0
पाटण : 

पाटण येथील शस्त्र परवानाधारक विक्रेते प्रकाश शंकर यादव यांनी आपल्याकडे असणारी शस्त्रे ही अधिकृत परवाना दुकानात न ठेवता ती बेकायदेशीररित्या स्वतःच्या घरात ठेवून कायद्याचे उल्लंघन केले. याप्रकरणी पाटणचे उपविभागीय पोलिस अधिकारी अंगद जाधवर यांच्यासह पाटण पोलिसांनी छापा टाकून प्रकाश यादव यांना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळील सिंगल व डबल बारच्या ५५ बंदुका जप्त केल्या.
 
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी प्रकाश शंकर यादव यांचेकडे अग्निशमन व गोळीबार साहित्य शस्त्रे विक्री व दुरूस्ती परवाना आहे. तसेच परवाना असणारे गोदामही आहे. परंतू ते हे सर्व साहित्य अधिकृत ठिकाणी न ठेवता बेकायदेशीररित्या आपल्या रहात्या घरी ठेवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार गुरूवारी दुपारी पोलिस उपविभागीय अधिकारी यांनी आपल्या पथकासह मोरेगल्ली पाटण येथील प्रकाश यादव यांच्या घरी अचानक छापा टाकला.

या छाप्यात त्यांना यादव यांनी ही शस्त्रास्त्रे बेकायदेशीररित्या घरात ठेवल्याचे सापडले. त्यानंतर पोलिसांनी ही सिंगल व डबल बारची तब्बल ५५ शस्त्रे जप्त केली. व प्रकाश यादव यांनाही ताब्यात घेऊन त्यांना अटक करण्याची कारवाई केली. या प्रकरणी शस्त्र कायदा कलमान्वये यादव यांचेविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रसंगी पोलिस उप विभागीय अधिकारी अंगद जाधवर, स. पो. नि. उत्तमराव भापकर, सहाय्यक पोलिस फौजदार पी. एन. पगडे, भरते, पी. सी. बगले यांच्या पथकाने ही कारवाई केली. अधिक तपास अंगद जाधवर करीत आहेत.



Post a Comment

 
Top