0
येत्या शैक्षणिक वर्षापासून शाळांमध्ये खेळ हा विषय अनिवार्य केला जाणार असून, रोज एक तास खेळासाठी ठेवला जाणार आहे, अशी घोषणा केंद्रिय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली.

म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत आयोजित खेलो इंडियायूथ गेम्सच्या समारोपाला प्रमुख पाहुणे म्हणून जावडेकर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपदाचा करंडक देण्यात आला. या वेळी राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे, केद्रांच्या क्रीडा विभागाचे सचिव राहुल भटनागर, स्पोर्ट्स अॅथोरिटी ऑफ इंडियाच्या महासंचालक नीलम कपूर, उपमहासंचालक संदीप प्रधान, विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, क्रीडा आयुक्त सुनील केंद्रेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

'खेलेगा इंडिया, तभी खिलेगा इंडिया' असा नारा देऊन जावडेकर म्हणाले, 'खेलो इंडियाच्या निमित्ताने क्रीडा क्षेत्रातील प्रतिभावान खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले आहेत. खेळाच्या माध्यमातूनच सशक्त भारत निर्माण होणार असून, मैदानावर घडणारा हाच उद्याचा नवा भारत आहे. शालेय अभ्यासासोबत खेळही महत्त्वाचा आहे. म्हणूनच पुढील शैक्षणिक वर्षापासून खेळ हा विषय अनिवार्य केला जाणार असून, रोज एक तास खेळासाठी ठेवला जाणार आहे.'

क्रीडामंत्री विनोद तावडे म्हणाले, 'खेलो इंडियाचे आयोजन करण्याचे संधी दिल्याबद्दल केंद्र सरकारचे आभारी आहोत. हा क्रीडा सोहळा पाहण्यासाठी जवळजवळ ५५ हजार शालेय मुलांनी उपस्थिती लावली आणि त्यांनी पाच मिनिटे नव्हे, पन्नास मिनिटे आणखी खेळू, असा निर्धार करून ते गेले आहेत. उत्तम आयोजनाचे श्रेय हे क्रीडा विभागातील सर्व अधिकाऱ्यांना जाते. राज्याच्या क्रीडा खात्याने ठरविले आहे की, ज्या खेळाडूंनी सुवर्ण पटकावले. त्यांची कामगिरी आणखी उंचावण्यासाठी क्रीडा खाते काम करणार आहे. महाराष्ट्र 'नंबर वन' झाला आहे, याचा आनंद आहे. मात्र, सर्व राज्यांनी खेळाकडे लक्ष द्यायला हवे. आम्हाला हिंदुस्थान 'नंबर वन' पाहिजे.'

Post a Comment

 
Top