0


कराड : 
कराड शहरामध्ये फ्लेक्स संख्या एवढ्या प्रमाणात वाढल्या आहेत की शहरातील बहुतेक सर्व दुकाने, बिल्डिंगवर मुकुटासारखे होर्डिंग लागलेले असतात. विविध प्रकारच्या जाहिराती आणि गल्लीबोळातील दादा, काका, मामा, तात्या, भाऊ, नाना यांच्या वाढदिवसांचे आणि निवडींचे फ्लेक्स त्याचबरोबर विविध उत्पादनांच्या जाहिराती असणारे फ्लेक्स महिनोन्महिने शहराची ‘शोभा’ वाढवित आहेत. एकाच ठिकाणी सातत्याने लावण्यात येणारी यातील अनेक फ्लेक्स धोकादायक स्थितीत आहेत. याबाबत पालिकेने वेळीच खबरदारी घेतली नाही तर पुणे सारखी घटना घडल्यास नवल वाटायला नको. 
पुणे येथे लोखंडी होर्डिंग काढताना झालेल्या अपघातामध्ये चार जणांना जीव गमवावा लागला तर सात जण जखमी झाले. यामुळे शहरात लावल्या जात असणार्‍या फ्लेक्सबाबतचा प्रश्‍न पुन्हा एकदा गांभीर्याने विचार करावा असा समोर आला आहे. शहरात लागले जाणारे फ्लेक्स शहराच्या सौंदर्याचे विद्रुपीकरण करतेच परंतु यामुळे अनेकांना जीवही गमवावा लागतो याचे ज्वलंत उदाहरण पुणे येथे घडले. 
कराड शहरात सध्या पालिकेची परवानगी घेतलेले खासगी मिळकतीवर उंचावर असणारे 22 फ्लेक्स तर ग्राऊंडवर 30 फ्लेक्स आहेत. मात्र, कोल्हापूर नाक्यापासून विद्यानगरपर्यंत किमान शंभर होर्डिंग्ज लावल्याचे दिसून येते. कोल्हापूर नाका, शाहू चौक, दत्त चौक, बसस्थानक परिसर, कृष्णा नाका परिसर, मनोरा परिसर, शहरातील अंतर्गत भागात, कृष्णा घाट परिसरात मोठ्या प्रमाणात मोठमोठे बॅनर लावलेले दिसून येतात. 
पूर्वीचे होर्डिंग काढून पुन्हा त्याच जागेवर दुसरे होर्डिंग लावले गेल्याने त्याजागी पूर्वीपेक्षाही जास्त मोठा खोल खड्डा पडला जातो. बहुतेक होर्डिंगचा सळ्या गंजलेल्या अवस्थेत आहेत.  मुळातच ज्याठिकाणी होर्डिंग्ज लावले जातात त्याठिकाणी एक ते दोन फूट पाया काढून त्यावर बॅनर उभारले जातात. गर्दीच्या ठिकाणी लावल्या गेलेल्या या होर्डिंगमुळे अनेकांचे जीव धोक्यात आहेत, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. शहरातील दत्त चौकामध्ये उभारण्यात आलेल्या भल्या मोठ्या होडिर्ंंगखालीच अनेक दुकाने आहेत. हा रस्ता पूर्णपणे वर्दळीचा आहे.  दिवसरात्र या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. बसस्थानकात ओळीने आठ ते दहा फ्लेक्स लावले गेले आहेत. फुटपाथवर अनेक व्यावसायिक आहेत तर याठिकाणाहूनही मोठ्या प्रमाणात नागरिकांची येˆ जा असते. त्यामुळे त्यांच्या जिवीतास धोका निर्माण होत आहे. े
विद्यानगर परिसराचे विद्रुपीकरण...
कृष्णा नाक्यापासून विद्यानगर परिसरात तर फ्लेक्सचे मोठे जाळे पसरले आहे. विद्यानगरमध्ये कॉलेजच्या समोर मोठमोठे बॅनर लावले जातात. या परिसरात कॉलेज असल्यामुळे विविध क्लासेसच्या बॅनरने विद्यानगर परिसर झाकोळला गेला आहे. फुटकाळ दादा किंवा एखाद्या युवा नेत्याच्या वाढदिवसाच्या फ्लेक्समुळे विद्यानगर परिसराचे विद्रुपीकरण झाले आहे. यातील किती बॅनर मजबूत आहेत याचे परिक्षण झाले आहे काय?  हा संशोधनाचा विषय आहे.
फ्लेक्स लावलेल्या जागा सुरक्षित  आहेत का?
सध्या शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात फ्लेक्स उभारले आहेत की या बॅनरचेच नेते जास्त प्रमाणात झाले आहेत. दुसरा वाढदिवस आला तरी पूर्वीचेच होर्डिंग्ज त्याच ठिकाणावर असतात. शहरात एकाच ठिकाणी वारंवार बोर्डिंग लावल्यामुळे त्याठिकाणची जागा सुरक्षित आणि मजबूत आहे का याचा विचार होणे गरजेचे आहे. तसेच ज्याठिकाणी फ्लेक्स लावले जातात ती ठिकाणे तपासण्याची यंत्रणा पालिकेकडे आहे का?
शहर फ्लेक्समुक्त करणे गरजेचे...
शहरामध्ये सध्या नगरपालिकेची मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहिम सुरू आहे. शहर चकाचक करण्यासाठी दररोज अनेक कॉलनी, पेठा, मोकळे प्लॉट, झोपडपट्टी स्वच्छता सुरू आहे. फ्लेक्समुळे शहर विद्रुप दिसत असून  शहरातील बिल्डिंगवर लावण्यात आलेल्या या फ्लेक्सचीही स्वच्छता होणे गरजेचे आहे, अस ेमत नागरिकांमधून व्यक्त होत आहे. 
फ्लेक्सपासून अनर्थ घडल्यास जबाबदार कोण?
जाहिरातीच्या अनुषंगाने लावण्यात येणारे हे फ्लेक्स असले तरी वादळी वारा आल्यास लहानसहान फ्लेक्स तुटले जातात तर याचवेळी फ्लेक्सला असणारे अँगल कमकुवत बनतात. त्यामुळे भविष्यात जर हे फ्लेक्स कोसळले व मोठा अनर्थ घडला तर याला कोणास जबाबदार धरणार? पुणे येथे घडलेल्या घटनेस संबंधित ठेकेदार, प्रशासनास जबाबदार धरले गेले असले तरी ज्यांना प्राणास मुकावे लागले, ज्यांच्या कुटुंबातील कर्ते पुरूष मृत्यूमुखी पडले, ज्यांना कायमचे जायबंदी व्हावे लागले त्यांची जबाबदारी कोण घेणार किंवा त्यांच्या न संपणार्‍या व्यथेस कोण जबाबदार राहणार. त्यामुळे असाच प्रकार कराड शहरात घडल्यास याला जबाबदार कोण राहणार? असा प्रश्‍न निर्माण होत आहे. 

Post a Comment

 
Top