0
मुंबई :
सुफियाना अंदाजात संगीतप्रेमींना भुरळ घालणारे पाकिस्तानचे प्रसिद्ध गायक राहत फतेह अली खान यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. राहत फतेह अली खान यांच्यावर भारतात विदेशी चलनाच्या तस्करीचा आरोप आहे. सूत्रांच्‍या माहितीनुसार, राहत फतेह अली खान यांनी अवैधरित्या ३ लाख ४० हजार यूएस डॉलर कमावले आहेत. त्यांनी त्यापैकी २ लाख २५ हजार डॉलरची तस्करी केली आहे.
फेमा (FEMA) कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी ईडीकडून ही नोटीस बजावण्यात आली आहे. आता ईडीने राहत फतेह अली यांच्‍याकडून उत्तर मागितले आहे. जर अली यांनी दिलेल्‍या उत्तराने ईडीचे समाधान झाले नाही तर तस्करी केलेल्या रकमेवर ३०० टक्के दंड भरावा लागणार आहे. त्‍याचबरोबर, भारतात त्यांना कुठलाही कार्यक्रम करता येणार नाही. त्‍यावर बंदीही घातली जाऊ शकते.

यापूर्वी, २०११ मध्ये राहत फतेह अली खान यांना सव्वा लाख डॉलरसोबत पकडण्‍यात आले होते. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ते पकडले गेले होते. त्यांच्याकडे या रकमेशी संबंधित कोणतेही कागदपत्रे नसल्‍याने त्‍यांना आणि त्‍यांच्‍या मॅनेजरना ताब्‍यात घेण्‍यात आले होते. 

राहत फतेह अली खान हे सुफी गायकीसाठी प्रसिध्‍द आहेत. त्‍यांनी बॉलिवूडमध्‍ये अनेक चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. त्‍यांची अनेक रोमॅन्टिक गाणी आजही लक्षात राहण्‍याजोगे आहेत. नुकताच रिलीज झालेला सिंबा या चित्रपटातील 'तेरे बिन नहीं...'या गाण्‍यालाही अली खान यांनी आपला आवाज दिला आहे. 


Post a comment

 
Top