0
कराड :

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी लातूरमध्ये आपली भूमिका स्पष्ट करत आपण कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार  असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुढील वर्षी होणार्‍या विधानसभा निवडणुकीत कराडात 2014 चीच पुनरावृत्ती होणार, हे जवळपास स्पष्ट झाले आहे.


कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा स्वातंत्र्यापासून काँग्रेसचा बालेकिल्ला असून आजवर स्व. यशवंतराव मोहिते, माजी मंत्री विलासराव पाटील - उंडाळकर आणि माजी मुख्यमंत्री विद्यमान आ. पृथ्वीराज चव्हाण या तिघा काँग्रेस उमेदवारांनाच प्रतिनिधीत्व करण्याची संधी कराड दक्षिणच्या जनतेने दिली आहे.

2010 मध्ये अनपेक्षितपणे आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर मुख्यमंत्री पदाची धुरा सोपवण्यात आली होती. त्यानंतरच्या चार वर्षात आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यासह कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात जम बसवला. त्याचवेळी तत्कालीन राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते डॉ. अतुल भोसले यांच्याकडेही काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळेच 2014 मध्ये डॉ. अतुल भोसले, माजी मंत्री उंडाळकर यांच्यासह तत्कालीन मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण या तिघांपैकी काँग्रेसचा अधिकृत उमेदवार म्हणून कोण निवडणूक रिंगणात असणार ? याबाबत उत्सुकता होती.

निवडणुकीपूर्वी दोन ते तीन महिने अगोदर डॉ. अतुल भोसले यांनी भाजपाचा तर माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर यांनी बंडखोरीचा मार्ग स्विकारत काँग्रेसचे उमेदवार आ. पृथ्वीराज चव्हाण यांना आव्हान दिले. निवडणुकीत मोठी चुरस असल्याने संपूर्ण राज्याचे या तिहेरी लढतीकडे लक्ष लागून राहिले होते. मात्र आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी बाजी मारली होती.

त्यानंतर आता गेल्या काही दिवसांपासून आ. चव्हाण हे पुन्हा दिल्लीच्या राजकारणात सक्रीय होतील आणि कदाचित पुणे लोकसभा मतदारसंघातूनही ते निवडणूक लढवतील, अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र स्वत: आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी लातूरमध्ये जनसंघर्ष यात्रेवेळी आपण कराड दक्षिणमधून निवडणूक लढवणार असून अन्य सर्व प्रकारच्या चर्चा निराधार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळेच सध्यस्थिती पाहता आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात भाजपाचे डॉ. अतुल भोसले, रयत संघटनेचे नेते अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांच्यातच तिरंगी लढत होणार, हे जवळपास स्पष्ट झाले आहे.

आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यापुढे कडवे आव्हान

2014 मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांना 37.96, विलासराव पाटील - उंडाळकर यांना 29.85 तर डॉ. अतुल भोसले यांना 28. 96 टक्के मते मिळाली होती. यावेळी अन्य 9 उमेदवारही रिंगणात होते. मात्र या सर्वांना शिवसेना उमेदवाराचा अपवाद वगळता 1 हजार मतांचा टप्पाही गाठता आला नव्हता. 2014 च्या तुलनेत सध्यस्थितीत कराड दक्षिणमध्ये राजकारणात अनेक उलथापालथी झाल्या असून ना. डॉ. अतुल भोसले यांनी मोठे आव्हान उभे केले आहे. काँग्रेसतंर्गत मतभेद कायम असून आ. पृथ्वीराज चव्हाण यांना वर्चस्व कायम ठेवण्यासाठी कडव्या आव्हानाचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत.

Post a comment

 
Top