहे. जागतिकीकरणाचा परिणाम बाजारावर झाला आहे. तोच प्रभाव सणांच्यावर पाहिला मिळतो. बाजरात जे उपल्बध साहित्य असते त्यानुसारच आजकाल सण साजरे केले जातात. मात्र उत्साह तेवढाच आहे.  जमाना बदला तरी सणाचे महत्त्व बदलेले नाही. हेच भारतीय सणांचे वैशिष्टय आहे.

आहारशास्त्रानुसारही संक्रांतीला खूप महत्त्व आहे. हा सण थंडीच्या दिवसत येत असल्यामुळे थंडीच्या दिवसात शरीर कोरडे, रुक्ष बनलेले असते म्हणून संक्रांतीत तिळाचे पदार्थ खातात. त्याचप्रमाणे भोगीच्या दिवशी तीळ, मिक्स भाजी, वांग चं लोणी असा आहार घेताला जातो जेणेकरुन शरीरात उष्णता, ऊर्जा निर्माण होईल. धावपळीच्या जगात आरोग्याकडे सर्वांचे दुर्लक्ष होते. पण भोगिच्यानिमित्ताने तरुणाई आहारशास्त्र फॉलो करते. गृहीणींनीदेखील भोगीच्या मिक्स भाजीचे मॉडीफिकेशन करुन त्याला पावभाजीचे रुप दिले आहे.

संक्रांत हा खास करुन स्त्रियांचा सण आहे.  संक्रांतीच्या दिवसात घरोघरी स्त्रिया हळदी कुंकवाचा समारंभ आयोजित करतात.  पूर्वी हळदी कुंकवाच्या निमित्ताने का होईना स्त्रियांना घराबाहेर पडता येत होते. एकमेकींचे सुख दु:ख जाणून घेता येते होती. आपणच बनवलेली काही तरी वस्तू यानिमित्त महिलावर्ग एकमेकीस देत असत. यामुळे जिव्हाळा व आपुलकीचे नाते एकमेकींच्या वाढीस लागत होते. आताही हे बदलेले नाही. फक्त ट्रेंड बदलला आहे.
आता नोकरी,  घरची जबाबदारी,  यातून स्त्रियांना वेळ मिळत नाही. हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामुळे का असेना त्या स्वतःला वेळ देतात. सर्व मैत्रणी एकत्र जमतात सुख दु:ख जाणून घेतात.  मैत्री वाढवतात, तिळगुळासह एकमेकींना उपयोगी भेटवस्तू, मिठाई देतात. आज संक्रांतीच्या भेटवस्तूंनी बाजार भरुन गेलेला असतो. यातील बर्याच वस्तू या संसार उपयोगी तर काही मेकअप अशा पद्धतीच्या असतात. प्रत्येकजण आपल्या मैत्रणीला वेळेअभावी रेडीमेट भेटवस्तू घेण्याला पसंती देतात. मकर संक्रांतीत रेडीमेट भेटवस्तू  देण्याचा ट्रेंड जरी नवीन असला तर यामागच्या भावना त्याच असतात. फरक एकच की प्रत्येक सणाला 'रेडीमेटची' झालर लागली आहे. यालाच मकर संक्रांतीचा बदलता ट्रेंड म्हटले तर वावगे वाटायला नको.
 संक्रांतीत वाण देण्याची पद्धत पूर्वीपासून सुरु आहे. नववधूंना हलव्याच्या दागिन्यांनी सजवून तिचं कौतुक केले जाते. हलव्याच्या दागिन्यांचे सांगयचे झाले तर याचं देखील तसचं आहे. पूर्वी फक्त हलव्यांनी सजवलेले दागिने पाहायला मिळत होते.  आता मात्र या दागिन्यांचे रुपडे पालटले आहे. या दागिन्यांच्या तिळगुळ, वेल्वेट पेपर, रंगीत पेपर, कुंदन, टिकल्या, मोती, जर यांनी मडवले जातात. यासाठी आजच्या नववधू हलव्याचे दागिने घालून खास फोटोसेशन करतात. लग्नात ज्याप्रमाणे प्री आणि पोस्ट वेडींग फोटोशूट केले जाते त्याप्रमाणे संक्रांती हलव्याचे दागिने घालून फोटोशूट करणे हा एक नवीन ट्रेंड हळूहळू रुजायला लागला आहे.

