0
युवक काँग्रेसचे राज्यात अभियान सुरू, किसान शक्ती कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे भरून घेताहेत अर्ज

उस्मानाबाद - मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड राज्यांमध्ये ज्या पद्धतीने काँग्रेसने यश संपादन केले, त्या यशाचा फॉर्म्युला महाराष्ट्रातही वापरून नाराज घटकांना एकत्रित बांधण्याचे काम सुरू झाले आहे. विशेषत: तीन राज्यांमध्ये शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेटून काँग्रेसने सत्तेत आल्यानंतर कर्जमाफीचे लेखी आश्वासन दिले होते, काही तासांतच त्याची पूर्तताही केली. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात युवक काँग्रेसमार्फत प्रत्येक गावात ‘चलो पंचायत अभियान’ राबवण्यात येत आहे. शेतकऱ्यांना भेटून त्यांची नोंदणी केली जात असून, किसान कार्डच्या माध्यमातून कर्जमाफीची शाश्वती दिली जात आहे
लोकसभेच्या निवडणुका काही महिन्यांवर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. भारतीय जनता पक्षाने गावस्तरावर बूथ कमिट्यांवर जोर दिला असून कमिट्यांचे मेळावेही सुरू आहेत. सरकारने केलेल्या कामांची यादी गावापर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपची यंत्रणा जोरदार कामाला लागली आहे, तर भाजपने २०१४ च्या निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता कशी झाली नाही आणि काँग्रेस सत्तेत आल्यानंतर काय करणार, हे सांगण्यासाठी युवक काँग्रेसची टीम गावापर्यंत पोहोचली आहे. राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्तेत आल्यानंतर काँग्रेसने या राज्यांसाठी वापरलेला यशाचा फॉर्म्युला सर्वत्र राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या राज्यांमध्ये काँग्रेसने थेट गावापर्यंत मोहीम राबवून शेतकरी, बेरोजगार तरुणांना काही प्रश्न विचारले होते. तसेच काँग्रेस सत्तेत आल्यानंतर कोणती कामे करणार, लेखी स्वरूपात सांगितले. मात्र हे निवडणुकीच्या काही महिने आधी करण्यात आल्याने काँग्रेसचे धोरण प्रत्येक शेतकरी, बेरोजगार तरुणांपर्यंत पोहोचणे शक्य झाले होते. आता हाच फॉर्म्युला घेऊन युवक काँग्रेस संपूर्ण महाराष्ट्रात उतरली आहे. युवक काँग्रेसने दोन टप्प्यात ही मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला असून, त्याचा पहिला टप्पा १ ते २५ जानेवारी आहे. दुसरा टप्पा २५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी असा अाहे. पहिल्या टप्प्यात झालेल्या कामाचा आढावा २९ व ३० जानेवारीला दिल्लीत घेतला जाणार आहे. युवक काँग्रेसचे पदाधिकारी आपला अहवाल श्रेष्ठींना सादर करतील. त्यासाठी गावापर्यंत युवक काँग्रेसचे कार्यकर्ते पोहोचले असून, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचे प्रभार दाखल झाले आहेत.

काय आहे अभियान : अॅपद्वारे जोडले जाणार शेतकरी

काँग्रेसने निवडणुका झालेल्या राज्यांमध्ये चला पंचायत अभियान राबवले होते. या अभियानाच्या माध्यमातून ‘राज्य आणू काँग्रेसचे, राज्य आणू शेतकऱ्यांचे’, अशी उद्घोषणा केली होती.अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यांजवळ जाऊन युवक कार्यकर्ते किसान शक्ती कार्ड भरून घेत आहेत. या कार्डवरील नंबरवर शेतकऱ्यांच्या मोबाइलवरून मिसकॉल दिल्यानंतर मेसेज येतो. मेसेजवर येणारा कोड किसान कार्डवर नोंदवला जातो. त्याची नोंद युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिलेल्या अॅपवर होते. जेणेकरून कार्यकर्ता किती लोकांपर्यंत पोहोचला, याचा डेटा तयार होतो.


भाजपने दिलेल्या आश्वासनांची रिअॅलिटी चेक करणार

२०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली आहे का, हे विचारण्यासाठी युवक काँग्रेसने प्रश्नावली तयार केली आहे. त्यात भ्रष्टाचार, महागाई, रोजगार, स्मार्ट सिटी, शेतकरी आत्महत्या, महिलांवरील अत्याचार आदी मुद्द्यांचा समावेश असून, या आश्वासनांची पूर्तता झाली किंवा नाही, असे विचारणारी प्रश्नावली भरून घेतली जात आहे.

शेतकऱ्यांना देणार कर्जमाफी, हमीभाव
चलो पंचायत अभियानच्या माध्यमातून काँग्रेसने ‘शेतकऱ्यांचे राज्य आणू’, असा नारा दिला आहे. भरून घेतलेल्या कार्डवर मध्यात, अल्प, कोरडवाहू शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, खते, बियाणे, शेती अवजारांच्या किमतीवर नियंत्रण, हवामान खात्याचे आधुनिकीकरण आणि कृषिपूरक उद्योगांना चालना देण्याचे तसेच बेरोजगारांसाठीही मासिक भत्ता, रोजगार केंद्र, वसतिगृह, शैक्षणिक कर्जाचे आश्वासन दिले जात आहे.

सरकारवरील नाराजी उघड
तीन राज्यांतील यशानंतर पक्षाने गावागावापर्यंत पोहोचून शेतकऱ्यांसह बेरोजगार युवकांना आश्वासक बदलाचा आणि देशातील परिवर्तनाचा विश्वास दिला जात आहे. प्रत्येक गावापर्यंत युवक काँग्रेसची यंत्रणा कामाला लागली आहे. यातून शेतकऱ्यांची आणि बेरोजगारांची नाराजी स्पष्ट दिसत आहे.'
राेहित पडवळ, उपाध्यक्ष, जिल्हा युवक काँग्रेस.

५ कोटी लोकांपर्यंत पोहोचणार
संपर्क अभियानामुळे तीन राज्यांत मोठा फायदा झाला. त्याच धर्तीवर चलो पंचायत अभियान राबवत आहोत. या माध्यमातून आम्ही २५ हजार गावे, ५०० छोट्या शहरांसह २० मोठ्या शहरांतून १३ पैकी ५ कोटी लोकांपर्यंत पोहोचणार आहोत.

Congress use other states election formula in Maharashtra

.

Post a Comment

 
Top