0
फसवणूक कारखाना उभारणीसाठी जमिनीच्या मोबदल्यात दिलेला धनादेश वटला नाही

बीड- अंबाजोगाई तालुक्यातील पुस येथील जगमित्र साखर कारखाना उभारणीसाठी येथील शेतकरी मुंजा किशनराव गित्ते (रा.तळणी ता.अंबाजोगाई) या शेतकऱ्याची जमीन खरेदी करण्यात आली होती. या जमिनीच्या मोबदल्यात शेतकऱ्याला चाळीस लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला होता. हा धनादेश न वटल्यामुळे विरोधी पक्ष नेते धंनजय मुंडे यांच्यावर बर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास करून धनंजय मुंडे यांच्यासह कारखान्याचे संचालक वाल्मीक कराड, सूर्यभान मुंडे यांच्या विरोधातील दोषारोपपत्र अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले आहे. दरम्यान अंबाजोगाईचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश गायकवाड यांनी या प्रकरणात तिघांना नोटिसा काढल्या आहेत.

अंबाजोगाई तालुक्यातील शेतकरी मुंजा किसनराव गिते (रा. तळणी) यांची तीन हेक्टर १२ आर जमीन पुस येथे जगमित्र साखर कारखाना उभारणीसाठी ५० लाखांत खरेदी करण्यात आली होती. तेव्हा गिते यांच्या मुलासह चौघांना साखर कारखान्यात नोकरी लावून देण्याची हमी देण्यात आली होती. या प्रकरणात आता पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्रात कलम ४२०, ३४ मध्ये ४६५, ४६८, ४७१,४१९,अशी कलमे समाविष्ट करून २६ डिसेंबर २०१८ रोजी अंबाजोगाई येथील प्रथम वर्ग न्यायादंडाधिकारी क्रं.३ यांच्याकडे दाखल केले आहे. मुंजा किसनराव गिते यांची जमीन ५० लाखांत घेण्यात आली. जमिनीचे खरेदीखत ७ जून २०१२ रोजी करण्यात आले. धनंजय मुंडे यांच्यासाठी मुखत्यारपत्र वाल्मीक बाबूराव कराड (पांगरी), सूर्यभान हनुमंतराव मुंडे (तळेगाव ता. परळी) यांच्या नावे करण्यात आले. शिवाय शेतकऱ्याचा मुलगा बाळासाहेब, भावाची मुले राजाभाऊ व प्रभाकर आणि नातू आत्माराम यांना साखर कारखान्यात नोकरी देण्याची हमी देण्यात आली होती. मुलगा, नातू आणि भावाच्या दोन मुलांना प्रतिमाह तीन हजार रुपयांप्रमाणे सहा महिने काम देऊन पगार दिलेला आहे. जमिनीच्या व्यवहारात ठरल्याप्रमाणे शेतकऱ्याला कारखान्याने प्रथम एक लाख व नंतर सात लाख ८१ हजार २५० रुपयांचा धनादेश दिला गेला.

कारखान्याचा खात्याचा परळी येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या नावे असलेला ४० लाख रुपयांचा धनादेश शेतकऱ्याला दिला. तेव्हा गिते यांना मिळालेला धनादेश बँकेत न वटताच परत आला .या नंतर शेतकऱ्याने तीन वर्षे पाठपुरावा करूनही रक्कम मिळाली नाही. शेवटी गिते यांनी बर्दापूर पोलिस ठाण्यात २०१५ तक्रार देऊन एक महिना चकरा मारूनही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. शेवटी गिते यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली असता खंडपीठाने या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यासह वाल्मीक कराड (पांगरी), सूर्यभान मुंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतरच बर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणात कारवाई होत नसल्याने शेतकरी गिते यांनी खंडपीठात याचिका दाखल केली होती . खंडपीठाने दोषारोपपत्र किती दिवसात दाखल केल जाईल अशी विचारणा केली तेंव्हा डिसेंबर २०१८ पर्यंत दाखल केले जाईल असे शासनातर्फे सांगण्यात आले होते.

राज्यपाल व मुख्य सचिवाकडे करावा लागला पाठपुरावा
पुस येथील जगमित्र साखर कारखान्यास दिलेल्या जमिनीच्या मोबदल्यापोटीचा ४० लाख रुपयांचा धनादेश न वटल्या प्रकरणी या अगोदर बर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात सरकारी वकिलाने खंडपीठाची ऑर्डर शासनाकडे पाठवली. त्यानंतर खंडपीठाच्या ऑर्डरला राज्यपालांनी दोषारोपपत्र दाखल करण्याची मान्यता दिल्यानंतर परत हा प्रस्ताव मुख्य सचिव पोलिस महासंचालकांकडे पाठवला गेला. त्यानंतर बीडच्या पोलिस अधीक्षकांकडे दोषारोप पत्राचे आदेश पाठवले. २६ रोजी सर्व प्रकिया पूर्ण होऊन अखेर अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयात मुंडे यांच्यासह तीन जणांवर दोषारोप पत्र दाखल झाले आहे. या प्रकरणात परळी येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत मुंडे यांनी शेतकरी मुंजा गित्ते यांच्या बाजूने पाठपुरावा केला आहे.

मला न्याय मिळाला पाहिजे
माझी जमीन घेऊन फसवणूक झाली आहे. मुलांनाही नोकऱ्या मिळाल्या नाहीत. आता कारखाना होईल की नाही हे नक्की नाही .माझ्या जमिनीचे पैसे बाजारभावाप्रमाणे मला मिळाले पाहिजेत. सहा वर्षात माझे नुकसान झाले असून मला न्याय मिळाला पाहिजे. - मुंजा किशनराव गित्ते, शेतकरी
News about Dhananjay Mundhe

Post a Comment

 
Top