0
मुंबई :

'कॉलेज डायरी' या मराठी चित्रपटाचा संगीत अनावरण व जागतिक विक्रम सोहळा नुकताच मुंबईत आयोजित करण्यात आला होता. बॉलिवूडचे पार्श्वगायक बेन्नी दयाल यांच्या हस्ते या चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा पार पडला. यावेळी निर्माते भावेश काशियानी, दिग्दर्शक अनिकेत जगन्नाथ घाडगे, गायक व संगीतकार निरंजन पेडगावकर, रेवा आणि मान्यवर उपस्थित होते.

“कॉलेज डायरी” हा देशातील पहिला चित्रपट असेल ज्यात मराठी, हिंदी, संस्कृत, तमिळ व इंग्लिश या पाच विविध भाषेतील गाणी आहेत. मराठीत चित्रपटात प्रथमच एकाच चित्रपटात विविध भाषेतील गाणी दाखवण्याचा जागतिक विक्रम या चित्रपटाने केला आहे.

यातील गाणी गायक शान, पियुष मिश्रा, बेन्नी दयाल, निरंजन पेडगावकर, शाल्मली खोलगडे, आनंदी जोशी यांनी गायली आहेत. तर निरंजन पेडगावकर यांनी संगीतबद्ध केली आहेत. निर्माते भावेश भवन काशियानी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून अनिकेत जगन्नाथ घाडगे या तरुणाने दिग्दर्शन केले आहे.

कॉलेज डायरी म्हणजे कॉलेजमधील मज्‍जा, मस्ती, घट्ट मैत्री, मैत्रीमधील भांडणे, किस्से हे सर्व या चित्रपटात दाखविण्यात आले आहेत. चित्रपटाची कथा एका कॉलेज कॅम्पसमध्ये घडते. या कॅम्पसवर आधीपासून तिथल्या राजकारणी माणसाचा वरदहस्त आहे, त्यामुळे अवैध प्रकार तिथे सुरू असतात. या वातावरणात काही मुलांवर अन्याय केला जातो. एका क्षणानं0तर झालेल्या या अन्यायाला ती मुले कशी उत्तर देतात व ते करत असताना त्या मुलांच्या आयुष्यात कशा प्रकारे बदल घडतात, ते या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

या चित्रपटात विशाल सांगळे, आनंद बुरड, समीर सकपाळ, वैष्णवी शिंदे, शरद जाधव, प्रतिक्षा शिवणकर, अविनाश खेडेकर, प्रतिक गंधे, हेमलता रघु, जनार्दन कदम हे प्रमुख कलाकार आहेत. चित्रपटाचे कार्यकारी निर्माते सचिन ढोबळे-पाटील आहेत.

Post a comment

 
Top