0
पोलिस आयुक्तांसाठी पाच खोल्यांचा सुसज्ज बंगला आहे

औरंगाबाद- पोलिसांसाठी खुशखबर ! मिल कॉर्नर परिसरात दोन वर्षांपासून सुरू असलेल्या नव्या पोलिस वसाहतीचे काम पूर्णत्वाकडे असून फेब्रुवारी महिन्यात कर्मचाऱ्यांना ताबा मिळण्याची शक्यता आहे. एक एकर जागेवर उभ्या या वसाहतीमध्ये सुसज्ज, संपूर्ण अद्ययावत रचना असलेले फ्लॅट्स आणि रोहाऊस, बंगले तयार करण्यात आले आहेत. एकूण ११ इमारतींची ही वसाहत असून प्रत्येक इमारत सातमजली आहे. याशिवाय वरिष्ठ अधिकारी आणि पोलिस आयुक्तांसाठी बंगलेही याच परिसरात आहेत. विशेष म्हणजे, सेवाज्येष्ठतेनुसार ही घरे कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहेत.


तत्कालीन पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्या कार्यकाळात या निवासस्थानांसाठी प्रयत्न करण्यात आले होते. त्यानंतर विद्यमान पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी याचा सातत्याने पाठपुरावा करून कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर घरे मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले. जुन्या पोलिस निवासस्थानात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना डिसेंबर २०१६ मध्ये जुन्या घरांचा ताबा सोडण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर फेब्रुवारी २०१७ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन झाल्यानंतर या वसाहतीचे बांधकाम सुरू झाले होते. सध्या शहर पोलिस दलात साडेतीन हजार पोलिस कर्मचारी, अधिकारी आहेत. त्या तुलनेत मात्र पोलिस शासकीय निवासस्थान कमी होते. त्यामुळे महाराष्ट्र पोलिस गृहनिर्माण तथा कल्याण महामंडळ यांच्या माध्यमातून औरंगाबाद शहर पोलिसांच्या निवासस्थानासाठी निधी मंजूर करण्यात आला. दोन वर्षांनंतर ही अालिशान इमारत पूर्णत्वास आली अाहे. सातमजली इमारतींचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. याशिवाय क्रांती चौक पोलिस ठाण्याच्या परिसरात असलेल्या जुन्या पोलिस वसाहती पाडून आणखी एक नवी वसाहत निर्माण करण्याचे नियोजित आहे.


आधी कर्मचाऱ्यांना ताबा : कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या सातमजली ११ इमारतींचे काम पूर्णत्वास आले असून स्वयंपाकघरातील कडप्प्यांचे व फर्निचरचे काम बाकी आहे. इमारतींना बाहेरून पिवळा व पांढरा रंग दिला आहे. पोलिस आयुक्तांच्या बंगल्याचे काम पूर्ण झाले आहे. आतून इलेक्ट्रिक साहित्य बसवून रंगरंगोटी, कंपाउंडमध्ये िहरवळ, झाडे लावली आहेत. कर्मचाऱ्यांच्या घराचे काम पूर्ण झाल्यानंतरच पोलिस आयुक्त नव्या बंगल्यात प्रवेश करणार आहेत.


नवे घर मिळत असतानाही जुन्या घरातच राहिले पोलिस आयुक्त

आयुक्तांसाठीचे नवे निवासस्थान सध्याच्या जुन्या बंगल्यामागेच उभारण्यात आले आहे. चिरंजीव प्रसाद यांनी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला तेव्हा बाजूला बांधकाम सुरू असल्याने त्यांच्यासाठी दुसऱ्या निवासस्थानाचा शोध घेण्यात येणार होता. त्यापूर्वीच्या आयुक्तांनीदेखील बाहेरचेच निवासस्थान राहण्यासाठी निवडले होते. परंतु प्रसाद यांनी मात्र जुन्या निवासस्थानातच वास्तव्य करणे पसंत केले.


डिजीलोन धारक पात्र नाहीत

पोलिस महासंचालक योजनेतील गृह कर्ज घेतलेल्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना या नवीन गृह प्रकल्पात संधी मिळणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. नुकतेच काही पोलिस कुटुंबांनी यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मागणीदेखील केली होती. तसेच सेवाज्येष्ठतेनुसार घरांचा ताबा देण्यात येणार असल्याने यात कुठलाही गैरप्रकार होणार नसल्याचा दावा करण्यात येत आहे आयुक्तालय परिसरात उभारल्या ७ मजल्यांच्या ११ इमारती; कर्मचाऱ्यांच्या सेवाज्येष्ठतेनुसार लागणार क्रमांक.


असे आहे स्वरूप 
चार रूम (२ बीएचके) मास्टर बेडरूमसह कर्मचाऱ्यांचे निवासस्थान, तर अधिकाऱ्यांसाठी २.५ बीएचके फ्लॅट्स बांधण्यात आले आहेत.


५०४ फ्लॅट्स पोलिस कर्मचारी, २८ फ्लॅट्स पोलिस निरीक्षक ते पोलिस उपनिरीक्षक यांच्यासाठी राहणार आहेत.


स्वयंपाकघरात कडप्प्याचे कपाट बांधण्यात आले असून एका बेडरूममध्ये लाकडी कपाटदेखील पुरवण्यात येणार आहे.


प्रत्येक इमारत सातमजली राहणार असून अशा ११ इमारती आहेत. प्रत्येक इमारतीला पॉवर बॅकअप लिफ्ट आहे.


तीन बेडरूम, हॉल, किचन अशी रचना असलेले चार बंगले सहायक पोलिस आयुक्तांसाठी असतील.


तीन बेडरूम, हॉल व किचन व कंपाउंड असे स्वतंत्र तीन बंगले तीन पोलिस उपायुक्तांसाठी आहेत.


पोलिस आयुक्तांसाठी पाच खोल्यांचा सुसज्ज बंगला आहे. 
एक एकरात पोलिस आयुक्तालयासह कर्मचारी वसाहत उभी राहिली आहे 
१४० कोटी रुपयांचा निधी : १४० कोटींचा निधी यासाठी मंजूर होता. नाशिक येथील प्रकाश कॉन्स्ट्रोवेल लिमिटेड या कंपनीला वसाहत निर्माणाचे कंत्राट दिले होते. ८ फेब्रुवारी २०१९ ही या प्रकल्पाची पूर्णत्वाची अंतिम मुदत आहे. या तारखेपर्यंत कर्मचारी निवासस्थानाचे काम पूर्ण होईल, परंतु काही अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाच्या कामासह संपूर्ण वसाहतीचे काम फेब्रुवारीअखेरपर्यंत होईल, असे अभियंत्यांनी सांगितले.


प्रत्येकाला घर 
खासगी घरांप्रमाणेच आता आमच्याही कर्मचाऱ्यांना सुसज्ज व नव्या पद्धतीची घरे मिळणार आहेत. काम पूर्णत्वास आले असून लवकरच त्यांना ताबा देण्यात येईल. शहरातील प्रत्येक पोलिस कर्मचाऱ्याला अशा प्रकारचे घरे मिळवून देण्यासाठी पोलिस विभाग प्रयत्नशील आहे.New Homes For Police Officials

Post a Comment

 
Top