0
अहमदनगर : 

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपच्या कोट्यातून झालेले राज्यसभा खासदार नारायण राणे पुन्हा काँग्रेसमध्ये परतण्याची शक्यता आहे. तसे संकेत काँग्रेसचे वरिष्ठ नेत बाळासाहेब थोरात यांनी दिले आहेत.
अहमदनगर येथील नेवासा येथे रविवारी (दि.२०) काँग्रेसच्या एका कार्यक्रमादरम्यान थोरात यांनी राणे यांच्या भावी राजकीय वाटचालीबद्दल संकेत दिले आहे.
''राणे यांना वाटत आहे की आपण भाजपसोबत जोडून चूक केली आहे. राणे यांच्यासह काँग्रेस सोडून गेलेले अनेक नेते पुन्हा काँग्रेसमध्ये येण्याच्या तयारीत आहेत.'' असे थोरात यांनी म्हटले असल्याचे वृत्त आहे.

वाचा : नारायण राणे ठरवणार 'भाजप'चा जाहीरनामा
विशेष म्हणजे काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा सोमवारी (दि.२१) कोकणमध्ये सुरू होत आहे. याच दरम्यान, थोरात यांनी राणे यांच्याबाबत वक्तव्य केले आहे.
थोरात यांनी दिलेल्या संकेतानंतर राणे पुढील काही दिवसांत काय भूमिका घेतात, यावर राजकीय क्षेत्रात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

वाचा : नारायण राणेंनी रत्नागिरीतून निवडणूक लढवून दाखवावी : राऊत
राणे पुन्हा काँग्रेसमध्ये परतल्यास पक्षासाठी ही महत्वाची गोष्ट ठरणार आहे. मराठा समाजाला नुकतेच १६ टक्के आरक्षण देण्यात आले आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी सरकारमध्ये नारायण राणे यांच्या समितीने पहिल्यांदा मराठा समाजाला १६ टक्के देण्याची शिफारस केली होती. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राणे यांचे काँग्रेसमध्ये असणे पक्षासाठी फायद्याचे ठरणार आहे, असे काँग्रेसमधील काही नेत्यांना वाटत आहे.

...तर राणे खासदारकीचा राजीनामा देतील
दुसरीकडे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप- शिवसेना यांच्यात युती होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास राणे राज्यसभा खासदारकीचा राजीनामा देऊ शकतात. त्यानंतर राणे यांच्याकडे काँग्रेस अथवा राष्ट्रवादी हा पर्याय राहणार आहे. तसेच राणे काँग्रेस अथवा राष्ट्रवादीमध्ये थेट सामील होण्यापेक्षा ते आपल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या माध्यमातून काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आघाडीत सहभागी होऊ शकतात, असे अंदाज बांधले जात आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राणे यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. पवार- राणे भेट आणि आता थोरात यांच्या वक्तव्यामुळे राणे काँग्रेस अथवा राष्ट्रवादीमध्ये सामील होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.



Post a Comment

 
Top