0
मुंबई- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिल्याने अहमदनगरमध्ये आम्ही भाजपसोबत युती न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्यांना प्रस्ताव पाठवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आमचा महापौर व्हावा म्हणून राष्ट्रवादीचे अजित पवार आणि काँग्रेसचे विखे पाटील यांच्याशी चर्चा केली होती, अशी माहिती रामदास कदम यांनी मंगळवारी मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना दिली. तसेच आम्ही सत्तेतून बाहेर पडण्याची राष्ट्रवादी वाट पाहत असून त्यांना आमची जागा घ्यायची आहे, अशी टीकाही त्यांनी केली. तर रामदास कदम यांच्या या खुलाशामुळे शिवसेनेचा खरा चेहरा समोर आल्याची प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिव्य मराठीशी बोलताना दिली. कदम यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी, शिवसेनेने अगोदर भाजपबरोबर संसार नीट चालतो का ते पाहावे आणि नंतर आमच्याबाबतची चर्चा करावी, असे प्रत्युत्तर दिले.

अहमदनगरमध्ये संख्याबळ शिवसेनेपेक्षा कमी असतानाही भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस, अपक्ष आणि बसपच्या पाठिंब्यावर महापौर आणि उपमहापौर बसवला. यामुळे शिवसेनेला चांगलाच धक्का बसला आहे. भाजपच्या या खेळीबाबत रामदास कदम यांना विचारले असता त्यांनी सांगितले, काँग्रेस, राष्ट्रवादीशी पाठिंब्याबाबत चर्चा सुरू असतानाही राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिला. यावरून राष्ट्रवादीचे खायचे दात आणि दाखवायचे दात कसे वेगळे आहेत ते दिसून आले. शिवसेना कधी एकदा सत्तेतून बाहेर पडते आणि आम्ही सत्तेत बसतो याची घाई राष्ट्रवादीला झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीआधीच राष्ट्रवादी आणि काँग्रेसने भाजपला पाठिंबा दिला आहे, असा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, आता यानंतर भाजप आणि शिवसेनेत पुन्हा वाद होण्याची शक्यता निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे.

भाजप पाठिंब्यास तयार होते : गिरीश महाजन
रामदास कदम यांच्या वक्तव्याबाबत गिरीश महाजन यांना विचारले असता त्यांनी सांगितले, आम्ही शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा द्यायला तयार होतो. तसा आम्ही निर्णयही घेतला होता. मात्र, त्यांनी प्रस्तावच पाठवला नाही. त्यानंतर आम्ही महापौरपदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि अन्य पक्षांनी पाठिंबा दिला. आम्ही पाठिंबा द्यायला तयार असतानाही शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संपर्कात होती यावरून शिवसेनेचा खरा चेहरा समोर आला आहे, असेही त्यांनी म्हटले.

दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही रामदास कदम यांच्यावर टीका केली. नवाब मलिक म्हणाले, रामदास कदम यांनी आधी भाजपसोबतचा संसार नीट चालतो का ते बघावे आणि मग राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करावी. शिवसेनेचा भाजपसोबतचा मांडलेला संसार धड चालत नाही. अहमदनगरमध्ये ज्यांनी पक्षाचा आदेश पाळला नाही त्यांच्यावर कारवाई केली जाईलच. मात्र, आधी शिवसेनेचा भाजपसोबतचा संसार नीट कसा चालेल की घटस्फोट होणार, याचेही उत्तर जनतेला हवे आहे, असेही नवाब मलिक म्हणाले.
Shiv Sena Leader Ramdas Kadam Comment on Ahemadnagar Municipal Election

Post a Comment

 
Top