संक्रांतीच्या वाणाला वेगळे महत्त्व आहे. नववधूला संक्रांतीत  सासरच्या मंडळीकडून वाण (ववसा) दिला जातो. काळानुसार याचा ट्रेंड बदलत आहे. पूर्वी  या वशात हळदी- कुंकू, फनी, मेंहदी, काचेच्या बांगड्या यासरख्या वस्तू दिल्या जातात.  ऑनलाइनच्या जमान्यात वाण (ववसा) देण्याचा ट्रेंड बदलला आहे म्हणजे काहीसा हायटेक झाला आहे.  आज वाण देण्यासाठी लागणार्या वस्तू स्त्रिया आपल्या गरजेनुसार व आवडनीनुसार  ऑनलाईनच मागवताना दिसतात. यामध्ये मेकअपचे साहित्य म्हणजे लिपस्टिक, कॉम्पॅक्ट पावडर, मेकअप बेस, शिंदूर पेन्सिल, काजळ पेन्सिल, डिओ, बांगड्या,  मॅचिंग बिंदी, मेकअप बॉक्स, मेंहदी कोन, अशा अनेक वस्तूनीं सजवलेला वाण संक्रांतीत नववधूला दिला जातो. बाजारात रेडीमेट सजवलेला वाण संक्रांतीच्या दिवसात विकण्यासाठी असतो. तसेच यासोबत मातीच्या सुगड्याही दिल्या जातात. सुगड्याही वेगवेळ्या रंगात, वेगवेगळ्या कलाकुसरीनी सजलेला बाजारात सहज उपल्बध होतात. टेकनो जगात काहीजणी यूटयूबचा वापर करुन संक्रांतीचा वाण घरातच सजवतात. टेक्नो युगामुळे संक्रांतीचा वाण देखील हायटेक झाला आहे.

संक्रांतीच्या काळात आकाश मोकळे असते. हवा गार आणि प्रसन्न करणारी असते. प्रत्येकाच्या घरच्या गच्चीवर लहानांपासून थोरांपर्यंत पतंग उडवण्यासाठी झालेले गर्दी दिसते. त्याचप्रमाणे आकाशसुद्धा वेगवेगळ्या पतंगाच्या आकारांनी आणि रंगानी रंगून गेलेले दिसते. मांजा, फिरकी आणि पतंग याची चढाओढ सर्वत्र सुरु असते. आताची मुले पतंग उडवण्यापेक्षा मोबाईलवर गेम खेळण्यास पसंती देतात. यासाठी त्यांच्या खेळाची गोडी निर्माण होण्यासाठी आज काईट फेस्टीवल आयोजित केले जातात. मात्र आपले पतंग उडविणे पक्षांच्या जिवाला धोका निर्माण करते. त्यासाठी पतंग उडविताना काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

 एकमेकांबद्दल जिव्हाळा, स्नेह निर्माण करण्याचे संक्रांतीचे महत्त्व आहे. आजकाल सण साजरे करण्याचा ट्रेंड बदलत आहे. प्रत्येकजण वृद्धाश्रम, अनाथश्रम, अंध-अंपग विद्यालये, सामाजिक संस्था अशा अनेक ठिकाणी तिळगूळ, गरजेला पडणार्या भेटवस्तू व त्यांना काही मदत करुन संक्रांतीचा सण साजरा करताना दिसतात. सर्व भेद दूर करुन आज सण साजरे होतात. या बदलेल्या ट्रेंडच्या माध्यमातून सण साजरे करताना समाज तुमच्यासोबत आहे सांगण्याचा प्रयत्न असतो. आधुनिक विचारांनी समाजाचे स्वरुप बदलत आहे आणि हा बदल समाजाच्या दृष्टीने नक्कीच स्वागतार्ह आहे.

Post a Comment

 
Top