0
पुणे ः

कायदेशीर अडचणीमुळे छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार (संग्रहालयामधील जगदंबा स्वार्ड) भारत सरकाला परत देता येणार नाही, असे सांगणार्‍या लंडन येथील अल्बर्ट संग्रहालयाने आता ही तलवार आमच्याकडे नाहीच, असा पवित्रा घेतला आहे. तसे पत्र संग्रहालयाने पाठविले आहे, अशी माहिती इतिहास संशोधक प्रा. नामदेव जाधव यांनी ‘पुढारी’शी बोलताना दिली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवनीतीवर भारताचा कारभार चालावा व राजा म्हणून गादीवर छत्रपतींची भवानी तलवार असावी, यापुढे कोणीही कोणाला भेटवस्तू देणार नाही, अथवा घेणार नाही; असा तह 1863 दरम्यान तत्कालीन मराठा साम्राज्याचे प्रमुख व इंग्रज अधिकार्‍यांमध्ये झाला होता. यावर सागरी मार्गाने व्यापार चालविणार्‍या अनेक देशांच्या स्वाक्षर्‍या आहेत. यानंतर म्हणजे 1875 साली इंग्लंडचे राजकुमार प्रिंस ऑफ वेल्स (7 वे) आले असताना कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी शस्त्रागारातील तलवारी नजर केल्या होत्या. यामध्ये भवानी तलवारीचाही समावेश होता. लंडन येथील अल्बर्ट संग्रहालयमध्ये तिचे जतन करण्यात आले होते. दरम्यान, ही तलवार परत मिळावी, अशी मागणी भारताने ब्रिटिश सरकारकडे केली होती. मात्र, कायदेशीर बाबी पुढे करीत ती देण्यास टाळाटाळ करण्यात आली. ब्रिटिश सरकार व अल्बर्ट संग्रहालय या दोन्ही वेगळ्या संस्था आहेत, असाही युक्तीवाद करण्यात आला. 

याबाबत इतिहास संशोधक नामदेव जाधव यांनी संग्रहालयाकडे पाठपुरावा केल्यावर त्यांना ई-मेलच्या माध्यमातून उत्तर आले आहे.भवानी तलवार ही परदेशी बनावटीची असून, ती स्पेनची राजधानी माद्रिदपासून 72 कि. मी. अंतरावर असलेल्या टोलॅडो येथे बनली आहे. केवळ 1200 ग्रॅम वजनाची ही तलवार अतिशय परिणामकारक व लढवय्यास हाताळणे सोपी जावी, अशा खुबीने तयार करण्यात आली आहे. पोलादातील कमानी धातूपासून बनविलेले या तलवारीचे पाते अतिशय लवचिक असून, त्यास शेकडो वर्षे गंज लागत नाही, अशी माहिती नामदेव जाधव यांनी दिली. 

1980 मध्ये राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री बॅ. अंतुले यांनीही भवानी तलवार परत आणण्यासाठी लंडन गाठले होते. पण, कायदेशीर मुद्यात पकडून ब्रिटिश सरकारने ही तलवार परत देण्याची मागणी फेटाळून लावली. त्या वेळी बॅ. अंतुले यांनी केवळ या तलवारीचे चित्र आणले होते. यावरून आजही केवळ घोषणाच दिल्या जात आहेत. परंतु, ही तलवार परत आणण्यासाठी संसदेत ठराव करून, इतिहासातील तहाचे दाखले व भारत सरकारकडे असलेल्या तत्कालीन कागदपत्रांच्या आधारे संसदेत ठराव संमत करूनच पुढील कार्यवाही झाली तर या मागणीस यश येईल, असे जाधव यांचे मत आहे. तसेच लंडन येथे असलेली ही भवानी तलवार लागलीच मिळविणे कठीण असल्याने या तलवारीची जशीच्या तशी प्रतिकृती जाधव यांनी तयार केली आहे. 

Post a Comment

 
Top