0
कोल्हापूर :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘परीक्षा पे चर्चा-2’ या कार्यक्रमाचे प्रक्षेपण सर्व शाळेत दाखविण्यात यावे, अशा सूचना असतानादेखील शहरातील काही शाळांमध्ये कार्यक्रमाचे प्रक्षेपण दाखविण्यात आले नाही. पाचवी ते दहावीच्या चाचणी व पूर्वपरीक्षा सुरू आहेत. शिक्षण विभागाकडून कोणत्याही प्रकारचे परिपत्रक आले नसल्याची माहिती शाळांनी दिली.


 ‘परीक्षा पे चर्चा-2’ हा कार्यक्रम दूरचित्रवाणी वाहिन्यांसह फेसबुक लाईव्हद्वारे मंगळवारी (दि. 29) सकाळी 11 ते 1 या वेळेत प्रसारित करण्यात आला. सहावीच्या पुढील विद्यार्थ्यांना कार्यक्रम दाखवण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. दुर्गम ठिकाणी ऑल इंडिया रेडिओवरून होणारे प्रसारण विद्यार्थ्यांना ऐकवावे.

कार्यक्रमाच्या दिवशी वीज जाण्याची शक्यता असल्यास जनरेटरची व्यवस्था करावी, अशा सूचना शिक्षण विभागाकडून शाळांना देण्यात आल्या
होत्या.
 शहरातील काही शाळांमध्ये भेट दिली असता शाळेत कोणतीही प्रेक्षपणाची तयारी नव्हती. कोल्हापूर जिल्हा शाळा मुख्याध्यापक संघ व संस्थाचालक संघाच्या वतीने पाचवी ते नववी दुसरी घटक चाचणी परीक्षा व दहावीच्या विद्यार्थ्यांची पूर्वपरीक्षा सुरू होती. शाळा प्रशासनाकडे याबाबत विचारणा केली असता आम्हाला शिक्षण विभागाकडून परिपत्रक किंवा व्हॉटस् अपवर माहिती मिळाली नाही. त्यामुळे कार्यक्रम दाखवू शकलो नाही. यादिवशी असणारा पेपर पुढे ढकलण्यास हवा होता, असेही शाळा प्रशासनाने सांगितले. परंतु, ग्रामीण भागातील बहुतांश शाळांमध्ये पंतप्रधान मोदी यांचा कार्यक्रम दाखविण्यात आला. त्याचे व्हिडीओ शाळांनी शिक्षण विभागास पाठविले आहेत.

कार्यक्रमाचा जिल्ह्याचा अहवाल दुपारी दोन वाजेपर्यंतhttp://www.research.net/r/RMMNMDG या लिंकवर भरण्यात यावा. जिल्हास्तर अहवालाचे एकत्रिकरण करून राज्याचा अहवाल पंतप्रधान कार्यालयास दुपारी तीन वाजेपर्यंत सादर करण्याचे निर्देश होते. मात्र, ज्या शाळांनी कार्यक्रमाचे प्रेक्षपण दाखविले नाही, त्यांच्यावर कोणती कारवाई होणार हे अस्पष्ट आहे.

Post a Comment

 
Top