0
एका दरोड्याच्या घटनेत वापरलेले हे पिस्तूल असल्याचा संशय पाेलिसांना होता.
जळगाव- घरात ठेवलेले पिस्तूल पोलिसांना काढून देण्याचा बहाणा करीत एका संशयिताने मागच्या दाराने पळ काढल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी धानोरा (ता.चोपडा) येथे घडली. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध घेतला.


धानोरा गावात साळुंखे नावाच्या एका २८ वर्षीय तरुणाकडे पिस्तूल असून, तो ते विक्री करणार असल्याची गुप्त माहीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली होती. त्यानुसार एलसीबीचे पथक मंगळवारी दुपारी ४ वाजता धानोरा गावात पोहोचले. कॅन्डी फॅक्टरी परिसरात सापळा रचण्यात आला. पोलिसांनी डमी ग्राहक पाठवून साळुंखे याच्याकडून पिस्तूल खरेदी करण्याचा सापळा रचला होता. ठरल्याप्रमाणे साळुंखे या सापळ्यात अडकला. पोलिसांनी त्याला खाक्या दाखवताच आपल्याकडे पिस्तूल असल्याची कबुली त्याने दिली. पिस्तूल घरी असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. सापळा यशस्वी झाल्याच्या आनंदात पोलिस व डमी ग्राहक साळुंखेला घरी घेऊन गेले. यानंतर साळुंखे पिस्तूल घेण्यासाठी घरात गेला तर पोलिस घराबाहेर उभे होते. बराच वेळ हाेऊनही तो बाहेर आला नाही, त्यामुळे संशय आल्याने पोलिस घरात गेले. तत्पूर्वी साळुंखे हा मागच्या दरवाजाने पसार झाल्याचे समोर आले.पोलिसांनी संपूर्ण गावात तसेच चोपडा, अडावद या भागात त्याचा शोध घेतला; परंतु तो मिळून आला नाही.

अधिकाऱ्यांचा दुजोरा
पिस्तूल विक्रीच्या तयारीत असलेल्या एका संशयिताकडे डमी ग्राहक पाठवून अडकवले होते; परंतु नंतर संशयित पळून गेला असून, त्याचा शोध सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

पिस्तूल दरोड्यात वापरल्याचा संशय
एका दरोड्याच्या घटनेत वापरलेले हे पिस्तूल असल्याचा संशय पाेलिसांना होता. दरोड्याच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या एका संशयिताने पोलिसांना ही माहिती दिली होती. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने या संशयिताला सोबत घेऊन धानोरा गावात सापळा रचला होता. संशयिताच्या म्हणण्यावरूनच साळुंखे याने पिस्तूल असल्याची कबुली देत तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला होता.Suspected man escaped from police custody

Post a Comment

 
Top