0
घटना घडल्याची माहिती देण्याचेही शाळेतील शिक्षकांनी दाखवले नाही सौजन्य, मुख्याध्यापकासह स्टाफविरुद्ध गुन्हा दाखल

अमरावती : आष्टी येथील मणीबाई छगनलाल देसाई विद्यालयाच्या परिसरातील जीर्ण भिंत कोसळून आठवीतील विद्यार्थी वैभव हरिदास गावंडे (वय १३, रा. देवरी) या मृत्यू झाला. या घटनेत सार्थक सतीश गावंडे (वय १३ रा. देवरी), प्रतिक विलास पायताळे (वय १३) रा. आष्टी व आदित्य महादेव बुध (वय १३ रा. अनकवाडी) हे विद्यार्थी गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवारी (दि. १८) दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास घडली. घटनेनंतर शिक्षक व व्यवस्थापनाच्या विरोधात गावकऱ्यांमध्ये कमालीचा संताप निर्माण झाल्याने तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे सुमारे चार तास वैभवचे पार्थिव घटनास्थळावरच पडून होते. दरम्यान, संस्थेचे संचालक आमदार बच्चू कडू यांच्या आश्वासनानंतर तणाव काहीसा निवळला होता.


वैभव व इतर तिघेही जखमी याच शाळेत आठव्या वर्गात शिकतात. शुक्रवारी नेहमीप्रमाणे सकाळी साडेअकरा वाजता शाळा सुरू झाली. शाळेच्या आवारातच एक जीर्ण झालेली वास्तू आहे. ही वास्तू मागील अनेक वर्षांपासून धुळखात पडून आहे. या ठिकाणी शाळेतील विद्यार्थी लघुशंकेसाठी जायचे. दरम्यान, शुक्रवारी दुपारी वैभव व इतर तिघे त्या ठिकाणी गेले आणि धोकादायक स्थितीत उभी असलेल्या भितींचा काही भाग थेट विद्यार्थ्यांच्या अंगावर कोसळला. यामध्ये वैभवच्या डोक्याला जबर मार बसल्यामुळे त्याचा घटनास्थळीच मृृत्यू झाला तर उर्वरित तिघांना जबर मार लागला.


ही माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली आणि गावकऱ्यांनीच जखमी विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. याचवेळी मात्र घडलेल्या घटनेची माहिती शाळेतील मुख्याध्यापक किंवा इतर शिक्षकांनी पालकांना दिली नसल्याचा पालकांचा आरोप होता. या धक्कादायक घटनेनंतर स्थानिक आष्टी, देवरी आणि अनकवाडी या तिन्ही गावातील शेकडो पालक आणि हजारो ग्रामस्थ शाळेत दाखल झालेत. त्यांनी प्रचंड रोष व्यक्त करून मृतक विद्यार्थ्यांच्या कुटूंबातील सदस्याला संस्थेत नोकरी तसेच २० लाख रुपये रोख आणि जखमी विद्यार्थ्यांचा उपचाराचा खर्च शाळा व्यवस्थापनाने करण्याची मागणी लावून धरली. तसेच संस्थेच्या संचालक मंडळाचे सदस्य आमदार बच्चू कडू घटनास्थळी आल्याशिवाय मृतदेह उचलणार नाही किंवा उचलू देणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला.


दरम्यान, प्रभारी पोलिस आयुक्त यशवंत सोळंके आणि आयुक्तालयातील मोठ्या प्रमाणात पोलिसांची कुमक आष्टीत दाखल झाली होती. यावेळी मृत व जखमी विद्यार्थ्यांच्या नातेवाईक व कुटूंबियांच्या आक्रोशाने संपूर्ण परिसर गहिवरला होता. त्यांचा मन हेलावून सोडणारा आक्रोश पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले होते. दरम्यान, दुपारी अडीच वाजताच्या सुमारास आमदार कडू शाळेत पोहचले. यावेळी संतप्त गावकरी आणि पालकांच्या रोषाचा त्यांना सामना करावा लागला. हजारो आक्रमक गावकऱ्यांसोबत त्यांनी चर्चा केली व पालक, ग्रामस्थांच्या मागण्या मंजूर करण्याबाबत होकार दर्शवला. त्यावेळी सायंकाळी साडेचार वाजता वैभवचा मृतदेह उचलण्यात आला.


दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. तसेच माध्यमिक शिक्षणाधिकारी निलिमा टाके सुद्धा घटनास्थळी पोहोचल्या होत्या. या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


सहा वर्षांपूर्वी बदलले शाळेचे संचालक मंडळ : 
सुमारे ३२ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या शाळेचे संचालक मंडळ २०११ -१२ मध्ये बदलले आहे. इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण या शाळेत दिले जाते. २०११ - १२ पासून शाळेच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष 'प्रहार'चे पदाधिकारी छोटू महाराज वसू आहेत तसेच संचालक मंडळात सदस्य म्हणून आमदार बच्चू कडू आहेत. त्यामुळेच पालक आणि ग्रामस्थांनी आमदार बच्चू कडू यांच्यासोबत चर्चा केल्याशिवाय मृतदेह हलवणार नसल्याची भूमिका घेतली होती. दरम्यान, संतप्त ग्रामस्थ आणि संचालक मंडळांमध्ये चर्चा केली, त्यावेळी २० लाख रुपयांची आर्थिक मदत तसेच वैभवच्या वडिलांना संस्थेत नोकरी देण्याचे मान्य केल्यानंतर शवविच्छेदन सुरू झाले.

मुख्याध्यापकासह स्टाफविरुद्ध गुन्हा दाखल 
मृतक विद्यार्थ्याच्या नातेवाईकाने दिलेल्या तक्रारीवरून मणीबाई छगनलाल देसाई विद्यालयाच्या मुख्याध्यापकासह स्टाफविरुद्ध निष्काळजीपणा व हयगय केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच मुख्याध्यापकासह काही शिक्षकांना आम्ही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहेत. या प्रकरणाचा तपास आम्ही करत आहोत. यशवंत सोळंके, प्रभारी पोलिस आयुक्त. अमरावती.


वर्ग सुरू होता, विद्यार्थी लघुशंकेसाठी आले होते बाहेर 
नियमितपणे वर्ग सुरू होता. जाधव नामक शिक्षक आठवीतील विद्यार्थ्यांना शिकवत होते. त्याचवेळी वैभव व इतर तीन विद्यार्थ्यांनी तासिका संपण्यापूर्वीच शिक्षकाला लघुशंकेसाठी सुटी मागितली व ते वर्ग संपण्यापूर्वी बाहेर आले. त्या भितींजवळ लघवीला गेले आणि भिंतीचा काही भाग कोसळला. त्यामध्ये दबून एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू तर तिघे जखमी झाले आहे. मागील काही वर्षांपूर्वी या ठिकाणी गोठा होता, त्या गोठ्याची ही जीर्ण झालेली भिंत होती. प्रदीप अंधुरे, मुख्याध्यापक, मणीबाई छगनलाल देसाई, विद्यालय, आष्टी.


मैदानात स्वच्छतेचे काम 
वैभवसह काही विद्यार्थ्यांना शाळेतील एका शिक्षकाने शाळेच्या मैदानाची साफसफाई करण्याचे काम सांगितले होते. त्यामुळे हे विद्यार्थी साफसफाई करून कचरा या जीर्ण भितींजवळ नेऊन टाकत होते, त्याचदरम्यान भितींचा काही भाग कोसळून ही दुर्देवी घटना घडल्याचा आरोप शाळेतील काही विद्यार्थीनी, विद्यार्थी आणि संतप्त पालक करत होते.


मागण्या मंजूर केल्या 
घडलेली घटना अंत्यत वाईट आहे. दरम्यान पालक व ग्रामस्थांनी मृत विद्यार्थ्याच्या कुटूंबियांना आर्थिक मदत व मृत विद्यार्थ्याच्या वडिलांना नोकरीची मागणी केली होती. या मागण्या आम्ही मंजूर करत तातडीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. school wall collapse in Ashti 1 student died 3 injured

Post a Comment

 
Top