0
कराड :

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या मलकापूर (ता. कराड) नगरपरिषदेसाठी किरकोळ अपवाद वगळता शांततेत 82.36 टक्के मतदान झाले. माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण आणि विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष ना. डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस व भाजप या निवडणुकीत आमने-सामने आहे. त्यामुळेच आजवर काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणार्‍या मलकापूर नगरपरिषदेत कोण बाजी मारणार? हे सोमवारी स्पष्ट होणार आहे.


मलकापूर नगरपंचायतीचे नगरपरिषदेत रूपांतर झाल्यानंतर रविवारी नगरपरिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदान झाले. माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांचे समर्थक मनोहर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस, ना. डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजप यांच्यात या निवडणुकीत सरळ लढत होत आहे; तर प्रभाग पाच, सात आणि आठमध्ये सात उमेदवारांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आहे. याशिवाय भाजपने शिवसेनेसोबत युती केली आहे. मनसेचेही पदाधिकारी भाजपसोबत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसतंर्गत पारंपारिक प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जाणारे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण आणि माजी मंत्री विलासराव पाटील - उंडाळकर गट प्रथमच एकत्र आले आहेत.

मात्र असे असले तरी उंडाळकर समर्थक म्हणून ओळखले जाणारे तीन समर्थक भाजपाच्या गोटात दाखल झाले आहेत. त्यामुळेच निवडणूक निकालाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. नऊ प्रभागातील 29 मतदान केंद्रावर 18 हजार 630 मतदारांचा समावेश होता. त्यापैकी 15 हजार 343 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यात 8 हजार 120 पुरूष तर 7 हजार 223 महिला मतदारांचा समावेश आहे. प्रभाग दोनमधील तिन्ही मतदान केंद्रावर 84 टक्क्याहून अधिक मतदान झाले आहे. तर माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे रिंगणात असलेल्या प्रभाग 9 मध्ये पाचही मतदान केंद्रावर 82 टक्क्याहून अधिक मतदान झाले असून  एका मतदान केंद्रावर 86.15 टक्के मतदान झाले आहे.

एकावेळी पाच प्रभागांचे निकाल...

कराडमधील यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय केंद्रावर सोमवारी सकाळी 10 वाजता मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. पाच टेबलवर मतमोजणी होणार असून पाच प्रभागांचे निकाल पहिल्या टप्प्यात जाहीर होणार आहेत. तर दुसर्‍या टप्प्यात चार प्रभागांचे निकाल जाहीर होणार असून दुपारी 12 वाजेपर्यंत सर्व निकाल स्पष्ट होणार आहेत.

Post a comment

 
Top