0
सीबीआयचे खंडपीठात पत्र, आरोपीला जामीन

औरंगाबाद- अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणात शस्त्र बाळगल्यासंबंधी अटकेत असलेला आरोपी रोहित रेगे याचे दोषारोपपत्रात नाव नसल्याचे पत्र सीबीआयने सरकारी वकिलामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात बुधवारी सादर केले. त्यानंतर न्या. मंगेश पाटील यांच्या खंडपीठाने आरोपीचा ५० हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर व महिन्याच्या पहिल्या सोमवारी संबंधित पोलिस ठाण्यात हजेरी लावण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला, अशी माहिती अ‍ॅड. नीलेश घाणेकर यांनी दिली.

या प्रकरणी सीबीआयचे उपअधीक्षक (बेलापूर, नवी मुंबई) मारुती शंकर पाटील यांनी २२ ऑगस्ट २०१८ रोजी तक्रार दिली होती. तक्रारीत, डॉ दाभोलकर हत्या प्रकरणात सीबीआयने प्रथम सचिन अणदुरे याला अटक केली होती. त्याने दिलेल्या माहितीनुसार, अणदुरे याने लपवण्यासाठी दिलेली शस्त्रे ही शुभम व अजिंक्य सुरळे यांच्याकडे असल्याचे सांगितले. त्यानुसार सीबीआयने सुरळे बंधूंना अटक केली असता त्यांनी ही शस्त्रे आरोपी रोहित राजेश रेगे (२०, रा. धावणी मोहल्ला, औरंगाबाद) याच्या ताब्यात दिल्याचे सांगितले.

औरंगाबादच्या घरातून जप्त केली होती शस्त्रास्त्रे
त्यानुसार २२ ऑगस्ट २०१८ रोजी सीबीआयने रोहितच्या घरी छापा मारत त्याच्या घराच्या गच्चीवरील एका पोत्यातून तलवार, पिस्तूल, तीन काडतुसे, एअरगन व दोन मोबाइल असा ऐवज जप्त केला. सीबीआयने तिघा आरोपींना ताब्यात घेत, त्यांच्याविरोधात औरंगाबाद येथील सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, आरोपी रोहित रेगे याला २२ ते २७ ऑगस्ट २०१८ पर्यंत पोलिस कोठडी दिल्यानंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास अजूनही सुरूच असून यात आणखी धागेदारे मिळण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले.


हत्येवेळी आरोपी रेगे होता १५ वर्षांचा : बचाव पक्ष

सुनावणीदरम्यान, अॅड.घाणेकर यांनी दाभोलकर हत्याप्रकरणाशी रोहित रेगेचा संबंध नाही. रेगेविरोधात प्रकरणाशी संबंध असल्याचे पुरावे मिळाले नाहीत. २०१३ मध्ये डाॅ. दाभोलकर यांची हत्या झाली, त्या वेळी रोहित रेगे पंधरा वर्षांचा होता, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तर सरकारी वकिलांनी आरोपीचा प्रकरणाशी संबंध आहे किंवा नाही, याची माहिती घेण्यासाठी वेळ मागून घेतला होता. दरम्यान, ३१ डिसेंबर २०१८ रोजी सीबीआयने पत्र पाठवून आरोपी रोहित रेगेचा डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी संबंध नसल्याचे सांगितले. या पत्राआधारे खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिले, अशी माहिती अड. घाणेकर यांनी दिली. आरोपी रेगेतर्फे अॅड. घाणेकर व वर्षा घाणेकर (वाघचौरे) यांनी काम पाहिले. त्यांना कुलदीप कहाळकर, धनराज हिंगोले यांनी सहकार्य केले.Dr. Rohit Rege is not involved in the murder of Narendra Dabholkar: CBI

Post a Comment

 
Top